पणजी: गतविजेत्या एफसी गोवासमोर सुपर कप विजेतेपद राखण्यासाठी बाकी दोन सामने महत्त्वाचे आहेत. त्यापैकी उपांत्य लढत मुंबई सिटीविरुद्ध फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी (ता. ४) खेळली जाईल, त्यावेळी मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघासाठी एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेत खेळण्याचा अनुभव साह्यकारक ठरू शकतो, तर प्रतिस्पर्धी संघ नव्या जोमाने मैदानात उतरेल.
एफसी गोवा व मुंबई सिटी यांच्यातील उपांत्य लढत गुरुवारी रात्री आठ वाजता खेळली जाईल, त्यापूर्वी संध्याकाळी चार वाजता ईस्ट बंगाल व पंजाब एफसी यांच्यात पहिला उपांत्य सामना होईल.
साखळी फेरीतील सामने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये गोव्यातच फातोर्डा व बांबोळी येथे झाले होते. आता उपांत्य व अंतिम लढती होत असून विजेता संघ पुढील मोसमातील एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेच्या प्ले-ऑफसाठी पात्रता मिळवेल.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत मार्केझ यांनी सांगितले, की ‘‘आमच्यासाठी परिस्थिती वेगळी आहे. आम्ही एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेत काही खडतर सामने खेळलेलो आहे. तो अनुभव तयारीच्या दृष्टीने चांगला आहे. फक्त एकतर्फी सरावाऐवजी स्पर्धात्मक सामने महत्त्वाचे आहेत.
आशियाई पातळीवरील स्पर्धेमुळे आम्ही तुलनेत जास्त सराव करु शकलो, अधिक सामने खेळले आहोत, पण सामन्यांतील अवधी खूप जास्त असल्याचे मानसिकदृष्ट्या परीक्षा लागते, तरीही सध्या आम्ही पूर्णपणे सज्ज आहोत.’’ एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेतील अनुभवाविषयी स्पॅनिश मार्गदर्शक म्हणाले, की ‘‘कठीण सामने खेळल्यामुळे क्लब, तसेच खेळाडूंच्या प्रगतीला हातभार लागतो. एएफसी चँपियन्स लीगमधील किमान दोन सामन्यांत गुण मिळविण्यास आम्ही लायक होतो, परंतु ते साध्य झाले नाही. तरीही या स्पर्धेतील अनुभव खूपच मौल्यवान आहे.’’
स्पर्धेच्या साखळी फेरीतील कामगिरी
एफसी गोवा (ब गट) ः वि. वि. जमशेदपूर एफसी २-०, वि. वि. इंटर काशी ३-०, पराभूत वि. नॉर्थईस्ट युनायटेड १-२
मुंबई सिटी एफसी (ड गट) ः वि. वि. स्पोर्टिंग क्लब दिल्ली ४-१, पराभूत वि. राजस्थान युनायटेड ०-१, वि. वि. केरळा ब्लास्टर्स १-०
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.