दुबई: इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावांचा विक्रम करणारा भारतीय कर्णधार शुभमन गिल जुलै महिन्यातील आयसीसीचा सर्वोत्तम खेळाडू ठरला. महिला विभागात हा मान इंग्लंडच्या सोफिया डंकले हिला मिळाला.
आयसीसीच्या मासिक सर्वोत्तम खेळाडूचा चौथ्यांदा पुरस्कार मिळवणारा शुभमन गिल हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांपैकी तीन कसोटी जुलै महिन्यात झाल्या. या तीन सामन्यांत मिळून त्याने ९४.५० च्या सरासरीने ५६७ धावा फटकावल्या. या अगोदर त्याने जानेवारी २०२३, सप्टेंबर २०२३ आणि फेब्रुवारी २०२५ मध्येही आयसीसीचा सर्वोत्तम मासिक पुरस्कार मिळवलेला आहे.
पुरुष खेळाडूंमध्ये चार वेळा हा पुरस्कार या अगोदर कोणालाही मिळवता आला नव्हता. महिलांमध्ये ॲश्ले गार्डनर आणि हेली मॅथ्यूज यांनी हा पुरस्कार चार वेळा मिळवलेला आहे. जुलै महिन्यातील या सर्वोत्तम मासिक पुरस्कारासाठी गिलसोबत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि दक्षिण आफ्रिकेचा वियान मुल्डर शर्यतीत होते.
जुलै महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे, परंतु ही कामगिरी कर्णधारपदाच्या माझ्या पहिल्या मालिकेत झाल्यामुळे हा आनंद द्विगुणीत झाला आहे, असे गिलने सांगितले. बर्मिंगहॅम येथील सामन्यात पहिल्या डावात केलेले द्विशतक खास होते. इंग्लंड दौऱ्यातील सर्वोत्तम कामगिरीचे हे प्रतिक ठरले, असेही गिल म्हणाला.
या पुरस्कारासाठी निवड करणाऱ्या ज्युरींचे आभार तसेच ही मालिका रंगतदार करणाऱ्या आणि अखेरपर्यंत झुंजणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचेही विशेष आभार मी मानत आहे, अशी भावना गिलने व्यक्त केली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.