पणजी: रणजी करंडक प्लेट विभाग क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या संघाने आतापर्यंत आपला जलवा दाखवून दिलाय. आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर गोव्याने सिक्कीमला पहिल्या डावात 108 धावात गुंडाळले. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सुयश प्रभुदेसाई आणि रोहण कदम यांनी सिक्कीमच्या गोलंदाजांची पळताभुई थोडी केली. सुयश आणि रोहणने बिनबाद 90 धावांची सलामी दिली.
दरम्यान, सिक्कीममधील (Sikkim) रंगपो येथे शुक्रवारी चार दिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा सुयश 50 धावांवर, तर रोहन 36 धावांवर खेळत होता. गोव्याचा संघ अजून 18 धावांनी मागे आहे. सुयशने 83 चेंडूंतील खेळीत सहा चौकार आणि एक षटकार मारला, तर रोहनने 67 चेंडूंचा सामना करताना पाच चौकार मारले.
तत्पूर्वी, संघात पुनरागमन केलेल्या अर्जुन तेंडुलकरसह हेरंब परब आणि शुभम तारी यांनी सिक्कीमच्या फलंदाजी खिळखिळी केली. या त्रिकुटाने भेदक मारा करताना सिक्कीमची 4 बाद 35 अशी नाजूक स्थिती केली. पार्थ पालावत (39) आणि पालझोर तमांग (19) यांनी थोडाफार प्रतिकार केला. मात्र नंतर अंकुर मलिक याने फटकेबाजी करत 22 धावा केल्याने सिक्कीमला शतक ओलांडता आले, मात्र त्यानंतर अखेरच्या चार विकेट सिक्कीमने फक्त चार धावांत गमावल्या.
मणिपूरविरुद्धच्या लढतीपूर्वी सराव सत्रात हाताला चेंडू लागल्यामुळे अर्जुन मागील लढतीत खेळू शकला नव्हता. शुक्रवारी त्याने सिक्कीमविरुद्ध भन्नाट मारा करताना 31 धावांत 2 गडी टिपले. हेरंबने 42 धावांत 3 फलंदाज बाद केले. सिक्कीमचे शेपूट कापून काढताना फिरकी गोलंदाज दर्शन मिसाळ आणि मोहित रेडकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.