पणजी: मध्य प्रदेशविरुद्धच्या रणजी करंडक क्रिकेट सामन्यात फलंदाजी करताना डोक्याला चेंडू लागलेला यष्टिरक्षक-फलंदाज समर दुभाषी सौराष्ट्रविरुद्धच्या आगामी सामन्यापूर्वी संघाबाहेर गेला. राजकोट येथे होणाऱ्या सामन्यासाठी तो संघासोबत जाणार नसल्याची माहिती बुधवारी विश्वसनीय सूत्राने दिली. या लढतीसाठी गुरुवारी संघ जाहीर होण्याचे संकेत आहेत.
एलिट ब गटात सौराष्ट्र व गोवा यांच्यातील चार दिवसीय सामना १६ नोव्हेंबरपासून राजकोट येथे खेळला जाईल. चौथ्या फेरीतील लढतीत गोव्याला पर्वरी येथे मध्य प्रदेशकडून तीन विकेट राखून पराभव पत्करावा लागला होता, तर सौराष्ट्रला मंगलापुरम येथे केरळविरुद्ध अनिर्णित लढतीत एका गुणावर समाधान मानावे लागले होते. प्रत्येकी चार सामने खेळल्यानंतर गोव्याचे ११, तर सौराष्ट्राचे सहा गुण झाले आहेत. गोव्याने एक विजय, दोन अनिर्णित व एक पराभव अशी कामगिरी नोंदविली असून सौराष्ट्राचे चारही सामने अनिर्णित राहिले.
मध्य प्रदेशविरुद्धच्या सामन्यासाठी निवडलेल्या १७ सदस्यीय संघातील अतिरिक्त डावखुरा फिरकी गोलंदाज अमूल्य पांड्रेकर याला सौराष्ट्रविरुद्धच्या लढतीसाठी ‘विश्रांती’ देण्याचा विचार असल्याचे सूत्राने नमूद केले, त्यामुळे राजकोट येथील सामन्यासाठी सोळा सदस्यीय संघ असेल. फलंदाज कश्यप बखले याचे संघातील स्थान कायम असेल, तर समर याच्या जागी राखीव यष्टिरक्षक कोणाला संघात घ्यायचे याबाबत अजून निर्णय झालेला नाही.
२३ वर्षांखालील संघातील यष्टिरक्षक शिवेंद्र भुजबळ सध्या बडोदा येथे एकदिवसीय स्पर्धेत खेळत असून संघाचे नेतृत्व करत आहे. कदाचित तो परस्पर राजकोट येथे जाऊ शकतो, पण २३ वर्षांखालील संघाचा समतोल बिघडण्याचा धोका आहे. मध्य फळीतील फलंदाज असलेला कश्यप बखले वेळप्रसंगी यष्टिरक्षण करू शकतो. त्यामुळे त्याचा पर्यायी यष्टिरक्षक या नात्याने विचार होऊ शकतो.
राजशेखर हरिकांतचे उल्लेखनीय पुनरागमन
समरला विश्रांती दिल्यामुळे मध्य प्रदेशविरुद्ध पहिल्या डावात राजशेखर हरिकांत याने बदली यष्टिरक्षण या नात्याने यष्टिरक्षण केले, नंतर त्याचा संघात ‘कन्कशन’ खेळाडू या नात्याने समावेश झाला. अशाप्रकारे गोव्यातर्फे रणजी क्रिकेट खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला होता. संधीचे सोने करताना ३५ वर्षीय राजशेखरने गोव्याच्या दुसऱ्या डावात दहाव्या क्रमांकावर फलंदाजीस येत आक्रमक शैलीत ४३ चेंडूंत पाच चौकार व दोन षटकारांसह ४० धावा केल्या.
डिसेंबर २०१८ मध्ये आगरतळा येथे त्रिपुराविरुद्ध रणजी करंडक पदार्पण केल्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर राजशेखरला पुनरागमनाची संधी मिळाली. मध्य प्रदेशविरुद्धची त्याची फलंदाजी लक्षात घेता तो राजकोट येथे सौराष्ट्रविरुद्ध आता पहिल्या पसंतीचा यष्टिरक्षक ठरला आहे. पर्वरी येथे त्याने दोन्ही डावांत मिळून तीन झेल पकडले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.