पणजी ः मध्यफळीतील शैलीदार फलंदाज ललित यादव याच्या सलग दुसऱ्या शतकामुळे गोव्याने विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ‘क’ गटात विजयी घोडदौड राखली. जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर झालेल्या लढतीत सोमवारी त्यांनी सिक्कीमला ६२ धावांनी नमविले.
प्रथम फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर गोव्याने ८ बाद ३०९ धावा केल्या, नंतर सिक्कीमने प्रतिकार केला; पण गोव्याचा अनुभव भारी ठरला. वासुकी कौशिक (३-३४) याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर गोव्याने सिक्कीमला ७ बाद २४७ धावांत रोखले. या गटात आता मुंबई (२.४२७) व गोवा (०.६९७) यांचे प्रत्येकी १२ गुण झाले आहेत. या दोन्ही संघांत ३१ डिसेंबर रोजी सामना होईल.
ललित याने मागील लढतीत धावबाद होण्यापूर्वी १०४ धावा केल्या होत्या. सोमवारी तीच खेळी पुढे नेताना त्याने नाबाद १३१ धावांची खेळी सजविली. १११ चेंडूंचा सामना करताना १४ वेळा चेंडू सीमापार केला. त्याला सुयश प्रभुदेसाई (५५) याची चांगली साथ मिळाली. गोव्याची ३ बाद ५९ अशी स्थिती असताना सुयश व ललित जोडी एकत्र आली.
त्यांनी चौथ्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी केली. लागोपाठ दुसरे अर्धशतक केलेल्या सुयशने ४९ चेंडूंतील खेळीत सहा चौकार व एक षटकार मारला. ललितने नंतर दर्शन मिसाळ याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ४७ धावांची, तर अर्जुन तेंडुलकर याच्यासह सातव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी करून गोव्याला तीनशे धावांचा पल्ला गाठून दिला.
गोवा ः ५० षटकांत ८ बाद ३०९ (स्नेहल कवठणकर १३, कश्यप बखले २३, सुयश प्रभुदेसाई ५५, ललित यादव नाबाद १३१, दर्शन मिसाळ १५, दीपराज गावकर १७, अर्जुन तेंडुलकर १९, वासुकी कौशिक नाबाद ३, पालझोर तमांग २-६१, गुरिंदर सिंग २-५१) वि. वि. सिक्कीम ः ५० षटकांत ७ बाद २४७ (के. साई सात्त्विक ५०, अमित रजेरा ५०, क्रांती कुमार २६, गुरिंदर सिंग नाबाद ५२, पालझोर तमांग २८, अर्जुन तेंडुलकर ९-२-४९-०, वासुकी कौशिक १०-३-३४-३, दीपराज गावकर ७-०-२९-०, शुभम देसाई ४-०-२५-०, दर्शन मिसाळ १०-०-६३-१, ललित यादव १०-०-४५-१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.