Indian Super League 2024-25 FC Goa VS Kerala Blasters
पणजी: एफसी गोवासाठी बोरिस सिंग याचा पूर्वार्धातील गोल लाखमोलाचा ठरला. या गोलसह भक्कम बचावाच्या बळावर त्यांनी इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यासाठी मोठ्या संख्येने स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रतिस्पर्धी चाहत्यांच्या साक्षीने केरळा ब्लास्टर्सला कोची येथे १-० फरकाने पराभूत करण्याची किमया साधली.
कोची येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर गुरुवारी बोरिसने सामन्याच्या ४०व्या मिनिटास केलेल्या गोलच्या बळावर एफसी गोवाने सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. बोरिससह संदेश झिंगन, ओडेई ओनाइंडिया, आकाश संगवान यांचा समावेश असलेली एफसी गोवाची भक्कम बचावफळी, तसेच गोलरक्षक ह्रतीक तिवारीची दक्षता केरळा ब्लास्टर्सला वरचढ ठरली. केरळा ब्लास्टर्सचा मुख्य आघाडीपटू नोआ सदोई याच्यावर बोरिसने चोख पहारा ठेवला. त्यामुळे यजमान संघाच्या आक्रमणावर मर्यादा आल्या.
सलग तिसरा सामना जिंकलेल्या एफसी गोवाचा हा एकंदरीत चौथा विजय असून १५ गुणांसह ते आता पाचव्या स्थानी आले आहेत. केरळा ब्लास्टर्सला पाचवा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे दहा लढतीनंतर त्यांचे ११ गुण कायम राहिले व नवव्या क्रमांकावर घसरण झाली. एफसी गोवाचा पुढील सामना येत्या चार डिसेंबर रोजी हैदराबाद येथे हैदराबाद एफसीविरुद्ध होईल.
गतमोसमात कोची येथे एफसी गोवास केरळा ब्लास्टर्सने ४-२ फरकाने पराभूत केले होते, मात्र गुरुवारी त्यांनी गतमोसमातील चुका टाळल्या आणि पूर्वार्धात घेतलेली आघाडी शेवटपर्यंत टिकवली. साहिल ताव्होरा याच्या असिस्टवर बोरिसने अप्रतिम कौशल्य आणि कल्पकता प्रदर्शित करत विश्रांतीला पाच मिनिटे असताना संघाला आघाडी मिळवून दिली. सामना संपण्यास आठ मिनिटे असताना केरळा ब्लास्टर्सला फ्रीकिक फटका मिळाला, मात्र अँड्रियन लुना याचा फटका रोखताना एफसी गोवाचा गोलरक्षक ह्रतीक तिवारी याने अफलातून कौशल्य प्रदर्शित केले. नंतर भरपाई वेळेतील सातव्या मिनिटास यजमान संघाला बरोबरीची आणखी एक संधी होती, परंतु समोर गोलरक्षक असताना केरळा ब्लास्टर्सचा संदीप सिंग अचूक फटका मारू शकला नाही.
२१ आयएसएल लढतीत एफसी गोवाचे केरळा ब्लास्टर्सवर १२ विजय
कोची येथे ११ लढतीत एफसी गोवाचे ४ विजय
बोरिस सिंग याचा यंदा एफसी गोवासाठी पहिला गोल
एफसी गोवा सलग ४ सामने अपराजित, ३ विजय व १ बरोबरी
आयएसएल स्पर्धेत ५०व्यांदा एफसी गोवाने सामन्यात गोल न स्वीकारण्याचा (क्लीन शीट) पराक्रम साधला. आयएसएल स्पर्धेत सर्वाधिक क्लीन शीट राखणाऱ्या संघांत मुंबई सिटी (६७) व बंगळूर एफसी (५२) यांच्यानंतर आता एफसी गोवा तिसरा संघ आहे. चौथ्या स्थानी असलेल्या केरळा ब्लास्टर्सच्या ४९ क्लीन शीट आहेत. यंदा एफसी गोवाने आयएसएलमध्ये दोनवेळा क्लीन शीट नोंदविली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.