IND vs NZ, 1st ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेचा थरार रविवार (11 जानेवारी) पासून बडोद्याच्या मैदानावर सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र न्यूझीलंडच्या सलामीवीरांनी भारतीय गोलंदाजीचे वाभाडे काढत एक मोठा विक्रम आपल्या नावे केला. डेवोन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स या जोडीने भारतीय खेळपट्टीवर तब्बल 27 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढला.
पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडच्या डावाची सुरुवात अतिशय सावध पण ठोस झाली. डेवोन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स यांनी पहिल्या 10 षटकांत भारतीय वेगवान गोलंदाजांचा सामना करत बिनबाद 49 धावा केल्या. मात्र, त्यानंतरच्या 10 षटकांत या जोडीने गिअर बदलला. दोन्ही फलंदाजांनी केवळ आपली अर्धशतकेच पूर्ण केली नाहीत, तर संघाचा स्कोअर 100 च्या पार नेला.
या दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी 117 धावांची मोठी भागीदारी झाली. ही भागीदारी भारतीय भूमीवर न्यूझीलंडच्या सलामीच्या जोडीने केलेली दुसरी सर्वोच्च भागीदारी ठरली. यापूर्वी, 1999 मध्ये राजकोट येथे नाथन ॲस्टल आणि क्रेग स्पीयरमॅन यांनी 115 धावांची भागीदारी केली होती. 27 वर्षांनंतर कॉन्वे आणि निकोल्सने हा विक्रम मोडला.
किवी जोडी ज्या पद्धतीने खेळत होती, त्यावरुन 1988 चा 140 धावांचा (अँड्र्यू जोन्स आणि जॉन राईट) सर्वोच्च भागीदारीचा विक्रम मोडला जाईल असे वाटत होते. मात्र, भारताचा युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने टीम इंडियाचे (Team India) संकट दूर केले. 22व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर हर्षितने स्थिरावलेल्या हेन्री निकोल्सला बाद केले. निकोल्स 62 धावा करुन माघारी परतला आणि भारताला पहिले यश मिळाले.
भारतीय भूमीवर न्यूझीलंडची सर्वोच्च सलामी भागीदारी
140 धावा: अँड्र्यू जोन्स आणि जॉन राईट (1998)
117 धावा: डेवोन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स (2026 - आजचा सामना)
115 धावा: नाथन ॲस्टल आणि क्रेग स्पीयरमॅन (1999)
सुरुवातीच्या 117 धावांच्या भक्कम पायामुळे न्यूझीलंडचा (New Zealand) संघ मोठ्या धावसंख्येकडे कूच करत आहे. भारतीय फिरकीपटूंना मधल्या षटकांत किवी फलंदाजांवर अंकुश ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. बडोद्याची खेळपट्टी फलंदाजीला साथ देत असल्याने भारताला हे लक्ष्य गाठण्यासाठी विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.