पणजी: गोव्याच्या क्रीडाक्षेत्रातील पीछेहाटीस क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी राज्यातील विविध खेळांच्या संघटनांना दोषी ठरवत चांगलेच धारेवर धरले. उत्तराखंडमधील ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंना निरोप व शुभेच्छा देण्यासाठी कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्यातील क्रीडा संघटनांनी गोवा क्रीडा प्राधिकरणास दिलेल्या पैशांचा हिशेब दिला नसल्याचा आरोप क्रीडामंत्र्यांनी केला. गोव्यात झालेल्या ३७व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तयारीसाठी संघटनांना ८० टक्के आगावू रक्कम देण्यात आली, स्पर्धा होऊन वर्ष उलटले, परंतु अजूनही संघटनांनी लेखापरीक्षित अंदाजपत्रक किंवा निधी वापराचे प्रमाणपत्र सादर केलेले नाही, याकडे लक्ष वेधत क्रीडामंत्र्यांनी गोवा ऑलिंपिक असोसिएशनसह (जीओए) राज्यातील क्रीडा संघटनांना जाब विचारला. फक्त कारणे देऊ नका, कार्यक्षमता वाढवा, नपेक्षा राज्यातील क्रीडाक्षेत्राती प्रगती होणार नाही, असेही क्रीडांत्र्यांनी सुनावले.
राज्यातील क्रीडा संघटनांचा कारभारात समन्वयाचा अभाव आहे, अहंभाव आहे, अशी टीका करून क्रीडामंत्र्यांनी खेळाडूंनाही आव्हान स्वीकारण्याचा सल्ला दिला. केवळ स्पर्धेच्या तोंडावर तयारी करून पदके मिळणार नाही, तर त्यासाठी सतत सराव, मेहनत आवश्यक असल्याचे त्यांनी बजावले. प्रशिक्षकांनाही त्यांनी खडे बोल सुनावताना प्रत्यक्ष मैदानावर खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे सांगितले.
कार्यक्रमास गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या कार्यकारी संचालक गीता नागवेकर, गोवा ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव गुरुदत्त भक्ता, खजिनदार जयेश नाईक, उत्तराखंड क्रीडा स्पर्धेतील गोव्याचे चेफ द मिशन एर्विन कोर्दो, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. स्पर्धा २८ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत होत असून गोव्याचा १९ खेळांत सहभाग असेल. स्पर्धेत १२१ क्रीडापटूंसह गोव्याचे १५२ सदस्यीय पथक भाग घेईल.
संघ निवडीत वशिलेबाजी किंवा खेळाडूंवर अन्याय होत असल्यास संबंधितांना लेखी तक्रार सादर करावी. त्यात तथ्य असल्यास संबंधित क्रीडा संघटनेस प्रतिबंधित केले जाईल, असा इशाराही यावेळी क्रीडामंत्र्यांनी दिला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.