पणजी: गोव्याच्या २३ वर्षांखालील युवक क्रिकेट संघावर यंदा दुसऱ्यांदा पहिल्या डावात आघाडी घेऊनही पराभूत होण्याची नामुष्की ओढविली. कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात ओडिशाने त्यांच्यावर शुक्रवारी १२५ धावांची चमकदार विजय नोंदविला.
एलिट क गटातील चार दिवसीय सामना कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर झाला. गोव्याने पहिल्या डावात ५४ धावांची आघाडी घेतली होती. विजयासाठी त्यांच्यासमोर ३२१ धावांचे आव्हान होते. शुक्रवारी त्यांचा डाव १९५ धावांत संपुष्टात आला. नवव्या क्रमांकावरील दीप कसवणकर याने सर्वाधिक ४८ (४५ चेंडू, ६ चौकार), तर त्याखालोखाल आठव्या क्रमांकावरील अनुज यादव याने ४० (३७ चेंडू, ८ चौकार, १ षटकार) धावा केल्या. त्यापूर्वी नाईट वॉचमन विनायक कुंटे याने चिवटपणे किल्ला लढविताना १०१ चेंडूंत आठ धावा केल्या होत्या.
ओडिशाचा लेगस्पिनर सार्थक पांडा याने चार गडी टिपले. स्पर्धेतून ओडिशाने एकूण ११ गुणांची कमाई केली. यामध्ये फलंदाजीत एक, गोलंदाजीत चार व विजयाच्या सहा गुणांचा समावेश आहे. ते आता तीन लढतीनंतर दोन विजय व एका पराभवासह २७ गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. गोव्याला एकूण सहा गुण मिळाले. यामध्ये फलंदाजीतील दोन व गोलंदाजीतील चार गुण आहेत. गोव्याने तीन लढतीतून एक विजय व दोन पराभवांसह एकूण २४ गुण प्राप्त केले असून ते पाचव्या स्थानी आहेत.
स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गोव्याला १५३ धावांची आघाडी घेऊनही बडोद्याविरुद्ध चार विकेट्सने हार पत्करावी लागली होती. गोव्याचा हा तीन लढतीतील दुसरा पराभव ठरला. अन्य लढतीत बिहारविरुद्ध त्यांनी विजय नोंदविला होता. त्यांचा चौथा सामना ३ ते ६ नोव्हेंबर या कालावधीत १२ गुणांसह गटात अखेरच्या स्थानी असलेल्या हिमाचल प्रदेशविरुद्ध सांगे येथेच खेळला जाईल.
संक्षिप्त धावफलक
ओडिशा, पहिला डाव : १९९
गोवा, पहिल डाव : २५३
ओडिशा, दुसरा डाव : ६ बाद ३७४ घोषित
गोवा, दुसरा डाव (२ बाद ३ वरून) : ६७.४ षटकांत सर्वबाद १९५ (सार्थक भिके १९, विनायक कुंटे ८, दिशांक मिस्कीन २५, आर्यन नार्वेकर २१, जीवनकुमार चित्तेम ०, अनुज यादव ४०, दीप कसवणकर ४८, शिवेन बोरकर नाबाद १४, राहुल विश्वकर्मा ७, आशुतोष मरांडी १-२२, अभिषेक सिंग २-२९, संबित बेजा २-२६, सार्थक पांडा ४-७०, सुजल सिंग १-८).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.