पणजी: गोवा क्रिकेट असोसिएशनचा (जीसीए) आर्थिक आणि प्रशासकीय कारभार पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. असोसिएशनच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित लेखापरीक्षणात गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. खरेदी, निविदा, कंत्राटे, देयकांना मंजुरी, कर्मचारी नियुक्त्या आणि आर्थिक नोंदींच्या देखभालीबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
गोवा सरकारच्या निबंधक व महानिरीक्षक, संस्था यांच्या कार्यालयाने नियुक्त केलेल्या स्वतंत्र लेखापरीक्षकांच्या पथकाने १ एप्रिल २०२४ ते २६ डिसेंबर २०२५ या कालावधीतील व्यवहारांची तपासणी केली. शशी नायर, अक्षय प्रभाकर राऊत आणि एलिस फ्रान्सिस्को वाझ यांचा या पथकात समावेश होता. अहवालात २१ प्रमुख विषयांवरील निरीक्षणे नोंदविण्यात आली असून, अनेक बाबी गंभीर जोखीम श्रेणीत ठेवण्यात आल्या आहेत. असोसिएशनच्या हिशेबांबाबत लेखापरीक्षकांनी प्रतिकूल मत व्यक्त केले आहे.
क्रीडा साहित्य, फिजिओथेरपी व व्यायामशाळेतील उपकरणे, जलतरण तलाव, पर्वरी व सांगे येथील एलईडी क्रीडा प्रकाशयोजना, प्रवास व हॉटेल आरक्षणे, प्रशिक्षकांची नियुक्ती आणि कार्यालय नूतनीकरण अशा विविध व्यवहारांची छाननी करण्यात आली. काही प्रकरणांत आवश्यक कागदपत्रे, मंजुरी किंवा नोंदी उपलब्ध नसल्याचेही अहवालात नमूद आहे.
असोसिएशनचे अध्यक्ष महेश देसाई, सचिव तुळशीदास शेट्ये, खजिनदार अब्दुल माजिद, मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश शिंदे आणि माजी उपाध्यक्ष शांबा देसाई यांच्या कार्यपद्धतीसंदर्भातही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. व्यवस्थापकीय समितीची मंजुरी न घेताच काही कागदपत्रांवर आणि धनादेशांवर स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप शांबा देसाई यांच्याबाबत करण्यात आला आहे.
अहवालातील निरीक्षणे म्हणजे तेवढीच रक्कम गैरव्यवहारातून गमावली गेल्याचा अंतिम निष्कर्ष नव्हे. प्रत्येक व्यवहाराचे स्वरूप, उपलब्ध पुरावे आणि जबाबदारी यांची स्वतंत्र पडताळणी आवश्यक आहे. त्यामुळे असोसिएशनच्या आर्थिक व्यवहारांची आणि पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी होत आहे. जीसीएच्या निधीच्या वापरावरून यापूर्वीही वाद आणि पोलिसांत गुन्हे दाखल झाल्याने हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
आक्षेप नोंदविण्यात आलेल्या बाबी
खरेदी व निविदा प्रक्रियेतील त्रुटी
खर्चाला आवश्यक मंजुरीबाबत प्रश्न
काही व्यवहारांची कागदपत्रे अनुपलब्ध
कर्मचारी, सल्लागार नियुक्त्यांतील त्रुटी
स्थावर मालमत्ता, साठा नोंदींबाबत आक्षेप
अंतर्गत लेखापरीक्षण नियुक्ती, स्वायत्ततेसंबंधी प्रश्न
अहवालात नमूद प्रमुख मुद्दे
क्रीडा साहित्य खरेदी :२.११ कोटी
फिजिओथेरपी उपकरणे : ३.६२ कोटी
व्यायामशाळेतील उपकरणे : ३.४४ कोटी
जलतरण तलाव प्रकल्प : २.५३ कोटी
पर्वरी एलईडी प्रकाशयोजना : ५.८० कोटी
सांगे एलईडी प्रकाशयोजना : ६ कोटी
प्रवास व हॉटेल आरक्षणे : १९.०९ कोटी
प्रशिक्षक, साहाय्यक कर्मचारी शुल्क : ३.१९ कोटी
कार्यालय नूतनीकरण : ४०.२६ लाख
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.