fc goa vs al seeb club Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

AFC Champions League: FC Goaची लागणार कसोटी, अल सीबविरुद्ध रंगणार सामना

Fc goa vs Al seeb club: एफसी गोवा व ओमानमधील अल सीब क्लब यांच्यातील एएफसी चँपियन्स लीग २ प्ले-ऑफ लढत बुधवारी (ता.१३) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळली जाईल.

Sameer Panditrao

पणजी: आशियाई क्लब पातळीवरील फुटबॉलमध्ये भारताचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करण्याची संधी एफसी गोवा संघाला लाभली असून मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील संघ घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ उठवू शकतो.

एफसी गोवा व ओमानमधील अल सीब क्लब यांच्यातील एएफसी चँपियन्स लीग २ प्ले-ऑफ लढत बुधवारी (ता.१३) फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळली जाईल. ही लढत जिंकल्यास एफसी गोवा संघाला एएफसी चँपियन्स लीग २ या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळेल. पराभूत संघ एएफसी चॅलेंज लीग स्पर्धेत दाखल होईल. निर्धारित नव्वद मिनिटे आणि अतिरिक्त वेळेतही बरोबरीची कोंडी कायम राहिल्यास बुधवारी निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब होईल.

रुमानियन व्हालेरियू टिटा यांच्या मार्गदर्शनाखालील ओमान प्रोफेशनल लीग विजेता संघ प्रबळ आहे. याची जाणीव एफसी गोवाचे प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांना आहे, त्यामुळेच त्यांनी सामन्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी पत्रकार परिषदेत प्रतिस्पर्धी संघाप्रति आदर व्यक्त केला, त्याचवेळी घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ उठवत आपला संघ विजयासाठी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल हे सांगण्यास स्पॅनिश मार्गदर्शक विसरले नाहीत. सलग तिसऱ्या मोसमात ते एफसी गोवाचे प्रशिक्षकपद भूषवित आहेत. संघाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मैदानावर येण्याचे आवाहन त्यांनी एफसी गोवाच्या चाहत्यांना केले आहे.

अल सीब क्लब २०२२ मधील एएफसी कप विजेता असून २०२४-२५ मध्ये त्यांनी एएफसी चॅलेंज लीगच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. गोव्यातील वातावरणाची सवय व्हावी, या उद्देशाने हा संघ शनिवारी राज्यात दाखल झाला. प्रतिष्ठेच्या एएफसी चँपियन्स लीग २ स्पर्धेत जागा मिळविण्यासाठी आपला संघ सज्ज असल्याचे त्यांचे प्रशिक्षक टिटा यांनी नमूद केले.

एफसी गोवाचे सफल प्रशिक्षक

मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या मे महिन्यात भुवनेश्वर येथे सुपर कप जिंकून एफसी गोवा संघ आशियाई क्लब पातळीवर दाखल झाला आहे. भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक असलेले मार्केझ राष्ट्रीय संघातर्फे अपयशी ठरले; पण एफसी गोवाचे मार्गदर्शक या नात्याने ते यशस्वी ठरले आहेत. या संघाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली ६२ सामन्यांत सर्वाधिक ३८ विजयांची नोंद केली आहे.

२०२३-२४ पासून ते एफसी गोवाचे प्रशिक्षक असून संघाने सलग दोनवेळा आयएसएल स्पर्धेची उपांत्य फेरीही गाठली आहे. २०२४-२५ मध्ये आयएसएल स्पर्धेत सलग २३ सामने गोल नोंदविण्याचा विक्रम एफसी गोवा संघाने नोंदविला होता. आता यापूर्वी मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखाली खेळलेला स्पॅनिश स्ट्रायकर हावियर सिव्हेरियो सुपर कप विजेत्या संघात दाखल झाला असून त्याच्याकडून अधिकाधिक गोल करण्याची अपेक्षा बाळगली जात आहे.

चार वर्षांपूर्वी फातोर्ड्यात...

आयएसएल लीग विनर्स शिल्ड विजेता या नात्याने एफसी गोवा संघ २०२१ मधील एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेस पात्र ठरला होता. तेव्हा कोविड काळात फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर ई गटातील सामने झाले होते. एफसी गोवाच्या गटात पर्सेपोलिस एफसी (इराण), अल रय्यान (कतार), अल वाहदा (संयुक्त अरब अमिराती) हे संघ होते.

द्विसाखळी पद्धतीने झालेल्या गटपातळीवरील लढतीत एफसी गोवाने सहा सामन्यांत तीन बरोबरी व तीन पराभव अशी कामगिरी नोंदविली होती. चँपियन्स लीग स्पर्धेत गुण आणि गोल नोंदविलेला पहिला भारतीय क्लब हा मान एफसी गोवास तेव्हा मिळाला होता. त्यांनी अल रय्यानविरुद्धच्या दोन्ही लढतीत, तसेच अल वाहदा क्लबविरुद्ध बरोबरी साधली होती. त्यांच्यातर्फे एदू बेदिया व होर्गे ऑर्तिझ यांनी गोल केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Birch Fire Case: हडफडे अग्निकांडातील मुख्य आरोपी लुथरा बंधू उद्या गोव्यात होणार दाखल; ट्रान्झिट रिमांड मिळाल्याने कारवाईला वेग VIDEO

IPL Mini Auction 2026: धोनीच्या चेन्नईत नव्या दमाच्या खेळाडूंची एन्ट्री! दोन अनकॅप्ड खेळाडूंवर 28 कोटींची उधळण; प्रशांत वीर आणि कार्तिक शर्मा कोट्यधीश

"लग्न केवळ कागदावर उरलं असेल तर ते तोडणंच बरं!" 24 वर्षांपासून रखडलेल्या घटस्फोटाच्या वादावर सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

SCROLL FOR NEXT