FC Goa vs Hyderabad ISL League
पणजी : हैदराबाद एफसीविरुद्धच्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल सामन्यात केलेले बचावफळीतील बदल अंगलट आल्याची कबुली एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांनी बरोबरीचा एक गुण मिळाल्यानंतर दिली.
फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरु स्टेडियमवर बुधवारी रात्री हैदराबाद एफसीने एफसी गोवास १-१ असे गोलबरोबरीत रोखले. नियमित बचावपटू ओडेई ओनाइंडिया निलंबनामुळे हा सामना खेळू शकला नाही. कार्ल मॅकह्यू याला मार्केझ यांनी सेंटर-बॅक जागी खेळविले.
संघरचनेतील मार्केझ सामन्यानंतर म्हणाले की, "अर्थातच कार्ल मॅकह्यू बचावात्मक मध्यरक्षक आहे. सुरवातीस प्रत्येक फळीत एक परदेशी खेळाडू ठेवल्यास सामन्यावर चांगल्याप्रकारे नियंत्रण राखू असे आम्हाला वाटले, परंतु ही चाल अपेक्षित ठरू शकली नाही."
नंतर उत्तरार्धात (साहिल) ताव्होरा व आयुष (छेत्री) हे केंद्रीय मध्यरक्षक जागी आणि बोर्हा (हेर्रेरा) आक्रमक मध्यरक्षक जागी खेळला. मला वाटतं, बोर्हा याला रेड कार्ड मिळेपर्यंत आम्ही चांगला खेळ केला. आम्ही सामना नियंत्रित केलेला असताना अखेरच्या काही मिनिटांत नियंत्रण गमावून बसलो.
कदाचित या कारणास्तव मी बचावफळीत बदल करताना कार्ल मॅकह्यू याला मध्यफळीत आणले, पण ही चाल खूपच भयानक ठरली. त्याचा लाभ उठवत त्यांनी (हैदराबादने) बरोबरी साधली आणि प्रशिक्षक या नात्याने बदली खेळाडूंच्या निवडीत मी चुकीचा ठरलो, असं मार्केझ म्हणालेत.
एफसी गोवाचा पुढील सामना १४ जानेवारी रोजी गुवाहाटी येथे नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध होणार आहे. एफसी गोवा सध्या सलग नऊ सामने अपराजित आहे, यामध्ये सहा विजय व तीन बरोबरींचा समावेश आहे. सध्या एफसी गोवाचे १४ सामन्यांतून २६ गुण झाले असून ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
हैदराबादविरुद्धच्या बरोबरीनंतर पुढील लढतीविषयी ५६ वर्षीय स्पॅनिश मार्गदर्शक मार्केझ म्हणाले की, काहीवेळा अशाप्रकारचे निकाल संघाला जमिनीवर आणण्यास मदतगार ठरतात. आम्हाला गुवाहाटीत नॉर्थईस्ट युनायटेडविरुद्ध अतिशय खडतर सामना खेळायचा आहे याची जाणीव आहे. सध्या ते चांगले फुटबॉल खेळत असून मोहिमेचा आनंद लुटत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.