
Goa Tourism
गोवा राज्यातील पर्यटकांच्या संख्येवरून बरीच चर्चा सुरू आहे. प्रशासनाकडून सांगितली जाणारी आकडेवारी आणि स्थानिक पातळीवरून कळणाऱ्या गोष्टी यात तफावत आहे. या विषयात पर्यटक आणि स्थानिक या दोघांचेही म्हणणे ऐकून घेणे महत्वाचे आहे. त्यांच्या त्यांच्या समस्या असणारच आहेत. सोशल मीडियावर गोव्यातील पर्यटनावरून ऊहापोह सुरू आहे. पर्यटक वाढते दर, बेशिस्ती अशा गोष्टींवरून नाराज आहेत तर स्थानिक व्यावसायिक काही उपद्रवी पर्यटकांमुळे समस्येत आहेत.
गोवा फक्त भारतातच नाही तर जगातील पर्यटकांना भुरळ घालणारं पर्यटन केंद्र आहे. गोव्यातील मंदिरं, चर्चेस, बेटं, बीचेस आणि एकूणच रंगीत संगीत वातावरण यासाठी गोवा नेहमीच स्वप्नवत डेस्टिनेशन राहिलं आहे.
तिथल्या बीचेसवर सहज दिसणारे परदेशी पर्यटक हे देशी पर्यटकांसाठी आणखी एक आकर्षण. पब्ज, कॅसिनोज, वॉटर स्पोर्ट्स असं प्रत्येकाच्या मनात असलेल्या अनेक गोष्टी गोव्यात आहेतच. जन्माला यावं आणि गोव्याला चैन करायला जावं हे तर प्रत्येक मध्यमवर्गीय तरुणाचं स्वप्न.
अलीकडे मात्र गोव्याला दृष्ट लागलेय की काय कळत नाही. गोव्यातलं पर्यटन कमी होतंय, गोवा पहिल्यासारखा राहिला नाही अशा आणि यासंदर्भात अनेक पोस्ट्स वाचनात आल्या. या पोस्ट्समध्ये गोव्यातील असुविधा, हॉटेल्सची मनमानी, रस्त्यांची दुर्दशा, आसमानाला भिडलेले दर अशा अनेक तक्रारी वाचनात आल्या.
यामुळे गोव्यात पर्यटकांची संख्या रोडावली आहे. अर्थातच गोव्याच्या अर्थकारणावर याचा परिणाम होणार हे नक्की. परदेशी पर्यटक गोव्याऐवजी बँकॉक, श्रीलंकेकडे वळलेत ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटकही इतर ठिकाणांचा विचार करू लागला आहे.
मूळ गोवेकर हा तसा शांत वृत्तीचा माणूस. तो कुणाच्या अध्यातमध्यात पडत नाही.पण पर्यटनासाठी बाहेरून येणाऱ्या 'ठराविक जनतेच्या त्रासाची झळ मूळ गोवेकरांना बसू लागली आहे. पर्यटकांची असली अरेरावी नव्या पिढीतील गोवेकर कशी सहन करेल?
बहुतांशी पर्यटनावर चालणारा गोवा आज पर्यटकांच्या नजरेतून उतरणं ही चांगली गोष्ट नाही. हॉटेल्सपासून इतर सुविधा पुरवणाऱ्यांनी ग्राहकसेवेबद्दल जागरूक असणं अत्यावश्यक आहे. गोव्यातल्या हॉटेल्सचे आणि फ्लाईट्सचे दरसुद्धा अवास्तव असल्याची ओरड आहे.
काही ठिकाणी पार्किंगसाठी अव्वाच्या सव्वा दर लावल्याची ओरड कानी पडली. या सर्व मुद्द्यांवर गोवा सरकार नक्की विचार करेलच. किंबहुना तो सर्वांनीच करायला हवा.
महत्वाचं म्हणजे पर्यटक म्हणून आपण जेव्हा गोवा किंवा कुठंही जातो, तिथं अनेकांचं वागणं उबग आणणारं असतं. काही जण अक्षरशः सोबतच्याना पण हैराण करतात. बेफामपणे वाहनं चालवणे, बीच किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वर्तन यामुळे आपलीही बदनामी होते हे कळत नाही का? स्थानिकांना, व्यावसायिकांना याचा किती तीव्रतेने त्रास होत असेल?
आपल्या देशातील प्रत्येक राज्य आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण होणं गरजेचं आहे. यासाठी सरकारी पातळीवर नक्कीच विचारविमर्ष होत असतील.
पण नागरिक किंवा पर्यटक म्हणून आपणही जबाबदारी घ्यायला हवी. पर्यटन जर आपल्यासाठी आहे, तर ते आनंददायी व्हावं यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत. शेवटी टाळी एका हाताने वाजत नाही हे आपण विसरता कामा नये.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.