पणजी: कुचबिहार करंडक १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटातील उपांत्यपूर्व लढतीत मध्य प्रदेशचा संघ ५ बाद ४२ असा चाचपडत असताना गोव्याला पकड मजबूत करण्याची नामी संधी होती, पण त्यांनी ती गमावली, परिणामी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर पाहुण्या संघाने १५७ धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यांचे अजून तीन गडी बाकी असल्याने यजमान संघासमोरील आव्हान खडतर बनले आहे.
कोटार्ली-सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात गोव्याच्या पहिल्या डावातील १६४ धावांना उत्तर देताना मध्य प्रदेशने शुक्रवारी दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३२१ धावा केल्या.
समर्थ राणे, तसेच चिगुरुपती व्यंकट व यश कसवणकर यांनी मध्य प्रदेशचा निम्मा संघ १७.१ षटकांत गारद केला तेव्हा गोव्याचे वर्चस्व अपेक्षित होते. कठीण प्रसंगी कर्णधार मनाल चौहान संघाच्या मदतीस धावून आला.
या डावखुऱ्या शैलीदार फलंदाजाने यष्टिरक्षक स्पर्श धाकर याच्यासमवेत कौतुकास्पद झुंज दिली. या जोडीने सहाव्या विकेटसाठी २०७ धावांची भागीदारी केल्यामुळे गोव्याचा संघ दुबळा भासू लागला.
स्पर्धेत यंदा शानदार फलंदाजी केलेल्या मनाल याचे शतक पाच धावांनी हुकले. चहापानानंतर लगेच व्यंकट याने मध्य प्रदेशच्या कर्णधारास यष्टींमागे साई नाईक याच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. मनाल याने १८२ चेंडूंतील खेळीत नऊ चौकारांसह ९५ धावा केल्या. मध्य फळीतील हा फलंदाज मोसमात दुसऱ्यांदा नव्वदीत ड्रेसिंग रुममध्ये परतला. साखळी फेरीत तो दिल्लीविरुद्ध ९७ धावांवर बाद झाला होता, मात्र त्रिपुरा (१७७) व तमिळनाडू (१०७) या संघांविरुद्ध त्याने शतके ठोकली होती.
स्पर्श धाकर याने चहापानापूर्वीच शतक पूर्ण केले. कर्णधार बाद झाल्यानंतर त्याने प्रतीक शुक्ला (नाबाद ४०) याच्यासमवेत सातव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करून मध्य प्रदेशला तीनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.
दिवसातील मोजकीच षटके बाकी असताना गोव्याचा जलदगती गोलंदाज समर्थ राणे याने वैयक्तिक चौथी विकेट मिळविताना स्पर्श याला पायचीत बाद केले. मध्य प्रदेशच्या या यष्टिरक्षकाने २०९ चेंडूंत दहा चौकार व एका षटकारासह १३९ धावा केल्या.
गोवा, पहिला डाव ः १६४
मध्य प्रदेश, पहिला डाव (१ बाद १२ वरून) ः ९४ षटकांत ७ बाद ३२१ (हर्षित यादव २०, मनाल चौहान ९५, स्पर्श धाकर १३९, प्रतीक शुक्ला नाबाद ४०, समर्थ राणे २३-३-६३-४, चिगुरुपती व्यंकट १९-१-७२-२, यश कसवणकर २२-४-६९-१, मिहीर कुडाळकर १८-१-६०-०, शिवेन बोरकर १२-०-५१-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.