पणजी: मिहीर कुडाळकर (५-१०) याच्या फिरकी जाळ्यात सोमवारी उत्तर प्रदेशचा (यूपी) १९ वर्षांखालील मुलांचा संघ फसला. त्यामुळे कुचबिहार करंडक क्रिकेट सामन्यात ऑफब्रेक गोलंदाजाच्या भेदकतेमुळे गोव्याने प्रतिस्पर्ध्यांचा पहिला डाव १२५ धावांत गुंडाळून नंतर पहिल्या दिवसअखेर १७ धावांची आघाडीही संपादली.
सांगे येथील जीसीए मैदानावर चार दिवसीय सामना सुरू आहे. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा गोव्याने ३ बाद १४२ धावा केल्या होत्या. कर्णधार यश कसवणकर ५२ धावांवर खेळत होता. त्याने ५६ चेंडूंचा सामना करताना सहा चौकार व एक षटकार मारला. सलामीच्या आदित्य कोटा याने ८३ चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने ४८ धावा केल्या, धावबाद झाल्याने त्याचे अर्धशतक हुकले.
आदित्य व यश यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. त्यापूर्वी आदित्य व शंतनू नेवगी (२८) यांनी दुसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भर टाकली होती. त्यापूर्वी, गोव्याने नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशला प्रथम फलंदाजीस पाचारण केले. मिहीरला गोलंदाजीस पाचारण केल्यानंतर पाहुण्या संघाची दाणादाण उडाली.
त्यांनी ४० धावांत आठ गडी गमावले, त्यापैकी पाच गडी फक्त १३ धावांत माघारी परतले. घसरगुंडी उडण्यापूर्वी सलामीचा अनमोल नौशरन (३४) व भावी शर्मा (६१) यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली होती.
मागील लढतीत आसामविरुद्ध पणजी जिमखान्यावर दोन्ही डावात मिळून सात गडी बाद केलेल्या मिहीर याने ६.४ षटकांच्या स्पेलमध्ये फक्त १० धावा देत पाच गडी टिपले. याव्यतिरिक्त वेगवान चिगुरुपती व्यंकट तीन गडी बाद करताना ३२ धावा केल्या. प्रारंभिक धक्के देताना व्यंकट याने उत्तर प्रदेशच्या दोघाही सलामीवीरांना २९ धावांत बाद केले होते.
उत्तर प्रदेश, पहिला डाव ः ४२.४ षटकांत सर्वबाद १२५ (अनमोल नौशरन ३४, भावी शर्मा ६१, समर्थ राणे ७-२-२०-०, चिगुरुपती व्यंकट ९-१-३२-३, पियुष देविदास ५-०-२१-०, यश कसवणकर ११-२-२५-१, शिवेन बोरकर ४-०-१५-१, मिहीर कुडाळकर ६.४-१-१०-५).
गोवा, पहिला डाव ः ३९ षटकांत ३ बाद १४२ (आदित्य कोटा ४८, सार्थक भिके १०, शंतनू नेवगी २८, यश कसवणकर नाबाद ५२, मिहीर कुडाळकर नाबाद ०, यश पनवर १-२५, आदित्यकुमार सिंग ५-०-२१-१).
गतमोसमात दुखापतीमुळे १९ वर्षांखालील स्पर्धेत मिहीर गोव्यातर्फे खेळू शकला नव्हता, यंदा त्याने पूर्ण तंदुरुस्तीसह छाप पाडली आहे. कुचबिहार करंडकातील तीन सामन्यांतील पाच डावांत मिहीरने १३ गडी बाद केले आहेत. आसामविरुद्ध मागील लढतीत त्याने पहिल्या डावात शून्य धावांत तीन गडी, तर दुसऱ्या डावात नऊ धावांत चार गडी बाद केले होते.
गोव्याचा कर्णधार यश कसवणकर याने फलंदाजीत सातत्यपूर्ण धडाका राखला आहे. कुचबिहार करंडकातील तीन डावांत त्याने आतापर्यंत ३५५ धावा केल्या आहेत. सोमवारी त्याने सलग दुसरे अर्धशतक केले. आसामविरुद्ध त्याने ६० धावा केल्या होत्या, तर छत्तीसगडविरुद्ध तो २४३ धावांवर नाबाद राहिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.