ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन रोअर एफसी आणि अर्जेंटिनातील क्लब देपोर्तिव्हा डिफेन्सो जस्टिसिया या दोन प्रमुख आंतरराष्ट्रीय क्लबच्या सहभागामुळे यंदा भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत चुरस वाढणार आहे. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर २४ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत स्पर्धा खेळली जाईल. ३ सप्टेंबर रोजी उपांत्य सामने तर ६ सप्टेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.
भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी स्पर्धेचे यंदा दुसरे वर्ष आहे. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी स्पर्धेची माहिती देताना पत्रकार परिषदेत सांगितले, की ``यावर्षी स्पर्धेचा आवाका मोठा आणि अतिशय उत्कृष्ट असेल. स्पर्धेत आम्ही दोन परदेशी संघांचा समावेश केला असून दोन्ही संघ त्यांच्या देशातील अव्वल क्लब आहेत आणि गोव्यात ते निव्वळ स्पर्धात्मक दृष्टिकोन राखून येत आहेत. सरकारने पूर्णतः ही स्पर्धा पुरस्कृत केली असून आयोजनावर २ कोटी रुपये खर्च केले जातील``
क्रीडामंत्री गावडे पुढे म्हणाले, की ``गोमंतकीय फुटबॉलला पुनरुज्जीवित करणे आणि राज्यातील फुटबॉल खेळाचा दर्जा उंचावणे हे आमचे ध्येय आहे. अशाप्रकारच्या उच्च दर्जाच्या स्पर्धा आयोजित केल्याने आमच्या स्थानिक खेळाडूंना अनमोल अनुभव आणि व्यासपीठ उपलब्ध होईल, जेणेकरून ते मोठ्या पातळीवर गोव्याचे, तसेच भारताचे प्रतिनिधित्व करु शकणारी गुणवत्ता प्रदर्शित करू शकतील.``
भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेच्या मुख्य फेरीत एकूण आठ संघ खेळतील. त्यापैकी एक संघ गोवा प्रो-लीग स्पर्धेतील असून तो पात्रता फेरीतून आलेला असेल. संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली असून गटातील अव्वल संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. अ गटात एफसी गोवा, ब्रिस्बेन रोअर एफसी, धेंपो स्पोर्टस क्लब व पात्रता फेरीत संघ, तर ब गटात ओडिशा एफसी, चेन्नईयीन एफसी, चर्चिल ब्रदर्स व क्लब देपोर्तिव्हा डिफेन्सा जस्टिसिया हे संघ आहेत. विजेत्या संघाला १५ लाख रुपये व चषक तर उपविजेत्या संघाला ८ लाख रुपये बक्षिसादाखल दिले जातील. या व्यतिरीक्त वैयक्तीक बक्षिसेही आहेत.
गोवा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष कायतान फर्नांडिस म्हणाले, की सामन्यांसाठी तिकीट असेल. त्यांचा दर अनुक्रमे १०० रुपये व २०० रुपये राहील आणि तिकीट विक्री २३ ऑगस्टपासून पणजीतील जीएफए कार्यालय, फातोर्डा स्टेडियम व धुळेर स्टेडियम येथे होईल. दर्जेदार फुटबॉलचा आस्वाद घेण्यासाठी फुटबॉलप्रेमींनी मोठ्या संख्येने स्टेडियमवर यावे. पालक व शाळांनी मुलांना सामन्यांसाठी पाठवावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.