Renuka Mata History  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Renuka Devi History: यल्लम्मादेवी! नरसंहारातील पीडित समुदायांची तारणहार

History of Yallamma temple: सावदत्ती (सौंदत्ती) जवळील यल्लम्मा गुडी येथे जे मंदिर आहे, ते माता रेणुकेच्या मातुल घराण्यातील किंवा ज्यांची कुलदेवता रेणुका आहे, अशा एखाद्या राजाने बांधले असावे.

गोमन्तक डिजिटल टीम

तेनसिंग रोद्गीगिश

सावदत्ती (सौंदत्ती) जवळील यल्लम्मा गुडी येथे जे मंदिर आहे, ते माता रेणुकेच्या मातुल घराण्यातील किंवा ज्यांची कुलदेवता रेणुका आहे, अशा एखाद्या राजाने बांधले असावे. सावदत्ती हा प्रदेश रट्ट राजघराण्याची राजधानी होता आणि जमदग्नींचा आश्रमही तिथेच होता. या दोन गोष्टी लक्षात घेतल्या तर जमदग्नींवर हल्ला करणारा राजा रट्ट घराण्याचा असण्याची शक्यता बळावते. जर खरोखरच तसे असेल, तर त्या घराण्यातील राजाने रेणुकेसाठी मंदिर बांधणेही स्वाभाविक आहे.

सावदत्ती ही इ.स. ८७५ ते १२३० या कालावधीत साधारणतः रट्टांची राजधानी होती. रिऊ यांच्या म्हणण्यानुसार, रट्ट हे राष्ट्रकूटांचे मांडलिक होते. राष्ट्रकूट साम्राज्याच्या ऱ्हासानंतर, त्यांनी कल्याणीच्या चालुक्यांचे मांडलिकत्व (इ. स. ९७३-११७०) अंगीकारले.

बाराव्या शतकाच्या अखेरीस ते स्वतंत्र झाले. राष्ट्रकूट-रट्ट संबंधांचा भक्कम पुरावा नाही, तरी रट्ट हे प्रथम राष्ट्रकूटांचे आणि नंतर चालुक्यांचे मांडलिक होते, हे सिद्ध झालेले सत्य आहे.

शिलालेखांच्या आधारे रिऊ यांनी निष्कर्ष काढला की रट्ट कुळाच्या दोन शाखा होत्या. पहिली शाखा मेरडपासून सुरू होऊन शांतिवर्मनवर संपते. दुसरी नन्नापासून सुरू होऊन लक्ष्मीदेव द्वितीयवर संपते. या दुसऱ्या शाखेतील चौदा राजांपैकी चार जणांचे नाव कार्तवीर्य होते. (संदर्भ : रिऊ, १९३३ : हिस्टरी ऑफ द राष्ट्रकूटाज, १००).

जमदग्नीच्या आश्रमातून कामधेनू पळवून नेणाराही सहस्रार्जुन कार्तवीर्य होता. याच कार्तवीर्याच्या मुलांनी तो आश्रमही उद्ध्वस्त केला होता.

आता एक शक्यता अशीही असू शकते, की रट्ट घराण्यात जन्मलेल्या अनेक कार्तवीर्यांपैकी तर तो एक असावा. सावदत्ती ही रट्ट कुळाची राजधानी होती व जमदग्नींचा आश्रमही तिथेच होता, या दोन गोष्टी पुन्हा विचारात घेतल्या तर या शक्यतेस पुष्टी मिळते.

कर्तवीर्याने कामधेनू नेण्याचा प्रयत्न केला, ही घटना प्रत्यक्ष नसून एखाद्या प्रतीकात्मक अर्थाने - म्हणजेच त्या राजाने रेणुकेला ‘वाचवण्याचा’ (मुक्त करण्याचा) प्रयत्न केला - असेही असू शकेल का?

जर रेणुका ही खरोखर स्थानिक राणी होती, तिच्या प्रजेसाठी उभे राहणे आणि ब्राह्मणांकडून होणाऱ्या राजकीय, सांस्कृतिक आणि आनुवंशिक आक्रमणापासून त्यांचे रक्षण करणे, हेच तिचे धर्मकर्तव्य ठरते. विशेषतः उपरोक्त संदर्भात महाभारतातील उल्लेख महत्त्वाचा ठरतो :

‘... त्या वेळी जेव्हा पृथ्वी क्षत्रियविरहित झाली होती, तेव्हा क्षत्रिय स्त्रिया संतानप्राप्तीसाठी ब्राह्मणांकडे जात असत, आणि कठोर व्रतांचे पालन करणारे ब्राह्मण त्यांच्याशी संबंध ठेवत असत ...’ (संदर्भ : महाभारत, आदिपर्व : आदिवंशावतार उपपर्व, १-१९).

या क्षत्रियवधाच्या आणि त्यांच्या स्त्रियांच्या अपमानाच्या घटनांचा आणि दक्षिणेतील त्या पतित स्त्रीसमूहाचा काही संबंध असू शकेल का? ज्यांच्या संतती आज सावदत्ती आणि इतरत्र ‘जोगप्पा’ व जोगम्मा’ (जोगत्या व जोगतीण) म्हणून जगतात. त्यांच्यावर यल्लम्मा / रेणुका यांचा भार येतो.

या घटनेवर अनेक अभ्यास झाले आहेत; परंतु कुणालाही ही गुंतागुंत नीट सोडवता आली नाही. मलाही निश्चित उत्तर सापडेल, अशी अपेक्षा नाही. अखेरीस एक स्पष्ट चित्र तयार होईल या आशेने काही बिंदू जोडत जाणे, पैलू उलगडणे निश्‍चितच शक्य आहे.

कुष्ठरोग आणि बरे होण्यास कठीण त्वचारोग यांमुळेच लोक यल्लम्मा देवीला शरण जातात, असे सांगितले जाते. देवी स्वतः जामदग्नींच्या शापामुळे या भयंकर रोगाने ग्रस्त झाली होती, अशी समजूत आहे. येथे ‘कुष्ठरोग’ हा प्रत्यक्ष वैद्यकीय अर्थाने घ्यायचा का, की तो नेहमीप्रमाणे सर्व समाजात असलेल्या एका सामाजिक कलंकाचे प्रतीक आहे?

जरी तो फक्त मानसिक स्तरावर असला तरी, जामदग्नी ऋषींनी रेणुकेस दिलेला शाप तिच्या पतित होण्याचे किंवा तिच्या हरवलेल्या पातिव्रत्याचे प्रतीक आहे का? ज्यांचे पती युद्धात ठार झाले आणि ज्यांच्यावर त्यानंतर अपमानित, अपवित्र होण्याचे संकट ओढवले, अशा असंख्य स्त्रियांच्या स्थितीचे प्रतीक असू शकेल का? अशा स्थितीत त्यांना समजून घेणारी, त्यांचे रक्षण करणारी एकच व्यक्ती होती - त्यांची राणी रेणुका. आजही त्या सर्व तिच्या आश्रयाला जातात.

हीच भावना एका जोगतीणी(जोगम्मा)च्या शब्दांत व्यक्त होताना दिसते. रॅमबर्ग यांनी उद्धृत केलेले वाक्य असे आहे :

‘तीच माझा नवरा आहे, ती माझी काळजी घेते.’ (संदर्भ : रॅमबर्ग, २०११ : व्हेन द देवी इज युवर हजबंड : सेक्रेड मॅरेज अँड सेक्ष्युअल इकॉनॉमी इन साऊथ इंडिया, इन फेमिनिस्ट स्टडीज, खंड ३७, क्रमांक १, पृ. २८).

रेणुका / यल्लम्मा हिची गोष्ट ही एका व्यक्तीची गोष्ट नसून संपूर्ण समुदायाची कहाणी असल्याचे दिसते. ही शोकांतिका संपूर्ण दख्खनातील क्षत्रिय समाजावर आली नसावी किंवा तिची तीव्रता सगळीकडे सारखीच नसावी. आपल्याकडे दख्खनच्या इतर भागांबद्दल पुरावे नाहीत, पण यल्लमाची कथा सावदत्ती परिसरातील - आधुनिक महाराष्ट्र-कर्नाटक सीमेजवळील - ब्राह्मण आणि दख्खनी क्षत्रिय संघर्षाचा समाजावर झालेल्या परिणामांची कल्पना देते.

तरीसुद्धा, या भागात जे सत्य आहे, ते इतर दख्खन भागांबद्दल कमी-अधिक प्रमाणात खरे असावे. यल्लमाचा पंथ उत्तरी कर्नाटक, पश्चिम आंध्र प्रदेश आणि दक्षिण महाराष्ट्र या प्रदेशांत पसरलेला आहे. (संदर्भ : रॅमबर्ग, २०१४ : गिव्हन टू द गॉडेस - साऊथ इंडियन देवदासीज अँड द सेक्ष्युुॲलिटी ऑफ रिलिजन, पृ. ५)

परशुरामाची कथा युद्धांविषयी फार काही सांगत नाही; खरं तर ती दोन्ही बाजूंविषयी काहीच सांगत नाही. आपल्याला माहीत असलेली नावे फक्त दोन - परशुराम आणि कार्तवीर्य सहस्रार्जुन. परंतु स्पष्टच आहे की ब्राह्मणांच्या बाजूने परशुरामाच्या नेतृत्वाखाली अनेक योद्धे लढत होते;

आणि त्यांच्याविरुद्ध दख्खनातील अनेक क्षत्रिय सरदार लढत होते. आपल्याला जेवढे माहीत आहे तेवढेच - या युद्धाचा निकाल असा लागला की दख्खनी क्षत्रियांचा पूर्ण पराभव झाला: पृथ्वी क्षत्रियरहित झाली.

पण, प्रदेश नि:क्षत्रिय होणे हा कदाचित या संघर्षाचा हा सर्वांत वाईट व एकमेव परिणाम नव्हताच. पुढील दीड हजार वर्षांत अनेक राजे उभे राहिले आणि त्यांनी आपली सत्ता दूरवर पसरवली.

पण जे उभे राहू शकले नाहीत त्या दख्खनी क्षत्रियांच्या बहुसंख्य जनसमुदायाला सामाजिक उतरंडीच्या तळाशी ढकलण्यात आले. ते शूद्र, दलित, नीच किंवा अस्पृश्य बनले. जे उंचावले, तेसुद्धा ब्राह्मणांच्या वर्चस्वाखालीच राहिले. दख्खनी क्षत्रियांच्या सामाजिक-आर्थिक पतनाच्या या संदर्भातच आपण यल्लमाच्या पंथाचा उदय समजून घ्यायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Purple Fest Goa: 'पर्पल फेस्ट'चा तिसरा अध्याय पूर्ण, मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची उपस्थिती!

Rama Kankonkar: ''तपासात कोणत्याही राजकारण्याचे नाव नाही'', रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी पोलिसांचा मोठा खुलासा!

Borim Bridge Issue: बोरी पुलाचा खोळंबा! वाहतुकीसाठी खुला न झाल्याने गोंधळ

Viral Video: "तू इथे आलास तर तुझं मुंडकं कापेन!"; विनातिकीट प्रवास करणाऱ्या शिक्षिकेचा टीटीईला धमकी देणारा दुसरा व्हिडिओ व्हायरल

Rama Kankonkar: 'रामाच्या 'बोलवत्या धन्या'ला शोधा', खासदार तानावडेंचा रोखठोक पवित्रा; म्हणतायत, "हे आरोप निराधार"

SCROLL FOR NEXT