Shivaji Maharaj sculpture in Karnataka History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Shivaji Maharaj: मल्लम्मा देवीच्या पराक्रमाने छत्रपती शिवाजी महाराज थक्क झाले, सन्मानाने संस्थान परत केले; 'युद्धनायक' शिल्पाची कथा

Shivaji Maharaj sculpture in Yadwad Belgaum Karnataka: यादवाड गावाबद्दल आपल्याला किंचितही माहिती पाठ्यपुस्तकात सापडत नाही. आपल्या सगळ्या शिवप्रेमींसाठी अभिमानाची व स्फुर्तिदायक गोष्ट ठरेल, असे या गावात असे काय आहे याचीही कल्पना नाही.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

कर्नाटकातील धारवाड-उप्पिनबेटागेरी रस्त्यापासून १६ किमी दूर अंतरावर यादवाड हे धारवाडच्या उत्तरेस एक छोटेसे गाव. या यादवाड गावाबद्दल आपल्याला किंचितही माहिती पाठ्यपुस्तकात सापडत नाही. आपल्या सगळ्या शिवप्रेमींसाठी अभिमानाची व स्फुर्तिदायक गोष्ट ठरेल, असे या गावात असे काय आहे याचीही कल्पना नाही. यादवाड या छोट्याशा गावातील बसस्थानकापासून जवळच थोड्याच अंतरावर एक हनुमान मंदिर आहे.

१७व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील प्राचीन आणि महत्त्वाच्या कलाकृती असलेले हे साधे हनुमान मंदिर. जरी या मंदिराची रचना नवीन असली तरी पण देवता प्राचीन आहे. या हनुमान मंदिराच्या पायऱ्यांजवळ एका जागेत छोटेसे कोरलेले शिल्प ठेवले आहे. या शिल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे हे कोरीव शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचांच्या हयातीत बनवले गेले होते. बेळवडी संस्थानची राणी मल्लम्मा यांनी छत्रपती शिवरायांच्या हयातीतच हे शिल्प बनवून घेतले. आश्चर्य म्हणजे हे शिल्प आहे साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांचे!

१६७४मध्ये रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर शिवरायांनी स्वराज्याची सीमा वाढवण्यासाठी दक्षिणेवर स्वारी केली. थेट तमिळनाडुतील तंजावरपर्यंत धडक मारून भगवा झेंडा दक्षिणेत फडकावला.

हा दक्षिण दिग्विजय मिळवून छत्रपती शिवाजी महाराज मराठी मुलखाकडे निघाले होते. मोहीम फत्ते करून महाराज आणि त्यांचे सैन्य स्वराज्याकडे परतत होते, तेव्हाचा हा प्रसंग, बेळवडीजवळ महाराज वास्तव्याला पोहोचले, सध्याच्या बेळगाव जिल्ह्यातील बेळवाडी या छोट्याशा राज्यावर ईशप्रभू किंवा येसाजीप्रभू हा बेळवडी संस्थानचा देसाई होता. ईशप्रभू किंवा येसाजीप्रभू यांच्या पत्नी मल्लम्मा या सौंधे संस्थानचा प्रमुख मधुलिंग नायकाची मुलगी, सौंधे राजा मधुलिंग नायकाचे राज्य गोव्याच्या सीमेपर्यंत पसरले होते.

छत्रपती शिवाजी महाराज बेळवडीजवळ वास्तव्याला पोहोचले हे कळल्यावर त्यांना आमंत्रण पाठवण्यात आले. एवढेच नाही तर त्यांच्या स्वागताची तयारीसुद्धा सुरू झाली. याच दरम्यान असा प्रसंग घडला, की स्वागताची तयारी थांबवून थेट, महाराजांच्या सैन्यावर हल्ला करण्याचा निर्णय येसाजीप्रभूंनी घेतला.

महाराजांच्या सैन्याला दूध हवे होते, मात्र बेळवडीतील व्यापाऱ्यांनी ते विकण्यास मनाई केली. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून शिवरायांच्या मावळ्यांनी रात्री गावात घुसून अनेक गाईंचे दूध हिसकावून नेले. या घटनेचा जाब विचारण्यासाठी येसाजीप्रभूनी सिद्धगौंड पाटील यांना सखोजी गायकवाडांकडे पाठवले. पाटील आणि सखोजी हे दोघेही रागीट स्वभावाचे असल्याने, त्यांच्यात बाचाबाची झाली आणि संबंध अधिक बिघडले.

येसाजीप्रभूच्या सैन्याने महाराजांच्या गोटातील बैल चोरले आणि परिस्थिती अधिकच गंभीर झाली. शिवरायांच्या मावळ्यांनी गाईसुद्धा चोरल्या असल्याची अफवा उठवण्यात आली. महाराजांच्या स्वागताची तयारी थांबवून युद्धाची तयारी सुरू झाली. नाइलाजाने मराठा सैनिकांनीसुद्धा प्रतिकार सुरू केला आणि युद्धाला सुरुवात झाली. धारवाडजवळ बैलहोंगल तालुक्यातील पंधरा-वीस गावांच्या बेळवडी संस्थानासोबत मराठा सैनिकांची लढाई झाली.

या लढाईत बेळवडी संस्थानचा प्रमुख येसाजीप्रभू यांचा मृत्यू झाला, त्यामुळे त्यांची पत्नी राणी मल्लम्मा यांनी मराठी सैन्याविरोधात लढा दिला. त्या मुळातच लढवय्या होत्या. त्यांनी हार मानली नाही. अखेर नाइलाजाने शिवरायांनी तोफगोळा वापरण्याची परवानगी दिली. गडाची तटबंदी पाडण्यात आली. गडावर महाराजांच्या मावळ्यांनी ताबा मिळवला मात्र, राणी मल्लम्मा तिथून निसटला होत्या. सखोजी गायकवाडांसह महाराजांचे सैन्य त्यांच्या मागावर गेले. स्त्रियांच्या सैन्याला हाताशी धरून मल्लम्मा देवी यांनी मोठा प्रतिकार केला. त्या प्राणपणाने लढल्या. मराठा सैन्याला स्त्रियांच्या सैन्याने खऱ्या अर्थाने झुंजवले. अखेर त्या मावळ्यांच्या हाती लागल्या. राणी मल्लम्माला मराठा सैनिकांनी पकडून शिवरायांसमोर पेश केले.

एका महिलेला समोर पाहून छत्रपती शिवाजी महाराज आश्चर्यचकित झाले. त्यानंतर त्यांना कळले की, संस्थानिक येसाजीप्रभू यांचा लढाईत मृत्यू झाला आहे व त्यांची पत्नी राणी मल्लम्मा यांना मराठा सैन्याविरोधात लढाईत पकडल्या गेल्या होत्या.

एका नारीला बेड्या ठोकणे महाराजांच्या नियमात बसत नव्हते. याशिवाय, सखोजी यांनी राणी मल्लम्मा यांच्यासह सैन्यातील इतर स्त्रियांची अब्रू लुटण्याचा प्रयत्न केला होता. ही चूक छत्रपती शिवाजी महाराजांनी खपवून घेतली नाही. सखोजी यांना शासन करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजानी खेद व्यक्त करत मल्लम्मा यांना बहीण मानून संस्थान मोठ्या सन्मानाने परत करण्यात आले. शिवाजी महाराजांप्रति राणी मल्लम्मा देवी यांना असलेला आदर या घटनेमुळे अधिकच वाढला. शिवरायांच्या या कृतीमुळे भारावून गेलेल्या मल्लम्मा यांनी महाराजांचे शिल्प कोरून घेतले. यादवाड येथे मल्लम्मा यांनी शिवरायांचे ‘युद्धनायक’ हे शिल्प साकारले आहे. अशी शिल्पे राणीने इतर ठिकाणीही पाठवली होती.

यादवाडमधील शिल्पात छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर स्वार होऊन आपल्या सैनिकांसह कूच करताना दिसतात. त्यांच्या एका हातात तलवार व दुसऱ्या हातातही शस्त्र आहे. त्यांच्यासोबत एक श्वानही चालले आहे. तसेच शिल्पाच्या खालच्या भागात दुसऱ्या एका शिल्पात शिवराय हातात एक वाटी धरून मल्लमाच्या मुलाला दूध पाजत आहेत. तो शिवरायांच्या मांडीवर बसलेला दिसतो. मल्लमाही जवळच उभी दिसते. शिवाजी महाराजांच्या दयाळूपणाचा आदर करून राणी मल्लम्मा यांनी हे शिल्प बनवले. याशिवाय महाराजांचे मंदिरसुद्धा राणी मल्लम्मा देवी यांनी बांधून घेतले होते असे म्हटले जाते. ‘सावित्री शिवाजी समारोत्सव’ अशा नावाचा एक ग्रंथही कानडी भाषेत त्यांनी लिहून घेतला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT