नारायण आशा आनंद
गोव्याच्या इतिहासात ‘कदंब काळ’ हा सुवर्णकाळ होता, असे नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र ८० च्या दशकाला कोणी सुवर्णकाळ वगैरे ठरविल्याचे ऐकिवात नाही. असे असूनही इतक्या मोठ्या संख्येने लोकांना ८० च्या दशकात जगण्याची इच्छा व्हावी हे कोडेच आहे.
सध्या ८० च्या दशकात वावरल्यासारखे वाटते आहे. आपल्या आजूबाजूचे अनेक जणही ८० च्या दशकात वावरत आहेत. भूतकाळात रमणे हा एक मानवी गुण आहे. मात्र त्या गुणाानुसार भूतकाळात जाताना माणसाचे वय देखील काळानुरूप कमी होत जात असते. हा ट्रेंड वेगळा आहे. आत्ता या क्षणी आजूबाजूला ८० चे दशक असते तर काय झाले असते, अशी एक कोमल भावना या ट्रेंडच्या मुळाशी असलेली दिसते. भूतकाळात एखादा सुवर्णकाळ शोधण्याची काही विशेष लोकांमध्ये दिसून येणारी भावनासुद्धा आपल्या परिचयाची आहे. ‘वैदिक काळ’ अथवा ‘गुप्त काळ’ हे सुवर्णकाळ मानणारी एक परंपरा आहे.
गोव्याच्या इतिहासात ‘कदंब काळ’ हा सुवर्णकाळ होता, असे नुकतेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र ८० च्या दशकाला कोणी सुवर्णकाळ वगैरे ठरविल्याचे ऐकिवात नाही. असे असूनही इतक्या मोठ्या संख्येने लोकांना ८० च्या दशकात जगण्याची इच्छा व्हावी हे कोडेच आहे. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व बहुमत मिळाले होते. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांना ८०च्या दशकात जावेसे वाटणे समजण्यासारखे आहे. मात्र, त्याच निवडणुकीत भाजपला दोनच जागा मिळालेल्या होत्या. असे असूनही बहुसंख्य भाजप नेत्यांनाही ८० चे दशक आवडते आहे. विचित्र सामाजिक वर्तनामागे एखादा थोर विचार नक्कीच असणार.
८०च्या दशकाचे देशाच्या इतिहासात निश्चितच महत्त्व आहे. ८० च्या दशकात देशातील सार्वजनिक जीवनाने वेगळे वळण घेतले. ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही ८० च्या दशकातच रंगीत झाला. मारुती ८०० रस्त्यावर धावू लागली तीही ८०च्या दशकातच. ८० च्या दशकातच कॉम्प्युटर आला. भारतीय जनता पक्षाची स्थापनादेखील ८० च्या दशकाच्या सुरुवातीला झाली. त्यावेळी ‘गांधीवादी समाजवाद’ ही त्यांनी आपली विचारसरणी म्हणून घोषित केली होती. यावरून सध्या ट्रेडिंग असलेले ८०चे दशक किती वेगळे असावे याची कल्पना येऊ शकते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची १९८४ मध्ये हत्या झाली.
पाठोपाठ पंजाबमध्ये दंगे झाले. अशा पार्श्वभूमीवर राजीव गांधी अभूतपूर्व बहुमताने पंतप्रधान म्हणून निवडून आले व पुढच्या निवडणुकीत पुन्हा सत्ताधारी काँग्रेसची धूळधाण झाली ती ८० च्या दशकातच. मधल्या पाच वर्षात राजीव गांधी यांनी अर्थव्यवस्थेचे खासगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरण करणाच्या दिशेने सुरुवातीची पाऊले टाकली. शाह बानो खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल प्रभावहीन करणारा कायदा आणला. मंडल आयोगाच्या शिफारसीनुसार अन्य मागासवर्गीयांना २७ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे व्ही. पी. सिंग यांचे सरकार ८० च्या दशकाच्या अखेरीस सत्तेत आले. १९४९ मध्ये अयोध्येतील बाबरी मशिदीत रामलल्लाच्या मूर्ती ठेवल्या गेल्यापासून सुरू असलेल्या न्यायालयीन झगड्याला ८०च्या दशकाच्या मध्यापासून विश्व हिंदू परिषदेने राष्ट्रीय मुद्दा बनवले होते.
व्ही.पी. सिंग सरकारने आरक्षणाची घोषणा करताच, अन्य मागासवर्गींच्या आरक्षणाला विरोध असणाऱ्या भाजपने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वात राम रथयात्रा सुरू केली. रथयात्रे दरम्यान अनेक ठिकाणी धर्मनिष्ठ लोक त्यांची पूजा करायचे. रथयात्रेमुळे देशात अनेक ठिकाणी दंगे झाले. ९०च्या दशकाच्या आरंभी ही रथयात्रा सुरू होण्यापूर्वी टीव्हीवर रामानंद सागर यांचे रामायण प्रसारित झाले होते. ज्यांच्या घरात टीव्ही होता त्यांना अतोनात महत्व प्राप्त झाले. रविवारी त्यांच्या घरी गर्दी जमायची. रामानंद सागरांचे रामायण घराघरात पोचले. यात रामाची भूमिका अरुण गोविल यांनी केली होती. अडवाणी आज कुठे दिसत नाहीत. अरुण गोविल मीरत मधून भाजपचे खासदार असले तरी तेही त्यांच्या मतदारांनाही सहसा दिसत नाहीत. दिसत नसले तरी दोघांचेही अस्तित्व आजही जाणवत राहते.
८० च्या दशकाचे एक वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्यानंतरचा ८० च्या दशकापर्यंचा काळ हा असा होता जेव्हा भारत देशातील आर्थिक विषमता कमी होत गेली. ८० च्या दशकाच्या मध्यापासून ती पुन्हा वाढू लागली व २०२३ पर्यंत ती १९२२ मध्ये देशात जेवढी आर्थिक विषमता होती त्याहून जास्त झाली. १९८२ मध्ये आर्थिकदृष्ट्या वरच्या दहा टक्के लोकांचा देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात वाटा ३० % इतका होता. आज देशातील दहा टक्के लोकांचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा ६०% इतका झालेला आहे. त्यानंतरच्या ४०% लोकांचा एकूण उत्पन्नातील वाटा आज २७ % इतका आहे. ८० च्या दशकात तो ४४ टक्के होता. २००० नंतर वरच्या दहा टक्के लोकांचे उत्पन्न त्यानंतरच्या ४०% लोकांच्या उत्पन्नापेक्षा जास्त होऊ लागले.
अगदी वरच्या एक टक्क्यांचा विचार केला तरी असे दिसते की त्यांच्यामधील जास्त श्रीमंत अधिक जास्त श्रीमंत होत आहेत मात्र त्यांतील कमी श्रीमंत तेवढे जास्त श्रीमंत होऊ शकत नाहीत. म्हणजे विषमता टिकवण्याचे तत्व समतेने लागू केले गेले. आर्थिक उत्पन्नातील वरच्या १% चा वाटा जो १९५० मध्ये १३ टक्के होता तो ८० च्या दशकापर्यंत पाच टक्क्यावर खाली आला त्यानंतर नव्या आर्थिक धोरणांबरोबर साल २००० पर्यंत तो दुप्पट होऊन दहा टक्क्यांवर पोहोचला. ८०चे दशक संपेपर्यंत भारतात एकच अब्जाधीश होता आज देशी अब्जाधीशांची संख्या २०० हून अधिक झालेली आहे. आणि त्याच वेळी ९० कोटी प्रौढ भारतीयांची मासिक कमाई २० हजारहून कमी आहे.
८० चे दशक सुरू होण्याआधी १९७६ मध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीद्वारे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत भारतीय राज्याच्या वर्णनात सोशलिस्ट(समाजवादी) आणि सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) विशेषणांचा अंतर्भाव करण्यात आला होता. समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दोन्ही तत्त्वांच्या विरोधी विचाराने भारतीय भूमीत मूळ धरले ते ८० च्या दशकात. ९० च्या दशकाच्या सुरुवातीला एकीकडे ८० च्या दशकात थोडीशी पुढे आलेली ‘खाउजा’ धोरणे ९० च्या दशकाच्या सुरुवातीपासून व्यापक स्तरावर लागू झाली. दुसरीकडे बाबरी मशीद पडण्याची घटना घडली.
९०च्या दशकात एका कार्यक्रमात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी एका मुलीला तिची महत्त्वाकांक्षा काय आहे, असे विचारले असता त्या मुलीने मला ‘विकसित’ भारतात राहायचे आहे, असे सांगितले होते, असे म्हणतात. त्यावरून इंडिया २०२० हा विकसित भारताचा पक्का आराखडा पुस्तक रूपाने साक्षात डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी त्या मुलीला अर्पण केला होता. विकसित भारताचे हे स्वप्न मुख्यतः ८० च्या दशकानेच दाखवले होते. आज २०२० उलटून सहा वर्षे झालेली आहेत. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची त्यांनी कधीही न उच्चारलेली उद्धरणेही आज तळागाळापर्यंत पोचली आहेत. थोडक्यात ८० च्या दशकात दाखवले गेलेले विकसित भारताचे स्वप्न आज पूर्णत्वास गेलेले आहे, असे म्हणणे भाग आहे. बाबरी मशिदीच्या जागी राम मंदिरही उभे झालेले आहे. मंदिर नुसते उभेच झालेले नाही तर ते उत्तम प्रकारे चालले आहे, असे मध्यंतरीच्या बातम्यांवरून कळते.
आर्थिक विषमता टोकाची वाढलेली असली तरीही सर्वांनी गुण्यागोविंदाने समरसतेने नांदावे, असा थोर विचार आपल्या थोर संस्कृतीने दिलेलाच आहे. थोडा रोजगाराचा प्रश्न असला तरी ‘भजी तळणे हाही रोजगार आहे’ हा विचार देखील आपल्याला मिळालेला आहे. (सर्वजण भजी भाजू लागले तर ती खाणार कोण, याचा विचार नंतर करता येऊ शकतो.) एवढे असूनही ते ८० चे दशक आता पुन्हा अधिक रंगीत का वाटावे, हा मोठा गहन प्रश्न आहे. एखाद्या विदेशी कंपनीने एक ट्रेंड सुरू करून कोट्यवधी लोकांना कामाला लावले, असे होऊ शकत नाही. कारण हा विकसित देश आहे. त्यामुळे या ८० च्या ट्रेंड चे कारण काय असावे,याचे नेमके उत्तर हाती लागलेले नाही. तरी त्यामागे एखादा थोर विचार नक्कीच असणार असे गृहीत धरायला हरकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.