Tamil Yeoman butterfly Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Tamil Yeoman Butterfly: गोव्यात बहुतांश देवरायांमध्ये आढळणारा 'खष्ट' वृक्ष, त्यावर दिसणारी 'तमिळ येओमन’ फुलपाखरे

Western Ghats butterflies: पश्चिम घाटाशी संलग्न असलेल्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी फुलपाखरांच्या प्रजातींचा विशेष अभ्यास करून आपले राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे.

Sameer Panditrao

अ‍ॅड. सूरज मळीक

पश्चिम घाटाशी संलग्न असलेल्या गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी फुलपाखरांच्या प्रजातींचा विशेष अभ्यास करून आपले राज्य फुलपाखरू घोषित केलेले आहे. या परिसरातील सदाहरित आणि पानगळतीच्या जंगलात नाना प्रकारच्या फुलपाखरांचे दर्शन घडते ते येथे असलेल्या वैविध्यपूर्ण वृक्षवेलींमुळेच.

गुजरातातील डांगपासून अरबी समुद्राशी समान रेषेत तामिळनाडूपर्यंत विस्तारलेल्या या पर्वत रंगांमध्ये नवनवीन फुलपाखरांची नोंद होत आहे. येथे त्यांचा नैसर्गिक अधिवास आहे. गोव्यात येणारा पश्चिम घाट वन्यजीव अभयारण्य व राष्ट्रीय उद्यानाचा भाग असल्यामुळे या परिसराला पूर्णपणे संरक्षण लाभलेले आहे.

तामिळनाडू या राज्याने २०१९मध्ये ‘तमिळ येओमन’ नामक फुलपाखराची निवड करून त्याला राज्य फुलपाखराचा दर्जा दिलेला आहे.

विद्यार्थी, निसर्ग अभ्यासक, तसेच तेथे वास्तव्य करणार्‍या लोकांना फुलपाखरांचे जीवन एका एका वृक्ष वनस्पतीबरोबर कसे जुळलेले असते याबद्दल जागृती व्हावी म्हणून राज्य फुलपाखराची निवड करून त्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्याकडे लक्ष दिलेले आहे.

जंगलात कोणकोणत्या प्रजातीची झाडे आहेत यावरून तेथे कोणती फुलपाखरे आढळू शकतात याचा अंदाज आपण लावू शकतो. तमिळ येओमन फुलपाखरू हे गोव्यातील स्थानिक फुलपाखरू असून जंगल वाटेने जाताना त्याचे दर्शन घडते.

तमिळ येओमन हे एक केसरी भडक रंगाचे मध्यम आकाराचे फुलपाखरू आहे. त्याच्या पंखाचा विस्तार ६० - ७५ सेमी इतका असतो. फुलपाखरू वृक्ष आच्छादनातील छायेत पानापानांवर थांबत उडताना दिसते.

निसर्ग सहलीला गेल्यावर अधूनमधून एक एक झाड केसरी फुलपाखरांनी गजबजलेले दिसले तर समजावे की तो ‘खष्ट’ नावाचा वृक्ष आहे. कारण या फुलपाखराला जीवन व्यतीत करण्यासाठी खष्टाच्या झाडाची गरज असते.

गोमंतकात तर या वृक्षाला लोकधर्माबरोबर आर्थिकदृष्ट्याही महत्त्वाचे स्थान लाभले आहे. अनेक गावांमध्ये ‘देव वृक्ष’ म्हणून त्याची पूजा केली जाते. गोव्यात १००हून अधिक असलेल्या बहुतांश देवरायांमध्ये हा वृक्ष पाहायला मिळतो. फोंडा तालुक्यातील काही गावांमध्ये कुळागरात या वृक्षाला देवत्व लाभलेले पाहायला मिळते.

खष्ट हे झाड विशेषत: पाणथळ जागेत आढळते. गावातील नदी ओहोळ, झरे, तळी यांच्या काठावर ते दृष्टीस पडते. त्यामुळे ते जणू पाण्याचे सूचक आहे. पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढली तरी ही झाडे आपली पाळेमुळे मातीत घट्ट रोवून उभी राहतात.

नदीच्या ओसंडून वाहणार्‍या पाण्याचा काहीच परिणाम त्यांच्या खोडावर होत नाही. त्यामुळे काठावरील माती, दगड वाहून जाण्याची शक्यता क्वचितच असते. पाण्यातसुद्धा तो तग धरून उभा राहतो, म्हणून त्याला ‘जल सहिष्णू वृक्ष’ असे म्हणतात. त्याच्या खोडाकडे बघितले तर जणू काही भल्या मोठ्या वेली वळणे घेत उंच वाढल्यासारखे दिसते. खोडाचा रंग राखाडी असून सफेद सुळसुळीत असल्यामुळे दुरूनच त्याला ओळखता येते.

तमिळ येओमन हे फुलपाखरू घनदाट जंगलात पाण्याचे स्रोत असलेल्या ठिकाणी आढळून येते. खष्ट हा एक गोव्यातील जंगलात आढळणारे सदाहरित वृक्ष आहे.

सत्तरीपासून काणकोणपर्यंत काही भागात पानगळतीच्या वृक्षांना मागे टाकत या वृक्षांची संख्या जास्त असल्यामुळे घनदाट वृक्ष आच्छादन लाभलेले आहे. गोव्यातील जंगलात या प्रकारच्या इतरही सदाहरित वृक्ष प्रजाती आढळतात त्यामुळे आपण सदाहरित जंगलातील थंडगार वातावरणात असल्याचा भास होतो.

त्यामुळेच काही अभ्यासकांनी गोव्यातील जंगलाला ‘निम्न सदाहरित’ असे म्हटलेले आहे. गोव्यातील मारली या गावातील कर्नाटकजवळील जंगल खष्ट वृक्षांनी समृद्ध असल्यामुळे येथे तमिळ येओमन फुलपाखरे फुलांतून रस चाखताना, तर काही मातीतून क्षारशोषण करताना आढळतात.

सदाहरित वृक्ष कधीही आपली पाने पूर्णपणे जमिनीवर टाकत नाही. परंतु वर्षभर फक्त काही प्रमाणात पाने जमिनीवर पडतात. त्या जागी नवीन पाने येत असल्याने बाराही महिने जंगलातील वृक्ष आच्छादन टिकून राहते. त्यामुळे विविध फुलपाखरांना जीवनचक्र पूर्ण करण्यासाठी पोषक आणि आरोग्यदायक नैसर्गिक परिसंस्था उपलब्ध होते. वर्षातील कुठल्याही क्षणी सुरवंटाला खाण्यासाठी मुबलक प्रमाणात पाने उपलब्ध असतात.

मान्सून ओलांडल्यावर परतीचा पाऊस सुरू होताच भाद्रपद, आश्विन महिन्यांपासून या वृक्षाला चेंडूसारखी तपकिरी फळे लागायला सुरुवात होते.

त्याची बाहेरील साल भरपूर घट्ट असल्यामुळे ती कित्येक दिवस टिकून राहतात. ही फळे जरी कच्ची खाल्ली जात नसली तरी त्यांपासून काढलेले तेल मानवाला आरोग्यवर्धक गुण प्रदान करते. आज खष्टेल नामक जे तेल आपल्या उपलब्ध होते ते याच वृक्षाच्या फळापासून बनवलेले असते. या तेलाचा जैव इंधन म्हणूनदेखील त्याचा विशेष उपयोग केला जातो.

फुलपाखराची मादी या झाडाचा शोध घेऊन पानाच्या खालच्या बाजूला अंडी लावते. सर्व फुलपाखरांना जन्म अंड्यातून होतो, परंतु प्रत्येक फुलपाखराची अंडी लावण्याची विशेष पद्धत असते. काही फुलपाखरे एका पानावर एकच अंडे लावतात, तर काही आपली अंडी एकत्र समूहामध्ये लावतात.

परंतु तमिळ येओमन या फुलपाखराची अंडी लावण्याची पद्धत यापेक्षाही वेगळी आहे. पानाच्या खालच्या बाजूला एक अंडे लावल्यावर त्यावरच एक एक करून ६ - ७ अंडी लावली जातात. त्यामुळे पानाच्या खाली उभ्या रेषेत ती लटकताना दिसतात.

अंड्यातून सुरवंट बाहेर पडल्यावर ते पानाच्या खालच्याच बाजूला राहून पाने खायला सुरुवात करते. फुलपाखरू कितीही सुंदर केसरी रंगाने वेड लावणारे असले तरी त्याचे सुरवंट अगदी कुट्ट काळ्या रंगाचे असून शरीरावर काळे काटेच असतात. त्यामुळे सहज हे कुठल्या तरी पतंगाचेच सुरवंट असल्यासारखे वाटते. कोशित अवस्थेत परिवर्तित झाल्यावर पांढरा आणि केसरी रंग लाभतो व ते फुलपाखराच्या रूपात बाहेर पडते.

फुलपाखरे एकंदर पानाच्या वरच्या भागावर बसून विश्रांती घेतात व रात्रीचे सक्रिय असणारे पतंग पानाच्या खालच्या बाजूला जाऊन बसतात. परंतु हे फुलपाखरू धोका असल्याचे संकेत दिसू लागताच ते पुन्हा पानाच्या खाली येऊन चिकटते. ते कधी जास्त दूर दूरचा प्रवास करत नाही आणि झाडाच्या सावलीतच भरपूर वेळ उडताना आढळते.

तमिळ येओमन हे एक प्रदेशनिष्ठ फुलपाखरू असून ते फक्त भारतातील पश्चिम घाटामध्ये आढळते. त्याच्या पिंगट पंखावर लहान काळे ठिपके असतात, त्यामुळे पंखांवरील किनार, अरुंद काळ्या पट्ट्याने माखलेली असते. पंख पूर्ण ताठ उघडल्यावर दोन्ही बाजूला असलेली चौकोनी पांढरी खूण दृष्टीस पडते. पावसाळ्यात ‘दिणा’ नामक झुडपाला नाजूक पांढरी फुले येतात तेव्हा या फुलातून रस पिण्यासाठी ती समूहामध्ये येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी की गोलंदाजी? भारतासाठी कोणता पर्याय बेस्ट? हाय होल्टेज सामन्याची उत्सुकता शिगेला; जाणून घ्या दुबई पिच रिपोर्ट

Eknath Shinde's 'X' Account Hacked: उपमुख्यमंत्र्यांचे ट्विटर अकाऊंट हॅक; हॅकर्सनी पाकिस्तान, तुर्कीच्या झेंड्याचे फोटो केले पोस्ट शेअर

"मला नोकरांसारखं वागवलं, शिवीगाळ केली", भाजीपाव खाताना पर्यटकाला आला 'वाईट' अनुभव; रेडिटवरील Post Viral

Glowing Mushrooms: सगळीकडे मिट्ट काळोख असताना, 'त्या' झाडावर पांढरा प्रकाश दिसत होता; गोव्याच्या जंगलातील 'चमकणारी बुरशी'

Adhaar Card Free Update: आधार कार्डबाबत सरकारचा मोठा निर्णय, बायोमेट्रिक्स अपडेट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही

SCROLL FOR NEXT