
विकास कुलकर्णी
उन्हाळा भरात आला की आठवण येते ती थंड कुळागरांची…. बालपण जणू पुन्हा माघारी येतं...रातांबे, काजू, करवंदं, कैऱ्या....पण माझ्यावर सर्वात जास्त प्रभाव जर कुणी टाकला असेल, तर तो सुरंगीनं. सुरंगी! एक नाजुक छोटंसं फूल....मार्च महिना आणि कुळागरातील सकाळ म्हणजे मनमोहक सुगंधाने भरलेली वेळ.
सुरंगी हे तळकोकणात आढळणारे सदाहरीत, मध्यम आकाराचे झाड आहे. मार्च-एप्रिल दरम्यान याला फुले येतात. सुरंगीची फुले फुलोर्यात न येता, जुन्या फांद्यांवरच येतात. फुलांना चार पांढर्या पाकळ्या, दोन संदल, खुप पुंकेसर व लांब देठ असतो. याची नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. नर झाडाला ‘सुरंगी’ व मादी झाडाला ‘बुरंगा’ म्हणतात. दोन्ही झाडे दिसायला मात्र सारखीच असतात.
सुरंगीचे शास्त्रीय नाव "मॅमीया सुरीगा" (Mammea suriga) असे आहे. मॅमेय (Mammey) या वेस्ट इंडीज स्थानिक नावावरून व सुरीगे (Surige) या कन्नड नावावरुन सुरीगा या शब्दांची उत्पत्ती झाली. सुरंगीपासून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी लागणारे कष्ट व वेळ यांचे प्रमाण विषम असल्यामुळे व या झाडांबाबत तेवढी जागरुकता नाही व त्यामुळे सुरंगीचा विचार लागवडीच्या दृष्टीने होत नाही.
या झाडाची वाढ खुप हळू होते. त्याच्या वाढीसाठी अनुकूल जमिन व वातावरण लागते. साधारणतः 10-20 वर्षांनी झाड प्रौढ होऊन ते फुलायला लागते. वर्षातून एकदाच व फक्त काही आठवड्यांसाठी बहर येतो. नर व मादी फुले वेगवेगळ्या झाडांवर येतात. ती फुलल्याशिवाय त्यांच्यात भेद करता येत नाही. या सर्व कारणांमुळे सुरंगीची लागवड करणे जोखीमीचे ठरते.
मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आपल्याला बाजारात सुरंगीचे वळेसार घेऊन उभे असलेले विक्रेते दिसतात. वळेसारांची किंमत महाग असते कारण त्यामागचे कष्टही तसेच असतात. सकाळी सूर्य उगवायला लागला की सुरंगीची फुले फुलायला लागतात. वळेसर करायचा असेल तर पहाटे लवकर उठून, झाडावर चढून, न उमललेल्या कळ्या काढून आणावे लागतात. कळ्यांचे देठ खूप नाजूक असल्यामुळे त्यांचे देठ कोचून, भोवतीच्या दोन संदलांच्या देठाभोवती पीळ घातला जातो.
याला "सुरंगीचे कळे पटकळायणे" असे म्हणतात. पटकळायलेल्या कळ्यांचे संदल सुईने दोऱ्यात ओवून वळेसर केला जातो. ही फुले देवाला वाहतात. कोकणातील आरवली गावातील आराध्य दैवत श्री देव वेतोबाला तर सुरंगीच्या माळांच्या अंगरख्याने सजवले जाते.
सुरंगी हा मध्यम आकाराचा १०-२० मी. सरळ उंच वाढत जाणारा सदाहरित वृक्ष आहे. त्याचे खोड बाहेरून खडबडीत, काळपट-करडे व आतून लालसर असून त्याचा घेर १-२ मी. पर्यंत असू शकतो. खोडावर घाव झाल्यास चिकट डिंक येतो. त्याच्या फांद्या जमिनीच्या समांतर पूर्ण खोडाभोवती वाढलेल्या दिसतात.
सुरंगीचे लाकूड खूप टणक व टिकावू असल्याने फर्निचरसाठी वापरले जाते. सुरंगीच्या सुकवलेल्या नर कळ्यांना बाजारात चांगली मागणी असते. झाडावर चढून सगळे कळे काढले जातात. यावेळी झाडाखालची जागा साफ करून सारवले जाते किंवा तिथे कागद, साड्या पसरवले जातात.
त्यानंतर हे कळे गोळा करून, त्यातील कचरा वेचून काढून, ते सुकवून बाजारात विकले जातात. या कळ्यांचा वापर सुगंधी तेल व अत्तर उद्योगात होतो. फक्त सुकवलेल्या नर कळ्यांनाच चांगली किंमत मिळते.
सुरंगी फुलांचा औषधी उपयोग असल्याचा उल्लेख आहे. पश्चिम घाटातील तळकोकण ते उत्तर मलबार व मध्य सह्याद्रीच्या काही भागात सुरंगीचा आढळ दिसतो. गोव्यात शिरोडा , धारबांदोडा, सावइ वेरे, दुर्भाट, बांदोडा, मंगेशी- मार्दोळ अश्या काही मोजक्या गावांत सुरंगीची घनदाट जंगले व देवराया आढळतात. सुरंगी हे सह्याद्रीतील महत्त्वाचे प्राचीन व प्रदेशनिष्ट झाड आहे. निसर्गतः रुजलेली झाडे नगदी कारणामुळे टिकवली जातात मात्र त्यांच्या लागवडीबाबत जागरूकता दिसत नाही. या झाडाविषयी संशोधन होऊन त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.