Vijayanagar Dynasty Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Vijayanagar Empire: राजा हरिहरच्या आदेशाने, बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकले; राजा अच्युतदेवरायाचा दुर्लक्षित इतिहास

Achyutadevaraya History: एवढ्या विशाल साम्राज्याचा महान प्रतापी राजा हरिहर द्वितीय याने १३४४ ते १४०४ या त्याच्या कालावधीत विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विस्तारले.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

विजयनगर राजा कृष्णदेवरायांच्या लिहून ठेवलेल्या श्लोकाप्रमाणे, ‘देशातील लोक जनतेची प्रगती आणि समृद्धी शोधणाऱ्या राजाचे कल्याण इच्छितात.’ भारताच्या इतिहासात, विजयनगर साम्राज्याचे योगदान अतुलनीय. विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दशकांत जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याने जिंकला होता.

१३८० ते १४७० अशी अनेक दशके विजयनगर साम्राज्याने गोव्यावर राज्य केलेे. एवढ्या विशाल साम्राज्याचा महान प्रतापी राजा हरिहर द्वितीय याने १३४४ ते १४०४ या त्याच्या कालावधीत विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विस्तारले. कोकण (कोकण-राज्य), उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड (बाराकुर-राज्य आणि मंगळुरू-राज्य), उत्तर आंध्र (उदयगिरी-राज्य) आणि दक्षिण आंध्र (चंद्रगिरी-राज्य), उत्तर तमिळ (पदैविदु-राज्य), दक्षिण तमिळ (पांडिया-राज्य) आणि पूर्व तमिळ (मुलुवाई-राज्य) एवढा मोठा राज्यविस्तार झाला.

सुरुवातीला प्रांतांचे प्रशासन मोठ्या प्रमाणात विकेंद्रित करण्यात आले. जिंकलेल्या क्षेत्रांना स्थानिक सरदारांच्या आधिपत्याखाली सामंत म्हणून राज्य करण्याची परवानगी होती.

तथापि, जसजसा काळ बदलत गेला, विजयनगर (आज जे हंपी म्हणून ओळखले जाते) या त्यांच्या भव्य राजधानीच्या शहरातून बाहेर पडून, त्यांच्या प्रजेवर नियंत्रण मजबूत करण्यासाठी केंद्रीकरण केले गेले; त्याच हेतूने, २९ ऑगस्ट १३८० रोजी हरिहर द्वितीय याच्या आदेशाने बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच मल्लप्पा वोडेयर म्हणजेच विरा वसंत-माधव राया (माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला, ज्याची राजधानी गोपकपट्टण किंवा गोवा होती.

माधव मंत्री त्या पूर्वी एकाच वेळी बाराकुर-राज्य (दक्षिण कन्नड) आणि उत्तर कन्नडाचा राज्यपाल म्हणून काम पाहत असे. विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर द्वितीयच्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्याने संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले.

हंपी येथील राम मंदिराला आज ‘हजारा राम मंदिर’ असे म्हणतात कारण त्याच्या भिंतींवर रामायणातील प्रसंगांचे वर्णन करणारे हजारो दगडी शिल्पे आहेत. कृष्णदेवरायाच्या आधी आणि त्याच्या आधीच्या अनेक राजांनी मंदिराच्या स्थापत्यकलेमध्ये योगदान दिले होते. दशरथ राजाने श्रावणबाळाला मारले व त्याच्या आईवडिलांनी शाप दिला तेव्हापासूनच्या प्रसंगाचे वर्णन देवळातल्या भिंतींवर कोरण्यात आले आहे.

पुत्रकामेष्टी, पुत्रप्राप्ती, पुत्रवियोग वगैरे क्रमाने येणाऱ्या कथा कोरण्यात आल्या आहेत. ही कथा राजेशाही सत्तेच्या मर्यादांची आठवण करून देते. कितीही शक्तिशाली राजा असला तरीही एका नाराज शक्तीहीन निष्पाप व्यक्तीच्या वेदना सत्तेच्या सर्वांत उच्च पदावर असलेल्या संरचनांवर काय परिणाम करू शकतात, यांचे हे भित्तिचित्र ज्वलंत उदाहरण.

कारण राजाला पाहिजे असते तर शिल्पकाराला श्रीरामाच्या जन्मापासून सुरुवात करण्यास सहज सांगू शकला असता पण त्याने एका पूर्णपणे शक्तीहीन वृद्ध अंध जोडप्याने दशरथास दिलेल्या शापाने दगडी भिंतीवरील भित्तिचित्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. यातच आपल्याला राजेशाही सत्तेच्या मर्यादांची आठवण करून देते.

काहीशी अशीच गोष्ट राजा कृष्णदेवरायांचा उत्तराधिकाऱ्यांबाबतीत घडली. कृष्णदेवरायांच्या विजयी कारकिर्दीत ते शिखरावर पोहोचले होते. तथापि, त्यांच्या नंतरच्या विजयनगरच्या इतिहासाकडे दुर्लक्ष केले गेले. उत्तराधिकाऱ्यांना कमकुवत आणि अक्षम म्हटले गेले.

पण खरा इतिहास इतकी वर्षे लपवून ठेवूनसुद्धा इतिहासातील पुरावे वेगळेच सांगतात. राजा कृष्णदेवरायांनंतर असेच एक योग्य उत्तराधिकारी राजा अच्युतदेवरायही होते. राजा कृष्णदेवरायांनंतर, जर असा कोणी राजा असेल ज्याने साम्राज्याचे वैभव जपले आणि त्याच्या शत्रूंमध्ये भीती निर्माण केली असेल तर तो अच्युतदेवराय होता. तो एक चांगला प्रशासक आणि कलांचा संरक्षकदेखील होता.

अच्युतदेवरायचा जन्म नरस नायक आणि ओबामबिका यांच्या पोटी झाला. तो राजा कृष्णदेवरायाचा धाकटा सावत्र भाऊ. राजा अच्युतदेवरायची जन्मतारीख आणि जन्मवर्ष याबद्दल कोणताही विशिष्ट उल्लेख नाही. बालपणी त्याला राजकारण, धर्मशास्त्र आणि सर्व प्रकारच्या शारीरिक प्रशिक्षणाचे आवश्यक शिक्षण देण्यात आले. अच्युतदेवराय किशोरावस्थेत असताना नरस नायकचा मृत्यू झाला.

अच्युतदेवरायने त्याचा मोठा सावत्र भाऊ वीर नरसिंहाच्या अनेक लष्करी मोहिमांमध्ये आणि नंतर कृष्ण देवराय विजयी होण्यामध्ये त्यांना मदत केली.

१५२४मध्ये राजा कृष्णदेवराय यांचा पुत्र युवराज तिरुमला राय यांच्या मृत्यूनंतर, राजा कृष्णदेवरायांना उत्तराधिकारी म्हणून विचार करावा लागला. त्यांनी त्यांचा धाकटा सावत्र भाऊ अच्युतदेवराय यांची निवड केली.

हीच होती त्यावेळीची राजेशाही सत्तेची मर्यादा. कारण त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना १५२६पासून अच्युतदेवरायला त्यांच्या वतीने राज्य करण्याची परवानगी द्यावी लागली.

पेनुकोंडा कैफियत आणि काही शिलालेख यांसारख्या समकालीन स्रोतांमध्ये १५२६पासून अच्युतदेवरायच्या सह-शासनाचे उल्लेख सापडतात. त्यांच्या मागील कामगिरी आणि क्षमतांमुळे अच्युतदेवरायाबद्दल राजा कृष्णदेवरायला पूर्ण विश्वास होता.१५२९मध्ये राजा कृष्णदेवराय यांचे निधन झाले. त्यावेळी अच्युत राय तेलुगू देशात होते.

ही बातमी ऐकून ते हंपीकडे आले. ते प्रथम तिरुपती येथे कुलदेवतेचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले जिथे त्यांचा राज्याभिषेक झाला. त्यानंतर कालहस्ती येथे जाऊन त्यांचा पुन्हा राज्याभिषेक झाला. अखेर ते नोव्हेंबर १५२९मध्ये विजयनगर येथे पोहोचले जिथे त्यांनी त्यांचा राज्याभिषेक मोठ्या थाटामाटात आणि भव्यतेने साजरा केला. राजघराण्यातील मतभेद टाळण्यासाठी त्यांनी कृष्णदेवरायांचे जावई रामराय यांच्याशी करार केला ज्याद्वारे रामराय साम्राज्याच्या प्रशासनात त्यांचे भागीदार होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

SCROLL FOR NEXT