गेल्या लेखात आपण पाहिले, की वेदारसोबत वेतुवन, इरुला आणि कुरुंबर हे तीन समुदायही एकाच आदिवासी समुदायाचा भाग असल्याचे दिसते. थर्स्टनच्या मते, वेतुवन प्रामुख्याने पूर्वीच्या मद्रास प्रेसिडेन्सीच्या सेलम, कोइम्बतूर आणि मदुराई जिल्ह्यांमध्ये होते आणि थोड्या प्रमाणात मलबार आणि दक्षिण कन्नडमध्येदेखील होते.
(संदर्भ : थर्स्टन, १९०९: कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया, खंड ७, ३९४) ते कंडीअम्मा नावाच्या देवतेची पूजा करतात, या देवतेचे साधर्म्य ‘कांडीयका’(गिरिधर) या श्रीलंकेतील वेद्दा जमातीच्या देवतेशी असू शकते. मलबार वेतुवन महिलांच्या पोशाखात लांब पानांचे तीन गुच्छ असतात, जे कमरेपासून लटकलेले असतात आणि कंबरेने बांधलेले असतात. (संदर्भ : थर्स्टन, १९०९: कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया, खंड ७, ३९५)
स्टुअर्टच्या मते, आदिम मानवी समुदायाची वैशिष्ट्ये इरुलांमध्येही आढळतात. पर्णांचे वस्त्र पांघरणारी ही जमात बदलत्या हवामानातही तग धरून राहते. अगदी नवजात अर्भकासही निसर्गाला सहन करण्याची शक्ती अशाच अवस्थेतून प्राप्त होते. अन्य आदिवासी, वनवासी समुदायांप्रमाणे इरुलामध्ये सप्तमातृकांचे पूजन होते. ज्याप्रमाणे वेतुवन कंडीअम्माची पूजा करतात तसेच इरूलाही कनिअम्मा नावाच्या देवतेची पूजा करतात. (संदर्भ : स्टुअर्ट, १८९५: मद्रास डिस्ट्रिक्ट मॅन्युअल्स - साउथ आर्कोट, खंड १, २४९).
एकीकडे श्रीलंकेतील वेदार/वेद्दा आणि दुसरीकडे वेतुवन आणि इरुला यांच्यात बरेचसे साम्य असल्याचे दिसून येते. हे तिघेही एकाच वांशिक समूहाचा भाग असावेत. हे महत्त्वाचे आहे कारण कुलतिलकेच्या मते, या बेटावरील मूळ नवपाषाण समुदायापासून ते २६,००० -५,००० ईसापूर्व एवढ्या मोठ्या कालावधीत वेद्दा किंवा वानिया-लेतो यांची सरळ वंशवेल चालत आलेली आहे.
(संदर्भ : कुलतिलके, २०१६: द पीपलिंग ऑफ श्रीलंका फ्रॉम प्रीहिस्टोरिक टू हिस्टोरिक टाईम्स - बायोलॉजिकल अँड आर्कियोलॉजिकल एव्हिडन्स, इन कम्पॅनियन टू साउथ एशिया इन द पास्ट, ४२९).
कुलतिलके ज्याला ‘ओरिजिनिल निओलिथिक कम्युनिटी’(मूळ नवपाषाणकालीन समुदाय) संबोधतात ते लोक म्हणजे पूर्वेकडे पुढे सरकताना या प्रदेशात राहण्यासाठी आलेल्या सर्वात जुन्या एएमएचचे वंशज असू शकतात. म्हणूनच श्रीलंकेतील वेद्दा, भारतीय द्वीपकल्पातील वेतुवन आणि इरुला हे खरे येथील ‘आदिवासी’ आहेत, असे मानण्यास हरकत नाही.
तथापि, कुरुंबर हे एक कोडे आहे; किमान सध्या तरी, त्यांना श्रीलंकेतील वेदार/वेद्दा यांच्याशी जोडण्याइतपत पुरेसे संदर्भ, पुरावे नाहीत. कुरुंबर हा एक वेगळा वर्ग आहे की नाही हे सांगणेदेखील शक्य नाही.
अनुनासिक निर्देशांकातील फरक जसा थर्स्टन यांनी नोंदवला आहे, तसा त्यांच्यातील अनेक फरकांचा उल्लेख अनेकांनी केला आहे. (संदर्भ : थर्स्टन, १९०९: कास्ट्स अँड ट्राइब्ज ऑफ सदर्न इंडिया, खंड ४, १५९). परंतु हे फरक वेगळे वांशिक मूळ सूचित करण्यासाठी पुरेसे महत्त्वाचे आहेत की नाही यावर भाष्य करणे कठीण आहे.
तथापि, जर आपण वेदर, वेतुवन, इरुला आणि कुरुंबर यांच्या वास्तव्याची भौगोलिक रचना पाहिली, तर एक मनोरंजक गोष्ट समोर येते. या आधीच्या लेखात म्हटले होते की या ‘आदिवासी’ समुदायांची सर्वाधिक संख्या श्रीलंका बेटाच्या सर्वात जवळ असलेल्या ‘द्वीपकल्पाच्या नैऋत्येला’ आढळते.
परंतु आपल्याला वायनाड - निलगिरी प्रदेशातही या समुदायांची जास्त संख्या आढळते. असे असू शकते का की आफ्रिकेतून बाहेर पडलेले प्रारंभिक मानव किंवा पूर्व-मानव भारतीय द्वीपकल्पाच्या पश्चिम किनाऱ्याने गेले असतील आणि कोइम्बतूर आणि पलक्कड दरम्यान पश्चिम घाटातील कमी पर्वतीय खिंडीतील पालघाट खिंडीतून पूर्व किनाऱ्यावर गेले असतील, असे गृहीतक आदिवासी समुदायांच्या दोन प्रमुख समूहांचे स्थान सुचवते.
जर ते बरोबर असेल, तर आमचा अंदाज आहे की कुरुंबर, किंवा किमान काही कुरुंबर कुळे, खरोखरच आदिवासी असू शकतात. तथापि, अशा गृहीतकापासून आपण सावध असले पाहिजे कारण त्यात काही प्रमाणात वर्तुळाकार तर्काचा समावेश असतो. परंतु, त्याच वेळी, आपण तशी शक्यता पूर्णपणे नाकारूही शकत नाही.
केरळ आणि तामिळनाडूमधील काही ठिकाणी आढळणाऱ्या कुरुंबर यांना प्रागैतिहासिक चित्रांच्या शास्त्रोक्त अभ्यासाशी जोडून पाहू शकतो. उत्क्रांतीच्या कालखंडातील त्यांचे वास्तव्य व इतरांपासून त्यांचे वेगळेपण अधोरेखित होईल. समकालीन कुरुंबरच्या लोककलांना कुरुंबरच्या काही ज्ञात वस्तींमध्ये आढळणाऱ्या दगडांवरील चित्रांशी, प्रस्तर चित्रांशी व दोघांना श्रीलंकेच्या वेद्दा येथे आढळलेल्या चित्रांशी जोडण्याचा प्रयत्न येथे केला आहे.
कुरुंबारशी संबंधित प्रागैतिहासिक शिल्पचित्रे आढळण्याचे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे वेल्लारीकोम्बी, जे तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील कोटागिरी तालुक्यात आहे.
मेट्टुपलयमपासून सुमारे २१ किमी अंतरावर ते स्थित आहे आणि यांचा कालावधी सुमारे १००० ईसापूर्व ते ५०० ईसापूर्व आहे. (संदर्भ : बालाजी, २०१८: सुपर्स्टिशिअस बिलीफ्स अँड सुपर नॅचरल पावर्स - ऍन एथनो-आर्किओलॉजिकल स्टडी ऑफ इंडियन रॉक पेंटिंग्ज, जर्नल ऑफ इंडियन हिस्ट्री अँड कल्चर, खंड २४, २८) एलुथु पाराई नावाचे हे स्थळ स्थानिक कुरुंबारांचे तीर्थक्षेत्र आहे. हे स्थळ त्यांच्या पूर्वजांनी निर्मिले होते, असा त्यांचा विश्वास आहे. आता हीच चित्रकलेची परंपरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने स्थानिक कुरुंबारांनी अजूनही जपली आहे.
लाल-गेरु चित्रांमध्ये अनेक ओव्हरलॅप्स आढळून आले आहेत जे सूचित करतात की या आकृत्या वेगवेगळ्या काळात एकाच ठिकाणी रंगवल्या गेल्या होत्या. आजही, कुरुंबर पुजारी दरवर्षी त्यांच्या मंदिराच्या भिंती जुन्या आकृत्यांवर मानवरूपी आकृत्यांनी रंगवतात. स्थानिक कुरुंबार कृष्णन यांनी या चित्रांचा बराच काळ अभ्यास केला आहे.
ते वेल्लारीकोम्बी येथील चित्रांतील मानवी आकृतींना कुरुंबार देवता दोड्डा दैवम (महान देवता), नीर दैवम (पाणी देवता) वगैरे नावांनी ओळखतात. (संदर्भ कुमार, २०१७: रीअपरेजल ऑफ रॉक-आर्ट ऍट वेल्लारीकोम्बी अँड इट्स कुरुंबा असोसिएशन अँड कंटिन्युटी, हेरिटेज: जर्नल ऑफ मल्टीडिसिप्लिनरी स्टडीज इन आर्कियोलॉजी, क्र. ५, २४७).
वेल्लारीकोम्बी येथील चित्रांमधील मानवी आकृत्यांच्या डोक्यावर असलेले मुकूट व त्यांचे एकंदर चित्रण हे वायनाडमधील एडाक्कल लेण्यांमधील पेट्रोग्लिफ्ससारखेच आहे. फॉसेटच्या मते, लेण्यांमध्ये कुरुंबारांचे वास्तव्य होते आणि कदाचित ती चित्रे त्यांनीच काढलेली असावीत. फॉसेटला गुहांमध्ये रेखाचित्रांसाठी वापरली जाणारी निओलिथिक साधने आढळली. (संदर्भ : फॉसेट, १९०१: नोट्स ऑन द रॉक कार्व्हिंग इन एडक्कल केव्हज, इंडियन अँटिक्वेरी, खंड ३०, ४२१).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.