
Cooper Connolly Record: ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 276 धावांनी पराभव करुन एक अविश्वसनीय कामगिरी केली. मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियाला मालिका 1-2 ने गमवावी लागली असली तरी, शेवटच्या सामन्यातील हा मोठा विजय त्यांच्यासाठी प्रतिष्ठा वाचवणारा ठरला. मॅके येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने केवळ दोन गडी गमावून 431 धावांचा विशाल स्कोअर उभा केला. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मिचेल मार्श यांनी वादळी सुरुवात करत पहिल्या विकेटसाठी 250 धावांची विक्रमी भागीदारी रचली.
दरम्यान, या सामन्यात ट्रॅव्हिस हेडने 103 चेंडूत 17 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 142 धावांची तुफानी खेळी केली. तर, कर्णधार मिचेल मार्शने 106 धावांची कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली, ज्यात 5 षटकार आणि 6 चौकारांचा समावेश होता. यानंतर कॅमेरुन ग्रीन आणि ॲलेक्स कॅरी यांनी संघाला आणखी मजबूती दिली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद 164 धावांची भागीदारी केली. ग्रीनने केवळ 55 चेंडूंमध्ये 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने नाबाद 118 धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, ॲलेक्स कॅरीने 50 धावांचे योगदान दिले.
432 धावांच्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) संघ ऑस्ट्रेलियन गोलंदाजांपुढे पूर्णपणे गडगडला आणि केवळ 24.5 षटकांत 155 धावांवर सर्वबाद झाला. या मोठ्या विजयाचा नायक ठरला 22 वर्षांचा युवा फिरकीपटू कूपर कोनोली. त्याने 6 षटकांत 22 धावा देत 5 बळी घेत इतिहास रचला. शानदार गोलंदाजीच्या जोरावर कोनोलीने 38 वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात 5 बळी घेणारा ऑस्ट्रेलियन गोलंदाज बनला. कोनोलीने क्रेग मॅकडरमॉट यांचा विक्रम मोडला. क्रेग मॅकडरमॉट यांनी 1987 मध्ये पाकिस्तानविरुद्ध लाहोर येथे 22 वर्षे आणि 204 दिवसांच्या वयात 5 बळी घेतले होते. तर, कूपर कोनोलीने वयाच्या केवळ 22 वर्षे आणि 2 दिवसांत हा मोठा पराक्रम केला.
22 वर्षे 2 दिवस – कूपर कोनोली विरुद्ध दक्षिण आफ्रिका | मॅके, 2025
22 वर्षे 204 दिवस – क्रेग मॅकडरमॉट विरुद्ध पाकिस्तान | लाहोर, 1987
22 वर्षे 211 दिवस – मिचेल स्टार्क विरुद्ध पाकिस्तान | शारजाह, 2012
एकंदरीत, ऑस्ट्रेलियाने (Australia) या सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये आपले वर्चस्व सिद्ध केले आणि मालिकेचा शेवट मोठ्या विजयाने केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.