पाणी हे द्रव क्षार, खनिजे ऊर्जा, ऑक्सिजन निर्माण करणार्या नैसर्गिक स्रोतांचा खजिना आहे. माणसांसाठी उपयुक्त ठरणारा जैव सक्रिय संयुगांचा तो स्रोत सागराच्या पाण्याच्या तळाशी आहे. त्याच प्रकारे पृथ्वीच्या जमिनीवर जैवविविधता खेळत आहे. हा सारा खजिना मानवाच्या कल्याणासाठी सोन्याची खाण आहे.
रोगाशी लढण्याची प्रचंड क्षमता सागराच्या सूक्ष्म जीवांत आहे. चीन देशात मातीच्या वस्तू बनवताना समुद्राच्या पाण्यातील टजीन शेवाळाचा उपयोग करतात. मानवाच्या आरोग्याची किल्ली सागराच्या पोटात दडली आहे. त्यातूनच बहुरंगी बहुढंगी खारफुटीचा जन्म झाला.
इवल्याशा गोव्यात तेरेखोल, शापुरा, मांडवी जुवारी, साळ, तळपण गालजीबाग नद्यांचे काठ आणि हळदोणा, पार, वाळवंटी, डिचोली, शेजो, सास्त, बाणस्तारी गवडांळी उपनद्या; रुआदओरे, चिंबल, शिरीदाव, उणीर , कर्नाळे, खांडोळा-कोळंब, बेतकी कावजा या खाड्या;
तसेच चोडण, दिवाडी, वाशी, आखाडा, सांतइस्तेव, कुंभारजुवा, कालवी, खोर्जूवे या बेटांचे नदी किनारे या ठिकाणी दलदलीच्या भागात कांदळवने पाहावयास मिळतात. या तीस- चाळीस वर्षांच्या काळात संपूर्ण गोव्याची खाजन शेती पडीक असल्याने कांदळवनांनी आपले बस्तान पसरवून पक्षी, समुद्रीय जैविक संपदेला आश्रय दिला आहे.
मात्र खाजन शेती पडीक ठेवल्याने - गोव्यातील महत्त्वाचा विकासाचा कणा असलेले - कृषी संस्कृतीत मिळणारे अन्नधान्य कमी झाले. परिणामी गोव्याच्या जनतेला दूध, भाजीपाला, कडधान्ये आणी तांदूळ परराज्यातून आणावा लागतो.
आमच्या पूर्वजांनी खार पाण्यावर मात करून नेरमार, करंगुट, दामगा, बेळा, शिट्टा, मुणे, आजगा अशी गोमंतकीय भात बियाणी जपली. या बियाण्यांची पेरणी करून गोड तांदूळ पिकवला होता.
हिवाळ्यात त्याच खाजन शेतात मिरची, कांदा, अळसंदा, चवळी, वाल, वांगी, मुळा, रताळी, कलिंगड पीक घेऊन गोवा आत्मनिर्भर व सुसंपन्न केले होते. गोव्यात कृषी उभी राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी काम करताना शरीरातील रक्ताचे पाणी होऊन चिखलात मिसळत होते. म्हणूनच त्यांना बळीराजाचे वारसदार ही पदवी मिळाली. मात्र आजच्या भविष्याकडे पाहिल्यास शेती म्हटली की गोवेकर नाके मुरडत आहे. अशाने स्वावलंबी बनण्याचा मार्ग आम्ही घालवून बसलोय.
गोव्यात मायनिंग विकासाच्या नावाने मांडवी आणि जुवारी; शिवाय, त्यांच्या उपनद्या बार्जीच्या प्रदूषणाने आणि लाटांचे तडाखे खाजन शेतीच्या बांधांना आदळून पूर्वजांनी उभारलेले बांध आणी मानस अक्षरशः खिळखिळी झाली.
त्यामुळे नद्यांतील खार आणी प्रदूषित पाणी शेतात भरले. जिथे आकाशच फाटले तिथे ठिगळं कुठे मारणार, अशी आमची आजची परिस्थिती आहे. प्रदूषण वाढल्याने नदी, खाडी, उपनदी, खळ्यांमध्ये मिळणारी रुचकर शेवटा, चोणकूल, तामसा, पालू, खरचाणी, शेतुक, सफेद झिंगे, वागी, पोटींग खेकडे नदीतून गायब झाले आहेत.
सर्वण, आमोणा, खांडोळा, बेतकी, मायणी, वळवई, सुर्ल, पिळगाव गावांच्या तटावरील मांडवीच्या पात्रात काळ्या खुब्यांची सागरमाला तुटली आहे. मानवी प्रदूषण आणि रेती उपशाने मत्स्यधनाची नैसर्गिक संपदा कायमची नष्ट झाली आहे.
आज समुद्री मासळी आंध्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांतून गोव्यात आणून गोवेकरांना आपली भूक भागवावी लागते. ही लज्जास्पद पाळी, एकेकाळच्या मत्स्यसंपन्न गोव्यावर आज आली आहे.
खारफुटीच्या जंगलांना ‘मंगलवन’, ‘कांदळवन’, ‘तिवर’ अशा नावांनी ओळखतात. कांदळ वनस्पतीच्या जंगलात आश्रय घेतलेल्या प्राण्यांमध्ये आणि परिसंस्थेच्या कार्यामध्ये प्रचंड विविधता आढळते. कांदळवन वनस्पतींच्या झाडांना अनेक प्रकारची मुळे पाहावयास मिळतात.
ही वनस्पती झाडे खारपाण्यात आणि खारपाण्याच्या शेजारील जमिनीवरही वाढतात. कांदळवन वनस्पतींचा जन्म लाखो वर्षांपूर्वी झाला. जगातील एकशेवीस देशात खारफुटी आढळते. तिच्यात प्रचंड विविधता आहे. हिवाळ्यात कांदळ फुलला म्हणजे त्यांच्या फुलातील मध लुटण्यास मधमाश्यांचा जमाव त्या फुलांवर तुटून पडतो.
मारानी कुर्कीच्या सावलीत मासे अंडी घालतात. खारफुटी वनस्पती समुद्री सुकती भरतीच्या आधारे समुद्रातून नदी, खाडी, खळी, खाजनशेतीपर्यंत पोहचली. ती उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंध प्रदेशात आपले कुटुंब वाढवते. तिच्यात अनेकरूपी विविधता पाहावयास मिळते. निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्यासाठी ती स्वतःमध्ये बदल घडवते.
लाटांचा तडाखा, सूर्याची उष्णता, अस्थिर वाळू, वादळी वारा अशा प्रतिकूल वातावरणात जगणे, वाढणे हे काम सोपे नाही. समुद्रीय पाण्याच्या तापमानात विरघळलेला प्राणवायू, खार पाण्यातील क्षारता, मातीची जडणघडण, वार्याचा वेग हे घटक खारफुटीची वाढ करतात. म्हणून तिला ‘मर्यादा घटक’ म्हणतात.
खारफुटी स्वतःमध्ये अनुकूल बदल घडवत असल्याने तिची परिसंस्था प्राचीन काळापासून ते आजपर्यंत टिकून आहे. वाढ होण्यासाठी ती आपली मुळे मऊ चिखलात, खसखशीत वाळूत घुसवून स्थिर राहण्यासाठी जमिनीत असलेला प्राणवायू शोषते.
त्यासाठी आपली जटिल मुळे दलदलीच्या खार पाण्यात घुसवते. त्याने ती जगते आणि अनेक प्रकारच्या समुद्री सजीवांना जगवते. खार पाण्यातील अतिरिक्त क्षार सजीवाला धोकादायक असतो. तो टाळण्यासाठी ती अनुकूल वातावरण निर्माण करते.
तिने आपल्या मुळाकडून खोडापर्यंत नैसर्गिक चाळण तयार केली आहे. त्यातून ती कमी प्रमाणात क्षार ओढून घेते. आपल्या खोडाच्या ग्रंथी व पानातील छिद्रातून क्षार बाहेर सोडते. तिच्या पानावर मेणाप्रमाणे थर आढळतो, तो झाडात जाण्यापासून क्षाराला अडवून ठेवतो. त्याने झाडांची पाने कुजत नाहीत.
निसर्गाने प्रत्येक प्रजातीला संख्या वाढवण्याचे वरदान दिले आहे. जमिनीवरील इतर झाडांच्या बिया वरून खाली पडून वार्याच्या साहाय्याने त्या पसरतात. वन्यप्राणी, पक्षी त्या इतरत्र नेऊन रुजवतात.
पण खारफुटीचे बियाणे जमिनीवर अगर समुद्री पाण्यात उगवणे फार कठीण काम. कारण अतिरिक्त क्षार, अस्थिर मृदा, नद्यांतील पाण्याच्या लाटा यांमुळे बिया उगवण्यास विरोध होतो. त्यामुळे खारफुटीने चतुर मार्ग शोधून काढला.
त्यांनी आपल्या बियांचे अंकुरणे झाडावरच ठेवले. अंकुराला पाने, मुळे फुटल्यानंतर रोपे आपोआप खाली पडून पाण्यातील दलदल चिखलात घट्ट रुतून बसतात. सस्तन प्राणी आपले बाळ पोटात वाढवतात, तशाच प्रकारे खारफुटी वनस्पती आपले रोप अंगावर वाढवते. खारफुटीचा उपयोग अनेक प्राण्यास आणि माणसाला फायद्याचा आहे,
खारफुटीच्या जंगलात समुद्री प्राणी, पक्षी, साप सुखाने नांदतात. आसपासचे पक्षी, साप, पाणमांजर, मुंगुस, कोल्हा, कुत्रा आणि माणूस यांच्या खाद्याचा अविभाज्य घटक म्हणजे तिच्यात असलेली मासळी! तिच्यात वावरणारे झिंगे, खेकडे, अनेक प्रकारची मासळी खारफुटीची कुजलेली पाने खाऊन जगतात.
त्यांच्या मुळाच्या जाळ्यात सुरक्षितपणे प्रजोत्पादन करून आपली संख्या वाढवतात. पसरणार्या मुळांच्या जाळ्यामुळे भक्षकांचा धोका कमी असतो. खारफुटीच्या जंगलात तीनशेच्यावर समुद्रीय प्रजाती आढळतात.
खारफुटीच्या शरीरात ‘टॅटीन’ नावाचा घटक असल्याने खार पाण्यात झाडांचे शरीर कुजत नाही. म्हणून त्या झाडांचे लाकूड पादत्राणे आणि बांधकाम करण्यास वापरतात. फुटी समृद्धीचा मुख्य घटक आहे. खारफुटीची जंगले सुनामी, वादळे, पूर आल्यास किनारपट्टीवरील लोकवस्ती आणि शेताकडील नद्यांच्या बांधाचे संरक्षण करतात. खारफुटी प्रदूषणावर नियंत्रण ठेवते. मुळांच्या जाळ्यात प्लॅस्टिक प्रदूषके अडवून ठेवून त्याचे विघटन करते. मानवी अस्तित्वास मारक असणारी तापमानवाढ, हवामान बदल हे धोके कमी करण्यास खारफुटी महत्त्वाची भूमिका बजावते, हे मानवाने ओळखले पाहिजे.
आज मानवी प्रक्रियांमधून तयार होणारा हरितवायू पृथ्वीचे वातावरण बदलत असून त्यात कार्बन वायूची भर पडत आहे, हे माणसाला हानिकारक ठरत आहे, अशा विषारी वायूचे शोषण करण्याची क्षमता कांदळवनात आहे, म्हणून त्या कांदळवनांचे रक्षण झाले पाहिजे!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.