
मधू य. ना. गावकर
मानव ईश्वराला वेगवेगळ्या रूपात पाहतो. कुणी मातृरूपात, कुणी पितृरूपात, कुणी गुरूरूपात पाहतो. आपल्या डोळ्यांतून येणारे अश्रू कितीही शुद्ध असले तरी त्याला सुखदुःखाची किनार आहे. मानव समाजात चार अवस्था आहेत; एकमेकांना मारणे, कोर्टकचेरी करणे, सरकारी आदेशांचे पालन करणे आणि शेवटी देवापुढे लोटांगण घालणे.
गंगेची मूर्ती पाहिल्यास तिच्या नजरेत कारुण्य, प्रसन्नता, वात्सल्य, सामर्थ्य, समत्व आणि गुणात समुच्चय दिसतो. वाहणाऱ्या ओहोळात, नदीच्या थंड पाण्यात गरम पाणी गेल्यास त्यात वावरणारे मत्स्यधन मरून जाते. मासे कमी झाल्याने तिथे येणारे पक्षी त्या स्थळी पाठ फिरवतात. त्याने परिसरातील शेती बागायतीवर वाईट परिणाम होतो. कारण मासळी खाण्यास येणाऱ्या पक्षांच्या विष्ठेचे सुपीक खत तिथल्या शेतीबागायतीत पडून जमीन कसदार होते आणि पीक चांगले येते.
हवामानानुसार पृथ्वीवर घरे बांधली जाऊ लागली. उष्ण प्रदेशात दगड-मातीची, थंड प्रदेशात लाकडाची, अतिथंड प्रदेशात बर्फाची, ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, त्या ठिकाणी उतरत्या छपरांची घरे बांधतात. हिवाळ्यात थंडीचा कडाका सुरू झाला म्हणजे प्राणी पक्षी स्वबळावर मैलामैल स्थलांतर करतात.
सायबेरियातील पक्षी महाराष्ट्रातील शिवडी, मुंबईला स्थलांतर करतात. थंडी सुरू झाल्यावर खार आपले शेपूट फुलवून भपकेबाज दिसते. अतिपाऊस, खराब हवामान असेल तर कैक प्रकारची फुले आपल्या पाकळ्या मिटतात. विषुवृत्तीय, अर्धवाळवंटी मध्य अक्षांश, खंडांतर्गत, ध्रुवीय आणि डोंगर पठारे असे हवामानाचे वर्गीकरण सहा प्रकारांत केले जाते. हा सारा निसर्गाचा प्रताप आहे. हवा, ऊन, पाऊस, पाण्याच्या गप्पा करणे सर्वांना आवडते.
उकाडा, थंडी, वादळ, वारे, सुनामी, पाऊस, ऊन, दमट, कोरडे हे शब्द हवामानाचे वर्णन करणाऱ्या विशेषणाचे आहेत. हवामान बदलाने त्याचा वाईट परिणाम प्राणी, कीटक, पक्षी, मासळी यांवर होतो. समुद्ररूपी पाण्याचे तो मेघात रूपांतर करतो, वाफेच्या शक्तीवर वादळाचे सामर्थ्य घडवतो. काळ्या ढगातून सूक्ष्म जलबिंदू जमिनीवर पडतात, पांढऱ्या ढगात हिमस्फटीक असतात, जलबिंदू आणि हिमस्फटिकांच्या घर्षणाने वीज जन्म घेते.
अग्नीचे तांडव दाखवते, अशा प्रकारे सूर्य पर्जन्य चक्र चालवतो. वसुंधरा स्वतःभोवती फिरताना सूर्याला प्रदक्षिणा घालते. त्याने तिच्यावरील हवेच्या दाबात फरक पडतो. वसंत ऋतूत सूर्य क्षितिजापासून दिवसागणिक जास्त उंचीवर येतो, शरद ऋतूत सूर्याची क्षितिजाकडील उंची कमी होते. भर दुपारी तापलेल्या दगडावर पाय ठेवल्यास भाजत नाही.
अंगात पाण्याला घेऊन फिरणारी पृथ्वी स्वतः काम करीत त्या पाण्याच्या आधारे वेगवेगळी रसायने, द्रव्ये आपल्या अंगात निर्माण करते, त्यात ती कोळशाला हिरा बनवते. तिचा प्रयोग आमच्या पूर्वजांनी जाणून घेत त्यांनी भूमीच्या अंगावरील मातीत पाण्याच्या आधारे बियाणी पेरून पाकड, सावा, कांग, वरी, कुळीथ, उडीद, नाचणी, तीळ, अशी धान्ये आणि काराना, चिर्का, सुरण, अळूमाडी, काटेकणगी, झाड कणगी, फायरींग, रताळे, भुईमूग, मटकी, झिरमुला, मुणली, हळद कासाळी माडी तेरा या डोंगराळ जंगली वनस्पतीच्या अन्नाचा शोध लावून बियाणी सांभाळली होती.
आज आपण त्या बियाण्यांना गोवेकरांनी पूर्णविराम दिलेला पाहावयास मिळतो. शेताच्या दलदलीत, चिखलात मिळणारा कोंगा, नदीच्या पात्रातील रेतीत मिळणारे काळे, सफेद, तपकिरी रंगाचे खुबे, पावसाळ्यात ओहोळास प्रथम गोडे पाणी वाहू लागले म्हणजे, हजारोंच्या संख्येने डोंगराळ भागातील ओहोळाच्या पात्रात खाच खळग्यात दडून राहणारे खेकडे, शेताच्या तळीत सापडणारे काळे थिगुर. आज रासायनिक सांडपाणी ओहोळाच्या पाण्यातून वाहत शेतात, तळ्यात गेल्यानेही औषधी गुणधर्माची मासळी, कंदमुळे आणि कडधान्ये आम्ही गमावून बसलो आहोत. ती परत तयार करण्याची ताकद आमच्या गोव्यातील युवकांत आहे. मात्र क्रांती झाल्याशिवाय हे शक्य नाही. ही क्रांती घडेल की विनाश हे येणारा भविष्यकाळ ठरवेल.
माझा प्रवास ओपाकडून पुढे खांडेपार पाचमे भागातील पांडवांच्या तळीकडे उगम पावलेल्या ओहोळाकडून सुरू झाला. हा भाग भूतखांब व पठाराचा दक्षिण बाजूचा असून तो अतिसंवेदनशील आहे.
पांवडा-तळीकडून तो अंदाजे दीड किमी खालच्या भागात प्रवास करीत पाचमे तळ्याकडे येतो. इतक्या उंचावर पाण्याने भरलेले तळे पाहिल्याने एखादा चमत्कार पाहिल्याचा भास होतो. त्या तळ्याला मोठा बंधारा बांधून त्यात अडवलेले पाणी खालच्या उतारावरील बागायतीस सिंचन केले जाते. ओहळ पुढे खालच्या बांधलीकडे येतो.
वरच्या भागातील कुळागर, बागायती त्यात वावरणारे पक्षी, सरपटणारे प्राणी, तृणभक्ष आणि हिंस्र जनावरे यांची साखळी उभी करण्यासाठी तिथल्या पूर्वजांनी आपल्या पोलादी मनगटाची ताकद लावल्याचे पाहावयास मिळते. त्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी तळहाताच्या रेषा पाहून ती जीवनोपयोगी धनदौलत उभी केली नव्हती, हे त्या भागात फिरताना दिसून येते.
बांधलीकडून ओहोळाचे पाणी शांतादुर्गा देवीच्या चरणाकडून घुंगरांचा आवाजाप्रमाणे झुळझुळ वाहत आपले रूप दाखवत पुढे जाते. तिथली वायंगणासह शेती आणि कुळागराला पाणी देत बागवाड्याकडील मानवी वस्तीला पाणी देत पुढील फिरंगी भाटाच्या परिसराला पाणी पुरवत खांडेपार नदीच्या पात्रात सामील होते. व्हडले शेत, पोटशेत, रुमाड शेत, बेताळ शेत, मुळशी शेतात इथल्या पूर्वजांनी दिवस रात्र कष्ट केले.
शेताच्या दलदलीच्या चिखलात अनेक प्रकारची भात बियाणी पेरून त्यांनी सोन्यासारखी साळू पिकवली. त्या ओहोळातील खेकडे, थिगुर, देखळे, वाळेर, पिठ्ठोळ, करणकाटके, झिंगे, मळ्ये आणि शेतातील कोंगे भाताबरोबर कालवणात शिजवून ते अन्न खाऊन जगत जगत शिकले. रात्रीच्या वेळी नदीच्या पात्रात दीपावणी करून अगरजाळ्याने चोणकुल, शेवटा, काळुंद्र, खरचाणी, तामसा, पालू, वागी, खेकडे पकडून रुचकर मासळीने जेवण घेतले.
तिथे पिकणारी काजू, नारळ, कोकम, ओटम, सुपारी, आंबा, अननस, मिरी विकून आपल्यासाठी कपडे, मसाले, सुकी मासळी, मीठ या सांसारिक वस्तू खरेदी करून आपले कुटुंब फुलवले. शिगमा, जत्रा, दिवजोत्सव, धालो, दिवाळी, दसरा, चतुर्थी आनंदाने साजरी करून ओहोळाच्या पाण्यावर पिढ्यान्पिढ्या मिळून मिसळून राहिले. आनंदात निसर्गाला पुजून त्यालाच देव मानला. झावळाच्या झोपडीत, कौलारू घराच्या थंडाव्यात, कामातून घाम गाळीत चंद्राच्या शुभ्र चांदण्यात, सूर्याच्या किरणात, झुळझुळत्या वाऱ्याच्या आल्हादात, आकाशाच्या छपराखाली मातीच्या सांन्निध्यात, पाण्याच्या थंडाव्यात जीवन जगले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.