Tiver flowers in Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Tiver flowers: गोड पाणी देणाऱ्या म्हादईच्या संगमावर होणारा फुलांचा वर्षाव, 'तीवर'चा गुलाबी बहर

Flowering trees in Goa summer season: गोव्यात नानाविध फुलांचे दर्शन मौसमानुसार बारमाही घडत असते. त्यामुळे इथल्या धर्म आणि सांस्कृतिक जीवनाची फुलाविना कल्पना करणे कठीण.

Sameer Panditrao

अ‍ॅड. सूरज मळीक

फुलांचा मदहोश करणारा रंग, रूप आणि आकार आपल्या मनाला सहजपणे आकर्षून घेत असतो. गोव्यात नानाविध फुलांचे दर्शन मौसमानुसार बारमाही घडत असते. त्यामुळे इथल्या धर्म आणि सांस्कृतिक जीवनाची फुलाविना कल्पना करणे कठीण. फुलांमध्ये निसर्गाच्या चमत्कारांनी आपण स्तंभित व्हावे, असे विविधतेचे ऐश्वर्य खुणावत राहते.

उन्हाळ्यात रगाडा नदीच्या पात्रात सोन गारबीची फुले बाहुलीसारखी भासतात. याच कालखंडात बहरायला सुरुवात होणारी भ्रमरी आमरी तर जणू एखादा तपकिरी भुंगा पांढऱ्या फुलांवर बसल्याचे दृश्य उभे करते. खरे तर तिथे भुंगा नसतोच. पावसाळ्यात चोरला घाट माथ्यावर बहरणारी गुढी आमरी किंवा करवीसारख्या फुलांचा बहरण्याचा वेळ निसर्गाने निर्धारित केलेला असतो आणि तो तीन ते चार महिने इतकाच असतो.

गोव्यातील उन्हाळ्यात नदी, नाले, ओहोळाच्या काठावर ‘तीवर’ नामक वृक्षाला लाल फुलांचा बहर येतो. या फुलांच्या बहरण्याचा वेळ हवामानातील तापमानावर आधारीत असला तरी ते झाड वर्षातून कोणत्या महिन्यात बहरेल हे सांगणे कठीण. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूत ती आकस्मिकपणे बहरतात. हिवाळ्यानंतर फेब्रुवारी ते एप्रिल व पावसाळ्यानंतर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात हा बहर विशेष अनुभवायला मिळतो.

तीवर हा एक भारतीय सदाहरित वृक्ष आहे. त्याची पाने आणि खोड गोव्यातील जंगलात आढळणाऱ्या ‘कुमयो’ म्हणजेच कुंभा नामक वृक्षाशी साधर्म्य दर्शवितो त्यामुळे त्याला स्थानिक भाषेत ‘मेण कुमयो’ असे नाव आहे. ‘बॅरिंगटोनिया एक्यूटंगुला’ असे शास्त्रीय नाव असलेल्या या झाडाच्या जातीला ‘बॅरिंगटोनिया’ हे नाव डेइन्स बॅरिंगटोनिया नामक एका वकील व पक्षी अभ्यासकाच्या नावावरून ठेवण्यात आले.

भारतीय धर्मसंस्कृतीत सर्व मंगलप्रसंगी फुलांच्या सजावटीला विशेष महत्त्व आहे. हिरव्यागार असलेल्या तिवराच्या झाडाला कधी पुष्प बहराने सजलेल्या लाली लाल शेंगा यायला सुरुवात होते कळतच नाही. दुरूनच आपली नजर वेधून घेतील इतका प्रचंड बहर असतो. तीवराची झाडे जणू नदीच्या दोन्ही बाजूला लाल वेलींचे तोरण बांधून नदीचे सौंदर्य खुलवीत असतात.

निर्मळ पाण्यावरती विखुरलेल्या हजारो फुलांचे रसरशीत रूप तर कुणाचेही मन लुभावणारे आहे. तिवराच्या शेंगा एका हाताच्या लांबीच्या असून संपूर्ण वेलीला गोलाकार फुले येतात. फुलांना चार नाजूक पांढऱ्या पाकळ्या असतात. त्याच्यातून बाहेर येणारे लाल रंगाचे पुंकेसर मात्र चार पाकळ्यांपेक्षा चार पटीने लांब असतात.

त्याच्यातील परागकोश पिवळ्या रंगाचे असतात. संध्याकाळ होताच कळ्यांचे फुलांमध्ये रूपांतर होऊ लागते. रात्रभर बहरलेली ताजी टवटवीत फुले सकाळच्या प्रहरात एकदम गळून पडतात. सूर्यप्रकाशात या नाजूक पुष्पवर्षावामुळे पडलेली फुले झाडाच्या चहूबाजूंनी पाण्यावर तरंगत राहतात. नदीचे पाणी त्याच्या किनाऱ्याकडे सावकाश वाहत असत्यामुळे बरीचशी फुले तिथेच साचून राहतात आणि किनारे लाल गुलाबी रंगाने व्यापून टाकतात. पाण्याला उथळ आला की एक एक करून पुढे सरकत सागराच्या दिशेने जातात.

या झाडाच्या पानांची रचना गोलाकार असते. सुरुवातीला ती लाल पोपटी रंगाची असतात. हळूहळू त्याचा आकार मोठा होतो आणि ती हिरव्या रंगाची होतात. त्या लहान कोवळ्या पानांकडे बघताना ‘ब्लू ओक लिफ’ या फुलपाखराची जणू आठवण होते. हे फुलपाखरू सुकलेल्या पानासारखे दिसते हा तर चमत्कार आहेच पण ते कुठल्या पानांसारखे दिसते हा प्रश्न पडतो.

तीवराची पाने मधून मोठी आणि दोन्ही बाजूने लहान असतात. पुढची बाजू टोकदार. अगदी ‘ब्लू ओक लिफ’च्या आकारासारखी. त्यामुळे साधारण लहान पानांचा आकार त्याच्याशी साधर्म्य दर्शवतो. तीवर या झाडाला इंग्रजीत ‘इंडियन ओक’ असे नाव आहे. त्यामुळे कदाचित ओक नामक फुलपाखराला याच झाडावरून नाव दिले असावे. इतर ओक नामक प्रजातीची पाने पाहिली तर त्यांच्या वेगवेगळ्या कलाकृती या फुलपाखराशी मिळत नाही.

गोव्यातील साखळी येथील वाळवंटी नदी, कुडचिरे येथील डिचोली नदी, साळ येथील तिळारी नदी व सत्तरीतील रगाडा आणि म्हादई नदीच्या संगमावर आज तीवर फुलांचा वर्षाव अनुभवायला मिळतो. म्हादई ही गोड पाणी देणारी गोव्यातील सर्वांत मोठी नदी आहे. त्यातसुद्धा सागराला मिळण्याआधी सुमारे किलोमीटर अलीकडेच ती खारट बनते.

काही झाडांकडे बघून आपण ती गोड नदी आहे की खारट नदी आहे हे सांगू शकतो का? सोनाळ गावातून वाहणारी म्हादई नदी गांजे येथे पोहोचेपर्यंत ठिकठिकाणी तिवर फुलांचे दर्शन घडवते. त्यानंतर उसगावहून पुढे ही झाडे कमी होतात आणि त्याजागी कांदळवन दिसायला सुरुवात होते. म्हणजेच तिवराची झाडे गोड्या पाण्याची सूचक आहेत आणि ती गोड्या पाण्यात तग धरून उभी राहतात. त्याच्या सभोवताली कितीही पाणी साचले तरी ती कुजत नाही. त्याचे लाकूड हलके आणि टिकावू असल्यामुळे होड्या बनवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा.

Surangi tree in Goa

भारतात काही ठिकाणी शोभेचे झाड म्हणूनसुद्धा या झाडाची लागवड केलेली आहे. साखळी येथील बोडके मैदान परिसरात तीवराची झाडे पाहायला मिळतात. आज साखळीचा जो बाजार विस्तारलेला आहे तेथील सिमेंट काँक्रीटचे बांधकाम वाळवंटी नदीच्या पूर नियंत्रण क्षेत्रात करण्यात आले आहे, त्यामुळे तीवराची काही झाडे विस्मृतीत जाण्याच्या वाटेवर आहेत.

सत्तरीतील भिरोंडा ग्राम पंचायतीच्या जवळून वाहणाऱ्या म्हादई नदीचे निसर्गरम्य पात्र उन्हाळ्यात भरपूर लोकांचे आकर्षण ठरते. या सुंदर परिसराला लाभलेले तिवार हे नाव तीवर फुलांवरून आले असावे.

उन्हाळ्यात म्हादई नदीतील मगरी या झाडाखाली विश्रांती घेतात. फुलांचा बहर तर विविध कृमी कीटकांना आकर्षित करतो. तीवराचे वृक्ष टस्सक पतंगाची खाद्य वनस्पती आहे. त्याचे सुरवंट ही पाने खाऊन जगतात. चुकूनसुद्धा त्या सुरवंटांना आपला हात लागला तर खाज सुटते म्हणून या झाडाला इंग्रजीत ‘इट्ची ट्री’ असे म्हटलेले आहे. ‘मंकी पझल’ हे फुलपाखरूसुद्धा या झाडावर जन्म घेते. पावसाळा सुरू होताच नदी, ओहोळाच्या परिसरात लहान फुलपाखरांमध्ये या फुलपाखराचे दर्शन घडते.

माकडासारखा तपकिरी पिवळ्या रंगाच्या या फुलपाखराकडे बघितल्यावर त्याचे तोंड नेमके कुठल्या बाजूने आहे हे कळण्यासाठी जवळून बघावे लागते. कारण त्याची शेपूट तो वर खाली करत राहतो आणि शेपटीच्या सुरुवातीला निळे ठिपके असतात त्यामुळे ते त्याचे डोळे आणि स्पृशा असल्यासारखा भास होतो.

ही त्याची संरक्षण यंत्रणा असते. एखाद्या पक्षाला त्याच्यावर आक्रमण करायचे असेल तर तो जास्त हालचाल असलेल्या शेपटीला त्याचे डोके समजून तिथे वार करतो. त्यामुळे फुलपाखराचा जीव वाचतो आणि ते पळून जाते. शेपूट गेली तरी ते जिवंत राहते. पाणथळ जागेवरील पानावर नर आणि मादी फुलपाखरे पानावर बसतात आणि पानावरून इकडे तिकडे धावतात. सकाळच्या वेळी तर ती पानाच्या अगदी टोकाला जाऊन आपले पंख उघडून बसतात. या प्रक्रियेत त्यांना सूर्यापासून ऊर्जा मिळते.

गोड्या नदीच्या काठावर असलेल्या पटकोळणीची लाल फुलेसुद्धा त्यांची खाद्य वनस्पती आहे. आपण एखादे फुलपाखरू पानावर अंडी घालताना पाहिले असेल पण ‘मंकी पझल’ फुलपाखरू पटकोळणीच्या बहरलेल्या फुलावर अंडी लावते. नरापेक्षा मादी फुलपाखरू आकाराने मोठे आणि त्याच्यावरच्या कलाकृती आणि रंगसुद्धा गडद असतात. यामध्येही नर फुलपाखरांची संख्या भरपूर असते. त्यामुळे कधी कधी दोन नर एकमेकांशी भांडतानासुद्धा दिसतात. फुलपाखरू आणि फुलांचे अद्भुत विश्व अनुभवायचे असेल तर त्यासाठी हवी आहे अतूट अशी समरसता आणि निसर्गासाठी समर्पण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly: घरे नियमनाचे पहिले पाऊल! सरकारी जमिनींवरील 400 चौ.मी. जागेतील बांधकामे होणार नियमित, विधेयक सादर

Rashi Bhavishya 31 July 2025: व्यवसायात लाभ,खर्चावर नियंत्रण ठेवा; अनावश्यक वाद टाळा

Cordelia Cruise: पश्चिम किनारपट्टीवरील सफरनामा! कोची ते गोवा करा 5 दिवसांची 'ओशन ड्रीम्स' सफर; कोर्डेलिया क्रूझचं नवं पॅकेज

Goa: वेटरकडून हॉटेलच्या मालकीणीवर बलात्कार, तोंडावर उशी ठेऊन दिली जीवे मारण्याची धमकी; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

Goa Schools: राज्यातील शाळांमध्ये आता 'वॉटर ब्रेक'! विद्यार्थ्यांना पाणी पिण्यासाठी मिळणार 2 मिनिटांचा वेळ; शिक्षण खात्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT