
ऋतू बदलानुसार ज्याप्रमाणे झाडाझुडपांमध्ये बदल जाणवतो त्याचप्रमाणे त्यांच्यावर अवलंबून असलेल्या विविध प्रजातीच्या फुलपाखरांचे दर्शन आपल्याला घडत असते. गोव्यातील कोणती फुलपाखरे कुठे व केव्हा आढळून येतात हे तेथील हवामान आणि उपलब्ध खाद्य वनस्पतींवर अवलंबून असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात आढळणाऱ्या फुलपाखरांची संख्या उन्हाळ्यात खालावलेली असते तेव्हा ‘बहावा’ हे वृक्ष त्यांच्यासाठी भरपूर पुष्परस उपलब्ध करतात.
समुद्रतट आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या मध्यभागी वसलेल्या गोव्यात बारमाही वाहणाऱ्या जलस्रोतांमुळे उन्हाळ्यातसुद्धा आपल्याला फुलपाखरांचे आगळेवेगळे विश्व अनुभवायला मिळते. ग्रीष्म ऋतूतील तापमान ज्याप्रमाणे माणसाला असह्य होत असते त्याप्रमाणे फुलपाखरांनासुद्धा जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो.
गोव्यात वर्षभरातील सर्व ऋतूंमध्ये दृष्टीस पडणारे फुलपाखरू म्हणजे ‘कॉमन इमिग्रंट’ फुलपाखरू. हे फुलपाखरू भारतात सर्वत्र आढळते. वसंत ऋतूमध्ये तापमानात वाढ होते. तरी काही पानगळतीची झाडे तळपत्या सूर्याच्या किरणांना सहन करून आनंदाने बहरून येतात.
आजूबाजूचा परिसर फुलांच्या बहराने लाल पिवळा रंग धारण करतो. त्यामधील आपल्या अप्रतिम सौंदर्याने मनाला भुरळ घालणारे वृक्ष म्हणजे ‘बहावा’. गोव्यातील कुठल्याही भागात गेलात तर उन्हाळ्यात बहरणारा हा वृक्ष लगेच लक्षात येतो.
मादी फुलपाखरांनी लावलेल्या अंड्यातून जरी फुलपाखराचा जन्म होत असला तरी झाडाच्या पानावर लावलेल्या अंड्यातून बाहेर पडलेल्या सुरवंटाचे रक्षण करण्याचे काम झाडेझुडपे करतात. ‘बहावा’ हे वृक्ष ‘कॉमन इमिग्रंट’ या फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे. पर्णभार झालेल्या झाडांच्या आश्रयात सुरवंटांना जगण्यासाठी आवश्यक पाने खायला मिळतात.
या फुलपाखराचा रंग पिवळट पांढरा असतो. त्यांच्या पंखांचा विस्तार ५५ ते ८० मिमि इतका असतो. काही फुलपाखरांमध्ये एकाच प्रजातीचे वेगवेगळी रूपे असतात. ‘कॉमन इमिग्रंट’ फुलपाखरांमधील मादी फुलपाखराचे एक रूप लिंबाच्या रंगासमान असल्याने त्याला ‘लेमन इमिग्रंट’ असेही म्हणतात. तरीही विशेषतः मादी आणि नर फुलपाखरातील फरक ओळखता येतो. नर पांढऱ्या रंगाचा असतो तर मादी सुंदर पिवळ्या रंगाची असते.
भारतभरातील अनेक राज्यांत ‘बहावा’ हे वृक्ष परिसरातील सौंदर्य खुलवण्यासाठी लावले जातात. शोभेचे झाड म्हणून याची ओळख असली तरी भारतात औषधी गुणधर्म लाभलेल्या झाडांमध्ये हे झाड येते. पूर्वापार या झाडाची पाने, खोड, शेंगा यांचा उपयोग औषध म्हणून केलेला आहे.
त्यामुळे आयुर्वेदात या झाडाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संस्कृतमध्ये त्याला ‘आरग्वध’ म्हणजेच रोगांचा नाश करणारा असे नाव आहे. गोव्यात त्याला ‘बायो’ किंवा ‘बाळो’ असे म्हणतात. आजही साप्ताहिक बाजारपेठेत या झाडाच्या हिरव्या पानांची विक्री केली जाते. मे-जून या महिन्यांत त्यांना लागलेल्या शेंगाही बाजारात उपलब्ध असतात. गोव्यातील गावांमध्ये ‘कामिण’ या रोगावर उपचार म्हणून हे औषध वापरले जाते.
भारतातील जंगलात नैसर्गिकरीत्या उगवणारा हा एक पानगळतीचा वृक्ष आहे. ‘बहावा’चे शास्त्रीय नाव ‘कॅशिया फिसतुला’ असे आहे. शिशिर ऋतूत पानांचा त्याग केलेल्या या वृक्षाचे वसंत ऋतूतील सौंदर्य काही औरच असते. पाने पूर्णपणे गळून टाकल्याने हिरवळीची शाल नाहीशी होते आणि त्या जागी गर्द पिवळ्या फुलांचा बहर येतो.
झाडाच्या मोकळ्या खांद्यांना जणू नैसर्गिक फुलांच्या माळा गुंतून लावलेल्या आहेत असे दृश्य पाहता येते. दिवसभर हा वृक्ष जणू हळदीच्या फुलांचा वर्षाव करत असतो. त्यामुळे इंग्रजीमधे या झाडाला ‘गोल्डन शॉवर ट्री’ असे म्हटलेले आहे. त्याखाली असलेली जमीनसुद्धा पिवळ्या फुलांनी उजळून निघते. भारतीय लोकमानसात जीवन आधार ठरलेला हा वृक्ष ‘कॉमन इमिग्रंट’ या फुलपाखराची खाद्य वनस्पती आहे.
आपल्या आजूबाजूला असलेल्या वृक्षसंपदेवर या फुलपाखराचे जीवन अवलंबून असते. ‘कॉमन इमिग्रंट’ फुलपाखरू प्रामुख्याने पानावर अंडी लावते. पण शिशिर आणि ग्रीष्मात पानेच नसलेल्या या झाडावर फुलपाखरे अंडी कशी लावणार?
तरीसुद्धा उन्हाळ्यात ही फुलपाखरे आपल्या दृष्टीस पडतात. कारण उन्हाळ्यात ‘कॅशिया’ या कुळातील इतर खाद्य वनस्पतींवर ती जगतात. टाळकिळा, पळस, कॅशिया अलाटा या वनस्पतींवर ती अवलंबून असतात. टाळकिळा हे भारतातील १० सर्वांत आक्रमक प्रजातीच्या वनस्पतीमध्ये येते. तरी गोमंतकीय लोकमानसाने विदेशी वनस्पतीतील चांगले गुण ओळखून त्यांना आपल्या जेवणाच्या पानात स्थान दिले.
‘कॉमन इमिग्रंट’ फुलपाखरांची खासियत म्हणजे ती पोषक आणि पूरक हवामानानुसार एका जागेवरून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित होतात. कधी कधी हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन ती एका दिशेने जाताना दिसतात. त्यामुळेच इंग्रजीमध्ये त्यांना ‘इमिग्रंट’ असे म्हणतात. फुलपाखरांचे अभ्यासक डॉ. राजू कसंबे यांनी त्याला ‘परदेशी’ असे नाव दिलेले आहे.
फुलपाखरांना रंग ओळखता येतो का? ‘कॉमन इमिग्रंट’ या फुलपाखराचा अजून एक विशेष स्वभाव म्हणजे ते कधी कधी अगदी पिवळ्या पानावर जाऊन विश्राम करते. परत परत उडून गेले तरी त्याच पानावर येऊन बसते. अशाप्रकारे त्याचा पिवळा रंग त्या पिवळ्या पानाशी एकरूप होऊन,
त्यांना खाऊन जगणारे सरडे, पक्षी व इतर भक्षकांपासून त्यांचे रक्षण होते. ही फुलपाखरे गवत व झुडूपवर्गीय वनस्पतींवर अवलंबून असल्यामुळे ती जमिनीपासून काही अंतरावर उडताना जास्त आढळतात. पण स्थलांतरित होताना मात्र ती उंचावरून वेगाने उडतात.
उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता कमी झाल्याने या फुलपाखरांना नदी, झरे, ओहोळाच्या जवळ आश्रय घ्यावा लागतो. गोव्यातील म्हादई नदीच्या पात्रात असलेल्या ओल्या रेतीवर, ठिकठिकाणी ही फुलपाखरे निवांत बसलेली आढळतात. नदीतील सुपीक गाळ जसा शेती, बागायतीसाठी उपयोगी ठरतो तसा तो फुलपाखरांनाही जीवन जगण्यासाठी आवश्यक जीवनसत्त्वे पुरवत असतो.
समूहाने एकत्र येऊन मातीतून अन्नद्रव्ये पिण्याच्या या क्रियेला ‘क्षारशोषण’ असे म्हणतात. अशावेळी ती अगदी भान विसरून द्रव पिण्यात तल्लीन झालेली दिसतात. प्रजननासाठी या फुलपाखरांना मीठ व इतर आवश्यक द्रव्याची आवश्यकता असते. ही सत्त्वे त्यांना मातीतून उपलब्ध होतात. त्यामुळे कधी सोनाळ, उस्ते येथील नदी किनारी भ्रमंती केली तर हे दृश्य अनुभवायला मिळते. क्षारशोषण करताना त्यांच्यासोबत ‘टेल जे’, ‘कॉमन क्रो’, ‘मलबार रेवन’, ‘ब्लू मॉरमन’ ही फुलपाखरे प्रामुख्याने आढळतात.
पावसाळ्यात ‘बहावा’ वृक्षाला नवीन पाने आल्याने ‘कॉमन इमिग्रंट’ या फुलपाखराचे जगण्याला बहर येतो. ‘बहाव्या’च्या कोवळ्या पानांच्या खालच्या बाजूला अंडी लावली जातात. ही अंडी आकाराने गोलाकार नसून लांबट असतात.
दोन ते तीन दिवसांनी अंड्यातून सुरवंट बाहेर पडतात. हिरव्या पोपटी रंगाची ही सुरवंट पानांच्या रंगाशी एकरूप होतात. भक्षकांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ही त्यांची युक्ती असते. इतकेच नव्हे तर चुकूनही कुणाचे लक्ष आपल्याकडे जाऊ नये म्हणून ती अगदी पानाच्या मधल्या रेषेवर येऊन विश्राम करतात. अशावेळी ती सरळ रेषेत एकसंध चिकटलेली असतात. त्यामुळे फक्त पाने खाण्यासाठी ती झाडावर प्रवास करतात.
जसजशी पाने खाऊन ती मोठी होतात तसतशी त्यांना बाहेरील कात सोडावी लागते. असे पाचवेळा घडून एका नवीन सुरवंटात त्याचे रूपांतर होऊन ते पानाच्या खालच्या बाजूला जाऊन चिकटते. हळूहळू त्याचे रूपांतर पोपटी रंगाच्या कोशात होते. या कोशातून बाहेर पडणाऱ्या फुलपाखराचे अविस्मरणीय दृश्य पाहण्यासाठी एक दोन आठवडे वाट पाहावी लागते.
असे हे या फुलपाखराला आश्रय देणारे ‘बहाव्या’चे अत्यधिक गुणकारी झाड जर आपल्या परिसरात असेल तर पावसाळ्यात या फुलपाखरांचे जीवनचक्र अनुभवण्याची सुवर्णसंधी आपल्याला मिळू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.