Taleigao Village Goa Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Taleigao: आदिमानवाला 'ही' भूमी आवडली, त्यांनी तळ्यांची साखळी निर्माण केली; तळ्यांची परंपरा असलेले 'ताळगाव'

Taleigao Village Goa: तळ्यांची साखळीच होती म्हणून आपल्या भूमीला ‘तळयेगाव’, ‘तळेगाव’ असे ग्रामनाम प्रदान केले असावे. याचेच पुढे ताळगाव हे नाव प्रचलित झाले.

राजेंद्र केरकर

गोव्यात अश्मयुग काळापासून वास्तव्य करणाऱ्या मानवी समाजाने चवदार आणि ताजेतवाने करणाऱ्या पेयजलाच्या प्राप्तीसाठी तळ्यांच्या निर्मितीसाठी प्राधान्य दिले होते. आज गोवा राज्याची राजधानी म्हणून जगभर पणजी शहराला नावलौकिक लाभलेला आहे. एकेकाळी हे शहर म्हणजे मच्छीमार समाजाची वस्ती असलेला ताळगावचा छोटा वाडा होता.

तिसवाडी तालुक्यातील कृषिप्रधान आणि आदिवासीबहुल गावडा जमातीने ठिकठिकाणी सागराच्या भरती ओहोटीच्या वेळी येणाऱ्या खाऱ्या पाण्याला बांध घालून निर्माण केलेला हा समृद्ध गाव म्हणजे ताळगाव.

जांभ्या दगडांनी नटलेल्या विस्तीर्ण पठारावरती अश्मयुगीन आदिमानवाच्या पाऊलखुणा सांगणारी प्रस्तर चित्रे गोवा विद्यापीठाजवळ आढळली होती . प्रारंभी नाचणी, वरी यांची पैदास करणाऱ्या इथल्या आदिवासी जमातीने खारभूमी क्षेत्रात क्षारतेचा सामना करणाऱ्या भात पिकाच्या प्रजाती विकसित करून, कालांतराने पठाराच्या सभोवताली वास्तव्य केले.

गावाच्या आजूबाजूला खाऱ्या पाण्यानेयुक्त खाड्या. मांडवी-जुवारी या प्रमुख नद्यांच्या अरबी सागराशी होणाऱ्या मीलनामुळे आणि नद्यांच्या मुखापासून जवळच वसलेली ही ताळगावची भूमी, त्यांना विशेष आवडली आणि त्यामुळे पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी ठिकठिकाणी जणू काही तळ्यांची साखळीच निर्माण केली.

म्हणून आपल्या भूमीला ‘तळयेगाव’, ‘तळेगाव’ असे ग्रामनाम प्रदान केले असावे. याचेच पुढे ताळगाव हे नाव प्रचलित झाले.

पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनात जी प्रचंड पर्जन्यवृष्टी होते, तेव्हा जांभ्या कातळावर गोळा होणारे पाणी ज्याप्रमाणे इथल्या भूगर्भ जलसाठ्याच्या भरणपोषणाला आधार देते, तसेच हे पाणी झऱ्यांतून प्रवाहित होते याचे पारंपरिक ज्ञान असणाऱ्या आदिवासी जमातीने या पाण्याचा नियोजनबद्ध पेयजल आणि सिंचनासाठी वापर करण्याचा पाया सनातन कालखंडापासून घातला.

ताळगाव पठाराशी संलग्न असणाऱ्या नागाळी येथूनच ताळगावची जीवनरेषा असणाऱ्या सांतइनेज नाला म्हणून परिचित असणाऱ्या नदीचा उगम व्हायचा. या नदीत बारमाही उपलब्ध असणाऱ्या गोड्या पाण्याचा हिवाळ्यात उपयोग करून इथले आदिवासी आणि कष्टकरी जातीजमाती मिरची, वांगी, भेंडी, चिटकी, तांबडी भाजी, मुळा आदी भाजीपाल्याची लागवड करायचे.

सांत इनेजच्या पाण्याद्वारे भाजीपाला आणि कडधान्यांची पैदास इथले कष्टकरी करायचे. आज ही जीवनदायिनी सांडपाणी, केरकचरा, मलमूत्र विसर्जन यांच्या असह्य ताणापायी गटारगंगा झाली आहे. आपल्या अस्तित्वासाठी संघर्ष करत ती आज कशीबशी वाहत आहे. पणजी शहरातल्या सुशिक्षित आणि साक्षर समाजाला हे पाणी म्हणजे जीवन आहे, याचे जणू काही विस्मरण झालेले आहे आणि त्यामुळेच तिची परिस्थिती दुर्बल झालेली आहे.

याच गावातल्या दुर्गावाडी येथे कृषिप्रधान ताळगावची ग्रामदेवी सांतेर मृण्मय वारुळाच्या रूपात इथल्या गावडा आणि अन्य कष्टकरी जातीजमातींची जगण्याची प्रेरणा ठरली होती.

दुर्गावाडी येथील एका शेतजमिनीत चिरेबंदी बांधकामाचे जीर्णावशेष आढळले होते. त्या जागेला ‘तळय’ अशी संज्ञा होती आणि लोकमानस ग्रामदेवी सांतेरचे मंदिर इथेच असल्याचे मानते. पोर्तुगिजांनी १५१०साली तिसवाडी जिंकून घेण्यापूर्वी ताळगावातल्या याच ठिकाणी महालक्ष्मी देवीचे मंदिर होते.

गोवा कदंब नृपती जयकेशी (प्रथम) यांच्या राजवटीतल्या २५ एप्रिल १०५४च्या ऐतिहासिक शिलालेखात ताळगावातला ‘पंजणखणी’ उल्लेख असलेला परिसरच नदीकिनारी नावारूपाला आलेल्या या भूमीच्या गतवैभवाची प्रचिती देतो.

जयकेशी (प्रथम) यांच्या कारकिर्दीत अण्णय्य या मुत्सद्दी आणि कर्तबगार अधिकाऱ्याची धर्ममंत्री म्हणून नियुक्ती झाली होती. कालांतराने इथे बहामनीची राजवट आली आणि बहामनी सत्तेचे विभाजन झाल्यावर हा भाग विजापूरच्या आदिलशाहीच्या सत्तेखाली आला.

मांडवीच्या डाव्या नदीकिनारी असलेला राजवाडा २८ फेब्रुवारी १५१० रोजी पोर्तुगीज सैनिकांनी आपल्या ताब्यात घेतला आणि अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात विसरई द मान्यूल द सालढाणा इ अल्बुकर्क यांच्या अमदानीत या राजवाड्याची दुरुस्ती करून पोर्तुगीज स्थापत्यकलेनुसार ‘पालासियो द इदालकॉव’ असा नवा चेहरा दिला.

१८४३साली पोर्तुगिजांनी आपल्या राजधानीचे जुन्या गोव्याहून स्थलांतर पणजीत केले आणि या वाड्याला प्रशासनिकदृष्ट्या विशेष महत्त्व लाभले. राजधानीचे शहर म्हणून अल्पावधीतच ताळगावातील पणजी विकसित झाल्यावरही ताळगावचे ग्रामवैभव काही अंशी अबाधित होते.

पोर्तुगीज अमदानीत जेव्हा मंदिर विध्वंसाचे सत्र सुरू झाले, तेव्हा महालक्ष्मीचे स्थलांतर डिचोलीतल्या मये गावात करण्यात आले होते. १८१९साली महालक्ष्मीच्या नव्या मंदिराचे बांधकाम सध्याच्या जागी करण्यात आले.

देवी महालक्ष्मीच्या आशीर्वचनाने या शहरात भारतभरातून स्थायिक झालेल्या कुटुंबांच्या व्यापार, उद्योगाची भरभराट झाली. ग्रामदेवी सांतेर आणि महालक्ष्मी या दैवतांशिवाय ताळगावात रवळनाथ, बेताळ, रामनाथ यांची मंदिरे असल्याचे संदर्भ आढळतात. ताळगावातील नागाळी, दुर्गावाडी, केवणे, म्हाड्डीन, वडावेल, आमराल बांध, व्हडले भाट, ओयतेन्ता, पोसरेभाट, ओडशेल, शंकरवाडी, पांजणखणी अशी वाड्यांची पूर्वापार असलेली नावे इथल्या कृषिप्रधान आणि समृद्ध अशा पर्यावरणीय संस्कृतीचे दर्शन घडवतात.

सोळाव्या शतकात तिसवाडी महाल ताब्यात आल्यावर त्यांनी ताळगावातल्या पांजणखणीचा इतका कायापालट केला की त्याला आपल्या देशाच्या लिस्बन राजधानीच्या धर्तीवर विकसित करून त्याला नवीन ओळख मिळवून दिली.

मिरामार येथे १५९६साली गास्पार डायस किल्ल्याची उभारणी करण्यात आली. त्यामुळे पोर्तुगिजांनी आपल्या राजवटीत हां हां म्हणता येथील हिंदू धर्म संस्कृतीची चिन्हे नष्ट करून इथे लॅटिन संचिते उभारण्याचा प्रयत्न सफल केला.

श्रीलंकेच्या जाफनापट्टणचे विसरई आमराल द मिनेझिस यांची कन्या दोना पावलाचा विवाह दॉं आंतोनियो द सावतो मोयर यांच्याशी झाला आणि १६८२साली तिचे अकाली निधन झाल्याने ताळगावातील उंचवटा ते किनाऱ्याच्या भागाला दोना पावला हे नाव लाभले. आज जेथे पोलिस मुख्यालय आहे तेथे युद्धसामग्री ठेवण्यासाठी कोर्तेल द आर्तिलहारा या वास्तूचे बांधकाम केले १८५५साली जार्दिन गार्सिया द ओर्ता ही बाग निर्माण केली. पणजीच्या पश्चिमेच्या दलदलीच्या भागात मातीचा भराव टाकून एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात कॉम्पो द डी मॅन्युल म्हणजे कांपाल मैदानाची निर्मिती करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: वर्ल्डकप विजयाचं स्वप्न धुळीस मिळणार? स्पर्धेपूर्वी नको तेच घडलं, स्टार खेळाडू बाहेर

भारत एक गलिच्छ, मागासलेला देश अशी प्रतिक्रिया श्रीलंकेतही मिळते तेव्हा खूप वाईट वाटतं; ‘सब कुछ चलता है’ ही मानसिकता बदलणं जरुरी

अग्रलेख: कारवाईचे आकडे गोव्याला 'ड्रग्जमुक्त' करत आहेत की, गोवा ड्रग्जसाठी अधिक 'आकर्षक' बनत चालल्याचे संकेत आहेत?

GMC Goa: ‘गोमेकॉ’त‘ऑनलाईन अपॉईंटमेंट’चा पहिल्या दिवशी 181 रुग्‍णांना लाभ, 5 ओपीडींसाठी सेवा Video

Anjuna Hotels Sealed: ..अधिकारी पोचले, तरी सुरु होती पार्टी! हणजुणेत कारवाई; 2 हॉटेलना ठोकले टाळे

SCROLL FOR NEXT