मधू य. ना. गावकर
सत्तरी तालुक्यातील पिसुर्ले गावातून वाहणाऱ्या ओहोळाचा जन्म दोन डोंगर रांगांमधील भुईपाल गावच्या घळीत झाला आहे. त्या ओहोळाने भल्या मोठ्या पठारावरील भुईपाल, कुमारखण, पिसुर्ले, वाघुरे, सोलये, सोनशी, होंडा, हरवळे, मोर्ले आणि सालेली गावांना पाणी पुरवठ्याची नैसर्गिक व्यवस्था केली आहे. त्याचबरोबर जंगल, मानव, पशू, पक्षी, सरपटणारे प्राणी, आणि मत्स्यधन यांची साखळी निर्माण करून पर्यावरणाचा समतोल राखला आहे. याची प्रचिती त्या परिसरात फिरल्याने दिसून येते.
सह्याद्रीच्या पूर्वेकडच्या रांगेच्या पायथ्याशी भुईपाल, सालेली आणि मोर्ले गाव वसले आहेत. पश्चिम बाजूने वाघुरे, पिसुर्ले, सोलये, सोनशी, हरवळे हे गाव आहेत. डोंगर रांगेच्या पायथ्याशी ओहोळाच्या पाण्यावर कृषिक्षेत्र घडलेले दिसते.
पठाराच्या मध्य भागात होंडा गाव पसरला आहे. पूर्वी हे सारे गाव कृषी संस्कृतीत वाढले, बहरले होते. गोवा मुक्तीनंतर ते मँगनीज खननामुळे मातीमय झाले. त्यात या गावांना पाणी देणारा ओहळही मँगनीजच्या तावडीतून सुटला नाही.
निळ्या आकाशाचा रंग दाखवत वाहणारे स्वच्छ, रुपेरी पाणी, माती व चिखलाने भरले. ओहोळातून प्रवास करीत येणारे चिखलमय पाणी पिऊन त्यातील बेडूक, मासळी, कासव, सरपटणारे प्राणी आणि मानवास जगवणारी शेती निष्क्रिय झाली. ओहोळातील जैवविविधतेची साखळी नष्ट झाली; जणू मानवाने ओहोळात अणुबाँब टाकला.
त्याच कारणाने आज जीवजिवाणूंना पाण्यासाठी तिथे संघर्ष करावा लागतो. आज त्या ओहोळाच्या काठावर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या ओहोळाच्या पाण्याने तिथली कृषीसंस्कृती आणि जैवविविधता वाढवण्यास हातभार लावला, त्या ओहोळाची वाट मानवी हस्तक्षेपामुळे लागली आहे.
ओहोळाचे पाणी दोन्ही डोंगरांमधील विशाल पठाराच्या अंतरंगात साठवून झऱ्यांच्या रूपाने बाहेर पडते. प्रत्येक गावातून लहान-मोठे ओहळ बनून वाहत एकमेकात सामील होत, आपली शक्ती वाढवून मानवासाठी हे पाणी प्रयत्न करते. पण, स्वार्थी माणसाने आपल्या सुखासाठी मँगनीज खनन करून स्वच्छ वाहणाऱ्या ओहोळाच्या पाण्याची नासाडी करून ठेवली. डोंगरात खोल खड्डे खोदून त्यातील मातीमिश्रित पाणी ओहोळात सोडल्याने कृषी क्षेत्राची मोठी नासाडी झालेली या प्रवासात दिसली.
पिसुर्ले गावात मोठा प्रवाह घडवणाऱ्या ओहोळाचा उगम भुईपाल गावच्या पूर्व बाजूने सपाटो डोंगराच्या कुशीत रेगण्याचे पाणी ठिकाणी झालाय.
तो खालच्या मैदानी भागात येतो तेव्हा त्याला प्रथम कोळमेचे पाणी हा एक ओहळ आणि कावळ्याचे पाणी हे दुसरा ओहळ एकत्रित होऊन मिळतात. त्याच भागात डोणीची व्हाळी हा तिसरा ओहळ मिळतो. हा प्रवाह पुढे जाताना त्याला कलमाचे पाणी, खेतनाची व्हाळी, आणि दबाची व्हाळी असे आणखी तीन ओहळ एकत्र होऊन मिळतात. पुढील भागात प्रवास करीत असताना मुख्य ओहोळास सीतेचा ओहळ मिळतो.
हाच प्रवाह थोडा पुढे सरकतो तेव्हा त्यात बेडशीची व्हाळी, तेमाची व्हाळी सामील होते व हा ओहळ भुईपाल आणि सालेली सीमा भागात पोहोचतो. या भागात त्याला सालेली गावातून वाहणारा गारकोणी ओहळ, सातेरी मंदिर परिसरात मिळाल्याने दोन्ही ओहोळांचा संगम घडून त्याचा प्रवाह मोठा होतो.
सालेलीच्या ओहोळाचा उगम मोर्लेगड हळदीचे पाणी, वागळाची खडी आणि मसुण्णेची व्हाळी हे तीन ओहळ एकत्र होऊन सालेली गावाला पाणी पुरवतात. पुढे गारखोणीचा ओहळ मुख्य ओहोळात सामील झाल्याने त्याचा प्रवाह खूप मोठा होतो. पुढे काजऱ्याची व्हाळीचे पाणी त्याला येऊन मिळते.
तीन गावांच्या सीमाभागात पोहोचून पुढे जाताना त्याला पिसुर्ले गावच्या शेततळ्याचे पाणी, कुमारखण भागातील ओहोळाचे पाणी एकत्रित होऊन तो प्रवाह ओहळ रूपाने वाहत पुढे धोणक आणि होंडा भागात मुख्य ओहोळास मिळतो. त्याचा प्रवाह आणखी मोठा होतो. त्याला मोर्ले गावच्या डोंगरात उगम पावलेले वानराची खडी आणी मोर्ले शेताकडून वाहणारा हे दोन ओहळ त्याला मिळतात. त्यानंतर मोठा झालेला प्रवाह होंडा आजोबा देऊळ परिसरात पोहोचतो.
तिथे सोनशी आणि सोलये गावातून वाहणारा चिऱ्याची व्हाळी हा ओहळ त्याला मिळतो. होंडा सुपाच्या पूडाकडे आल्यावर वरच्या हरवळ्याकडून वाहत येणारा ओहळ त्याला मिळतो. एव्हाना या ओहळाच्या प्रवाहास नदीचे रूप प्राप्त होते. मैदानी भागातून पुढे जात खालच्या हरवळ्यात उंच कड्यावरून रुपेरी अंगाने झेपावत खाली (महादेव) रुद्रेश्वरास गंगारूपी अभिषेक करीत घोंगावत खाली झेपावतो तेव्हा तो शेजो नदी होतो.
या नदीचे पाणी खालचे हरवळे, कुडणे, गावठण आणि विर्डी गावांना ओलावा देत पुढे सावाबांध पार करून सास्तच्या नावतान नदीस मिळते. पुढे कारे खाजन आणि आमोणा गावांना छेदून पुढे आमेशी आणि कारेखाजन विर्डी आणि पिळगाव भागाल वाळवंटीस मिळून पुढे सारमानस परिसरात वरच्या भागात मांडवी नदीस मिळते.
डिचोलीची नदी वाळवंटीस कोठी कारापूर भागात मिळते, तो परिसर या चार नद्यांच्या संगमाने पर्यावरणीयदृष्ट्या अति संवेदनशील बनला आहे. पिसुर्ल्याच्या एका ओहोळाने आपल्या अनेक रूपांनी हरवळे, होंडा, पिसुर्ले, मोर्ले, सालेली, भुईपाल, कुमारखण, सोनशी आणि सोलये ही गावे आपल्या पाण्याने सुजलाम् करण्यास पूर्वजांना मदत केली. या ओहोळाच्या पाण्यात तिकलो, मळ्ये, थिगुर, वाळय, शेगाळ्यो, देखळा, पातकी, दाणय, कुमार, खेकडे ही मासळी मिळत होती. वायंगण सरद शेतात कोंगे, शिंपले हे जीवनोपयोगी नैसर्गिक खाद्य सापडत होते.
येथील स्थानिकांचे पूर्वज दामगो, बेळो, मुडगा, तुरये, खोचरी, धविकरड या भात-बियाण्यांची पेरणी करून धान्याची पैदास करत होते. कुमेरी शेतात नाचणी, वरी, पाकड, सावो, कांग, उडीद, कुळीथ, डोंगरी भात, तूर, मूग, काजू, केळी, नारळ, आंबा, फणस हे कृषी धान्य त्या ओहोळांच्या पाण्यातील ओलाव्याने पिकत होते.
त्या लांब-रुंद आणि उंच हिरव्यागार दोन डोंगरावर भरपूर पाऊस पडत असे. म्हणूनच मधल्या नऊ गावांनी व्यापलेल्या विशाल पठाराला तिथल्या पूर्वजांनी सुजलाम् बनविले होते. भुईपाल गावाला उंच डोंगराचे आच्छादन लाभले आहे. म्हणयेचो डोंगर, भोमाकडचा डोंगर, गुंजीकडचा डोंगर, मिर्मुटी आंबा डोंगर, कोळमेकडचा डोंगर, वोवळी कडचा डोंगर, रुमडाकडचा डोंगर, आमवटाकडील डोंगर, रेणगेचे पाणी डोंगर, गुड्याची मळी, रुमडाकडची दोण अशा अनेक नावांनी भुईपालकडून सालेली गावाकडून जात तो पुढे मोर्ले गड नाव धारण करतो. त्या डोंगरातून वाहणाऱ्या पाण्यावर ते गाव कृषीसंपन्न झाले.
त्याच प्रकारे त्या डोंगरांच्या अंतरंगात मँगनीज, आयर्न, जांभा-दगड आणि पाषाण भरलेले होते. निसर्गाने त्या डोंगरात हिंस्र जनावरे पोसली, पक्ष्यांच्या अन्नाची व्यवस्था केली, मानवास लागणाऱ्या वनस्पती दिल्या होत्या. मधमाश्यांना मध मिळणारी फुले दिली होती. पाळीव जनावरांना भरपूर चारा दिला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.