Goa Dudhsagar River Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa: गोव्यातील 3 नद्यांच्या संगमाचे दर्शन घडवणारे, मुख्य जलमार्गात नौका नेण्यासाठी उपयोगी पडणारे 'तिस्काटो' ठिकाण

Goa Tiscato:अश्मयुगीन आदिमानवांपासून प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक मानवी समूहाने दूधसागर आणि म्हादई यांचा संगम होऊन ‘मांडवी’ म्हणून नावारूपाला येणाऱ्या नदीच्या जलमार्गाचा उपयोग केला होता.

राजेंद्र केरकर

मांडवी ही गोव्याची जीवनदायिनी नदी आहे. तिचा उगम कर्नाटक राज्यातल्या बेळगावच्या खानापूर तालुक्यातल्या देगावात डोंगर उतारावर झऱ्याच्या रूपात होत असतो. ही नदी सत्तरीतल्या कडवळ गावातून गोव्यात प्रवेश करते आणि गांजे गावातून जेव्हा उसगावात प्रवेश करते तेव्हा ही नदी ‘मांडवी’ म्हणून ओळखली जाते.

फोंडा तालुक्यातील उसगाव शेकडो वर्षांपासून जुन्या घाटमार्गांना जोडणारा दुवा ठरल्याकारणाने त्याला भौगोलिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व लाभले होते. त्यामुळे इथे शेकडो वर्षांपासून नानाविध व्यवसाय, उद्योग धंद्यातली मंडळी विविध प्रांतांतून येऊन स्थायिक झाली होती. उसगाव इथल्या समृद्ध इतिहास आणि संस्कृतीची साक्ष देणारा किल्ला आणि अन्य संचिते याची प्रचिती देत असतात.

मांडवी नदीचा गांजे येथून उसगावात दोन्ही बाजूंना असलेल्या माडांच्या कुशीतून होणारा प्रवेश कमालीचा नेत्रसुखद, रमणीय. उसगावच्या सोनारभाट या वाड्याला प्राचीन काळापासून म्हादई आणि दूधसागर अशा दोन प्रमुख जलस्रोतांच्या संगमामुळे विशेष महत्त्व लाभले होते.

खांडेपारचा मुर्डीवाडा, उसगावचे बाळी जुवे, कांतोर , सोनारबाग आदी स्थलनावे या परिसराच्या सांस्कृतिक, भौगोलिक इतिहासाचे दर्शन घडवतात. सोनारबागच्या समोरील बाजूने फोंडा तालुक्यातील माडांनी समृद्ध असलेला वाघुर्मेचा बागवाडा असून या ठिकाणी म्हादई आणि दूधसागरचा संगम होतो. कर्नाटकातल्या काळी व्याघ्र संवर्धन

क्षेत्रातल्या कॅसलरॉकच्या सदाहरित जंगलातून काटला आणि पाळणा या दोन नाल्यांचा उगम होतो. हे नाले एकत्रित येऊन जेव्हा सोनावल गावात कोसळतात तेव्हाच दूधसागर धबधब्याचे नयनरम्य दर्शन घडते.

ही दूधसागर नदी अश्मयुगापासून आदिमानवाला आकर्षित करत होती आणि त्यामुळे पुरातत्त्व शास्त्रज्ञांना आणि संशोधकांना दूधसागर खोऱ्यात अश्मयुगीन शस्त्रे आढळली होती.

दूधसागरची नदी खांडेपार या ग्रामनामानेही ओळखली जाते. उसगाव आणि खांडेपार या दोन्ही गावांना जोडणाऱ्या पुलाखालून ही नदी सोनारबागला वळसा घालून पुढे येते, तेव्हाच म्हादईचा जेथे संगम होतो त्याच जागेला स्थानिकांनी ‘तिस्काटो’ असे नाव दिलेले आहे.

म्हादई नदीशी दूधसागर नदीचा संगम होऊन ती एका बाजूला वाघुर्मे आणि दुसऱ्या बाजूला पाळी अशा दोन्ही गावांमधून ‘मांडवी’ नाव धारण करून वाहते आणि पणजीजवळ तिचा संगम अरबी सागराशी होतो. सोनारबागचा दूधसागर नदी किनाऱ्यावरचा परिसर पूर्वी माडांनी नटलेला होता .

इथल्या माडांवरती कष्टकरी समाजाचे जगणे अवलंबून होते. माडाची सूर काढून मद्य निर्माण केले जायचे. त्याचप्रमाणे गुळाचीही निर्मिती केली जायची. माडांवरती सरसर चढून सूर काढण्याची कला अवगत असणाऱ्या रेंदेरांचे वास्तव्य, त्यामुळेच सोनारबाग येथे होते.

सोनारबाग येथील ‘तिस्काटो’ ही जागा मांडवी, दूधसागर आणि म्हादई अशा तिन्ही नद्यांच्या काठांचे दर्शन घडवत असल्याने, स्थानिकांनी त्याला तीन रस्त्यांना जसे तिस्क असे स्थळ नाम दिले त्याचप्रमाणे सोनारबाग इथल्या संगम स्थळाला ‘तिस्काटो’ ही संज्ञा प्रदान केली.

शेकडो वर्षांपासून ‘तिस्काटो’ या संगम स्थळावरून मानवी समूह पणजी परिसरास जाऊन अरबी सागरावरच्या मुख्य जलमार्गाचा उपयोग करून देश विदेशात जायचे. सोनारबागला स्थायिक लोकांना ‘तिस्काटो’ हे स्थळ ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरले होते.

ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्यांसारखे गोव्यातले पोर्तुगीज अधिकारी जिज्ञासू अभावानेच असत. त्यामुळे इथे पुरातत्त्वीय दृष्टीने संशोधनाला मुळी वाव मिळाला नव्हता. दुसऱ्या जागतिक महायुद्धानंतर आर्थिक मंदीला सामोरे जाताना गोव्यात लोह आणि मँगनीज खनिज उत्खनन करण्याचे परवाने दिले.

उत्खनन केलेला खनिज माल नेण्यासाठी बार्जेसच्या उपयोगाला प्राधान्य लाभले, त्यावेळी सोनारबाग इथल्या तिस्काटो स्थळाचे महत्त्व वृद्धिंगत होत गेले आणि खाण मालकांच्या घाईगडबळीमुळे येथील पुरातत्त्वीय वारसा गायब झाला असावा.

तिस्काटो स्थळी विविध प्रकारची वृक्षसंपदा असली तरी तेथे असलेला महाकाय कदंबवृक्ष त्याचप्रमाणे बायो, सावर आदी वृक्षांमुळे पर्यावरणीय महत्त्व लाभलेले आहे.

उसगाव आणि पाळी या दोन्ही गावांना जोडणारा चौपदरी पूल जेथे बांधलेला आहे तेथे नदी किनारी पीराचा दर्गा होता. अर्जुन वृक्षाच्या सांन्निध्यात असलेला हा दर्गा दर्यावदी, प्रवासी, यात्रेकरू यांच्यासाठी पवित्र स्थळ ठरले होते. होडी, गलबते याद्वारे प्रवास करणारी मंडळी पिराच्या दर्ग्याला नमस्कार करायचे आणि पुढे जायचे.

तिस्काटो या स्थळाचे महत्त्व येथील ख्रिस्ती लोकसमूहाने जाणलेले होते आणि त्यासाठी सेंट सेबेस्तांव कपेलाकडून २४ जूनला सांज्यावानिमित्त प्रार्थना म्हटल्यानंतर घरोघरी भेट देऊन ही उत्साही मिरवणुकीचा शेवट तिस्काटोच्या संगमस्थळी आंघोळ केल्यानंतर होतो. बदलत्या कालखंडात मानवी समाज झपाट्याने बदलत असला तरी तिस्काटोसारखे स्थळ त्यांच्यासाठी नित्य प्रेरणादायी राहणार आहे.

अश्मयुगीन आदिमानवांपासून प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक मानवी समूहाने दूधसागर आणि म्हादई यांचा संगम होऊन ‘मांडवी’ म्हणून नावारूपाला येणाऱ्या नदीच्या जलमार्गाचा उपयोग केला होता. गोव्याला जोडणाऱ्या घाट मार्गातून उसगाव आल्यानंतर सोनारबागच्या या तिस्काटोचा उपयोग मुख्य जलमार्गात नौका नेण्यासाठी केला जायचा. असंख्य आठवणींची साठवणूक करणारा हा ‘तिस्काटो’ त्यामुळे उल्लेखनीय ठरलेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: वास्कोच्या टिळक मैदानाला "लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचं" पूर्ण नाव देणार

गोव्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम होणार का नाही? 7 वर्षापासून GCA ची चालढकल; जमीन काढून घेण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

Digital Parenting: पालकच 'मोबाईलवेडे' झाले तर मुलांकडे लक्ष कोण देणार?

Marcel: बालचमूंचा आनंदोत्सव! गोव्याची समृद्ध लोकनृत्याची परंपरा; माशेलमध्ये रंगल्या स्पर्धा

प्रेमासाठी खाकी वर्दीशी बेईमानी, कारवाईत जप्त केलेले 2 कोटी हडपले; गोवा - मनालीत उधळले, विवाहित पोलिस लव्ह बर्डचा धक्कादायक कांड

SCROLL FOR NEXT