
कोणत्याही सजीवाचा जन्म पाण्याने सुंदर बनतो. ते सुंदरपण जगताना सौंदर्य टिपता आले पाहिजे. त्यातून स्वतः घडता येते. आपली सौंदर्यदृष्टी आपणच विकसित केली पाहिजे. जीवन जगताना अनेक गोष्टी आपल्याला जगण्यास शिकवतात. त्याने आनंदी राहण्यास उत्साहाची ताकद मिळते. आपणास मिळालेला मानवी जन्म अमूल्य आहे.
त्यात येणारी नियती प्रारब्ध असली तरी तिला दूर सारून चांगले कर्म करीत राहणे म्हणजे या जन्मावर, या जगण्यावर प्रेम करणे. प्रेम ही कल्पना दुसऱ्याचा निरपेक्ष विचार करते. त्यात त्यागाची भूमिका असते. हास्य, आनंद, सुख, समाधान यांना आपण जीवनात समजून घेतले पाहिजे.
संधिकालानंतर येणारा दिवस आणि रात्र हे सारे बाजूला ठेवून आकाशाकडे पाहिल्यास त्याच्यातून दिसणारा लुकलुकता प्रकाश हा धरणीवरील वेलीप्रमाणे लांब दिसतो. सौभाग्यवतीच्या नाकात लोंबकळणाऱ्या सोन्याच्या नथीला बनवणारा सोनार, कारागीर त्या नथीत नक्षत्राप्रमाणे चकाकणारे पाचूचे खडे बसवतो. त्यामुळे ती नथ अधिक चमकदार दिसते. त्याचप्रमाणे वाऱ्यावर हलणारे फूल आपला शृंगार दाखवते.
हा सारा पसारा सृष्टीच्या अंगावर जिवंत ठेवण्याचे काम झर, तळी, ओहळ आणि नदीतील पाणी करते. पाणी हा द्रव पदार्थ जड आहे, मात्र तो तापल्याने हलका होतो. त्याचे पृथ्वीकडून सूर्याकडे जाणे आणि सूर्याकडून पृथ्वीकडे येणे चालूच असते. हे येणेजाणे वसंत ऋतूला नवी पालवी, ग्रीष्म्याला दाहकता, वर्षाला पर्जन्य, शरदाला चांदणे, हेमंताला आल्हादकता, हिवाळ्याला थंडी, उन्हाळ्याला उष्णता आणि पावसाळ्याला आपले दर्शन देण्यास वरून खाली येते.
पूर्ण वर्षभरात पाणी वेगवेगळी रूपे घेते. पाण्यात लीन झाल्यास ते तीनमुखी रूपात ईश्वरीय दर्शन देते. जन्मास येणारा कोणताही प्राणी प्रथम सर्वांत जास्त माया आईवर करतो. त्याच प्रकारे पाण्याला माता, आई म्हणून संबोधतात. आपल्या देशातील प्रत्येक नदीचे पात्र, संगमाच्या स्थळांना मातेचे स्थान लाभले आहे.
पौर्णिमा, अमावस्या, शिवरात्री, अष्टमी, रंगपंचमी, कुंभमेळे अशा सणांच्या दिवशी हिंदू धर्मातील लोक वाहणाऱ्या पाण्यात मंगलस्नान करतात. गोव्यात मांडवीच्या तीरावर नार्वे, शेजो, नदीच्या तीरावर हरवळे, खांडेपार नदीच्या तीरावर ओपा, कुशावतीच्या तीरावर केपे, रगाडा नदीच्या तीरावर तांबडीसुर्ल, काणकोण समुद्र किनारा, जुवारी नदीच्या तीरावर सांगे येथील संगमस्थळांवर पूर्वजांनी पवित्र वाटले ते वाहणाऱ्या पवित्र पाण्यामुळे. पाणी पापक्षालन करते, जीवन देते आणि मृत्यूनंतर तेच पाणी राखेत मिसळून स्वर्गात पाठवते, असे हिंदू धर्मात आपण मानतो.
आपल्या गोव्याला पाण्याची कमतरता भासणार हे भविष्य पस्तीस चाळीस वर्षांपूर्वी दैनिक ‘गोमन्तका’त एकजीवनधारा मरणाभिमुख हा पाणी वाचवण्यासंबंधी लेख, वास्तुरचनाकार कमलाकर डी. साधले यांनी लिहून गोमंतकीयांना जागृत करण्याचा प्रयत्न केला होता. ते जरी आठ दशके पूर्ण करून नवव्या दशकाची वाटचाल करीत असले, तरी त्यांचे पाण्याबद्दलचे प्रेम आणि कार्य आजसुद्धा मोठ्या हिरिरीने सुरू आहे.
म्हादईचे पाणी वाचवण्यासाठी म.गो. पक्षाने अभियान सुरू केले होते, त्या पक्षाची पहिली सभा सत्तरीतल्या उस्ते गावात कळसा आणि म्हादई संगम परिसरात झाली होती. दुसरी सभा दि. २० जानेवारी २०२० रोजी सकाळी खांडेपार गावच्या ओपा भागात दुधसागर नदीच्या किनारी दत्तात्रय देवालयाच्या प्रांगणात झाली. त्या सभेला मी उपस्थित होतो. सभेतील लोकांना पाण्याबद्दल जागृत करताना गोवा राज्याचे आताचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पाण्याच्या भविष्याबद्दल जागृत करीत म्हटले होते की, ‘या पुढील भविष्यासाठी गोव्यातील झरी, तळी, विहीर, ओहोळांचे पाणी सुरक्षित आणि स्वच्छ राखले नाही तर गोव्यातील जनतेला पाण्याला मुकावे लागेल’.
आज त्यांची भविष्यवाणी खरी ठरत आहे, म्हणून आता तरी आपण गोमंतकीयांनी पाण्याबद्दल जागृत राहिले पाहिजे. गोमंतकात धरणे बांधण्याच्या अगोदर गावात प्रत्येक तळे, ओहोळावर नैसर्गिक बंधारे उभारून पूर्वज त्या पाण्यावर जगण्यासाठी काम करीत होते. पोर्तुगीज सरकारने १९५४साली खांडेपार नदीच्या पात्रात पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी प्रकल्प उभारण्यास सुरुवात केली. १९५७साली तो पाणी प्रकल्प पूर्ण केला व फोंडा आणि पणजी शहरांना पाणी पुरवण्यास सुरुवात केली. त्याचे बांधकाम करणारे इंजिनिअर होते विश्वेश्वरय्या, ज्यांनी म्हैसूरचे वृंदावन गार्डन बांधून लोकांची मने जिंकली आहेत.
खांडेपार गावचा ओपा हा भाग अति संवेदनशील परिसर आहे. तो भाग दाट हिरवळीने नटलेला आहे. दोन उंच डोंगराच्या घळीत तिथल्या पूर्वजांनी अपार कष्ट आणि ज्ञान वापरून उंच उताराकडून खाली सपाटतळापर्यंत आडवे उभे वाफे तयार केले. तिथल्या ओहोळाच्या उगमाकडून मुखापर्यंत टप्याटप्प्यावर नैसर्गिक बंधारे उभारले. त्यात पाणी साठवून ते पाणी पाटाच्या खळीतून दूर नेत मोठमोठी कुळागरे निर्माण केली.
या ओहोळाचा उगम मनओहळ परिसरात झऱ्याच्या रूपात होतो. ते पाणी तिथे खोदलेल्या तळीत साठते आणि तिथल्या वेळशेत भागाला पुरवले जाते. तिथून खाली येताना तो ओहळ ‘ओपा’ नाव धारण करतो. पुढे त्याचा प्रवास ओपा वाड्याच्या लोकवस्तीकडे पोहोचतो. त्या ठिकाणी त्याला आंबीकडे जंगलात उगम पावलेला दुसरा ओहळ येऊन मिळतो आणि त्याचा प्रवाह मोठा होतो. लोकांची पाण्याची गरज भागवत खालच्या भागातील बंधाऱ्यात साठवून पुढे ते पाणी कुळागराला पुरवतो.
पुढे ओपाचा मुख्य रस्ता पार करून खालच्या भागातील दुसऱ्या बंधाऱ्यात पाणी साठवतो. ते पाणी तिथल्या बागायतीला पुरवून तो पुढील प्रवासात पैदर शेताला आणि कुळागराला पाणी पुरवत दुधसागर नदीला मिळतो. दुधसागर नदीचे गोड पाणी खालच्या भागात जाताना ओपा ओहळ महत्त्वाची भूमिका बजावतो, कारण या ओहोळाच्या पाण्यात जंगली वृक्षवेलीचे औषधी गुण त्या पाण्यातून वाहत नदीच्या पाण्यात मिसळतात व पाण्यातील जैवविविधता वाढण्यास मदत होते. खांडेपार मुख्य रस्ता ते कोडार गावच्या सीमेपर्यंतचा परिसर, हा भाग जैवविविधतेच्या दृष्टीने अति संवेदनशील आहे.
या भागाचा डोंगर माथ्यावरून रानटी जनावरे भूतखांब पठार, पालसरे पठार, आट्याळ भोम पठार तळे परिसरात ये जा करतात. ओपा परिसर भाग जरी दिसण्यास लहान वाटला, तरी जैवविविधतेच्या बाबतीत त्याची गणना मोठी आहे. तिथे गेल्यावर पश्चिम घाटाच्या एखाद्या उंच डोंगराच्या घळीत शिरल्याचा भास होतो. त्या भागात उंचावर गेल्यावर दोन डोंगराच्या घळीतून वाहत जाणारे ओहोळाचे पाणी आपल्या मुखातून दुधसागर नदीस देतानाचे दृश्य आणि तिचे निळे लांब पात्र पाहावयास मिळते.
ओपा भागात सुपारी, आंबा, फणस, नारळ, कोकम, काजू ओटम, केळी लागवडीने आणि जंगल वनस्पतीने शृंगारलेली वनदेवता आणि वाहणाऱ्या ओहोळात, काडय, पिठ्ठोळ, मळये, सांगट, थिगुर, वाळेर, देखला गोड्या पाण्यात वावरत आपले जीवन जगतात. हे सारे घडवण्यास आमच्या पूर्वजांच्या किती पिढ्यांनी आपले आयुष्य वेचले हे सांगणे फार महत्त्वाचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.