जयराम रेडकर
Social Media Ban : सोशल मीडिया म्हणजेच समाज माध्यम हे आजचे दुखणे झाले आहे. कारण याचा सदुपयोग करण्यापेक्षा दुरुपयोग करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. समाज माध्यमांवर व्यक्त केलेल्या गोष्टी आणि त्यावर येणाऱ्या प्रतिक्रिया पाहिल्यावर आपण कोणत्या दिशेने चाललो आहोत याचा संभ्रम निर्माण होतो. या माध्यमाचा उपयोग अनेकदा सायबर गुन्ह्यासाठी केला जातो.
रोज वर्तमानपत्रातून अशा अपराधांच्या बातम्या झळकत असतात. फसवणूक, लुबाडणूक, एखाद्या व्यक्तीचे अपहरण करून आणि त्या व्यक्तीला मरणाची भीती घालून आपणास हवे ते वसूल करणारे प्रकार या सोशल मीडियाच्या गैरवापराने होऊ लागले आहेत.
या अपराधातील लहान मुलांचा सहभाग लक्षणीय आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन सरकारने अबोध अशा षोडशीय वयातील मुलांसाठी इंटरनेट म्हणजेच आंतरजाल वापरण्यास मज्जाव केला आहे. आपल्याकडेही याची साधक बाधक चर्चा सध्या होऊ घातली आहे.
मागच्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी नेहमीच ‘विज्ञान शाप की वरदान?’ अशी वादविवाद स्पर्धा आयोजित केली जायची. आज ती होत नसावी कारण विज्ञान हे शाप नसून वरदान असल्याचा साक्षात्कार नवीन पिढीला झाला आहे.
कोणत्याही गोष्टीच्या दोन बाजू असतात. प्रत्येकात गुण दोष असतातच! अशावेळी जमेची बाजू कोणती याचा विचार माणूस करीत असतो आणि ती गोष्ट स्वीकारायची किंवा नाही याचा निर्णय घेत असतो. संगणकाची छोटी आवृत्ती म्हणजे भ्रमणध्वनी संच होय.
आज हे संयंत्र प्रत्येकाच्या हातात दिसते. दूरवरच्या व्यक्तीशी कधीही कुठूनही संभाषण, संदेश वहन, महत्त्वाचा मजकूर, फोटो यांची देवाणघेवाण, बँकेचे आर्थिक व्यवहार इत्यादी गोष्टी या उपकरणाने सुलभ झाल्या आहेत.
असे असले तरी या संयंत्राचा आणि तंत्रज्ञानाचा वापर काही चलाख आणि लबाड माणसे करतात आणि लोकांची फसवणूक करतात हेही तितकेच खरे. यासाठी आपण सावध आणि जागरूक राहणे गरजेचे असते. भारतीय रिझर्व्ह बँक आणि पोलीस यंत्रणा त्यासाठी वारंवार सूचना देत असतात. त्या सूचना लक्षात घेतल्यास आपण फसवणुकीपासून दूर राहू शकू.
कोविड काळ संपला असला तरी अध्यापन-अध्ययनात भ्रमणध्वनी वापरणे पूर्णपणे बंद झालेले नाही. कारण मुलांना या प्रक्रियेचे व्यसन लागले आहे. या संयंत्रावर अनेक प्रकारच्या गोष्टी दिसू लागल्या आहेत. मुलांना आवडणारे, स्पर्धात्मक आणि मनोवेधक खेळ यावर दिसू लागले.
शालेय मुलांना याचे वेड लागले आणि मुलांच्या वर्तनात आमूलाग्र बदल घडला. अनेक मुले हट्टी व हिंसक बनली. ही गोष्ट ऑस्ट्रेलियन सरकारच्या फार लवकर लक्षात आली आणि म्हणूनच त्या देशाने षोडशीय विद्यार्थ्यासाठी आंतरजालच बंद करून टाकले. जो कोणी हा कायदा मोडेल त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा आदेश निघाला.
आपल्याही देशात अशाच प्रकारचा नियम करावा का नाही यावर चर्चा आता होऊ घातली आहे. अनेक पालकांना वाटते की भ्रमणध्वनी किंवा संगणक वापराने आपल्या मुलांचे ज्ञान अद्ययावत होते. त्यांचे शालेय प्रकल्प तयार करणे, नवनव्या गोष्टींचे ज्ञान मिळवणे सुलभ होते म्हणून या माध्यमाचा वापर सुरू असावा तर काही पालकांची प्रतिक्रिया याहून वेगळी आढळते.
कारण त्यांची मुले संगणक आणि भ्रमणध्वनीच्या इतकी आहारी गेली आहेत की त्याच्या पलीकडे त्यांचे दुसरे जगच राहिलेले नाही. त्यांची मानसिकता बदलली, वागण्या बोलण्यात तारतम्य राहिले नाही. शालेय अभ्यासापेक्षा भ्रमणध्वनीवर दिसणारे खेळ, हिडीस आणि उत्तान दृश्ये यातच ही कोवळ्या वयाची मुले व्यग्र राहू लागली.
जेवणखाण विसरली. याचा वाईट परिणाम त्यांच्या शरीर प्रकृतीवर, नजरेवर आणि वर्तनावर झाला. काही मुले गुन्हेगारीकडे वळली. त्यांच्यावर पालकांच्या सांगण्याचा कोणताही परिणाम होईनासा झाला. अशी मुले क्रीडांगणापेक्षा ठरावीक मुलांच्या घोळक्यात भ्रमणध्वनीवरचे खेळ आणि अश्लील चित्रफिती पाहण्यात अधिक रममाण होऊ लागली.
त्यांचे अवांतर वाचन जवळजवळ बंद पडले. अभ्यासावरचे त्यांचे लक्ष उडाले. परिणामी त्यांचे शालेय शिक्षण बिघडले. भविष्याच्या दृष्टीने हे घातक आहे - त्यांच्या वैयक्तिक जीवनासाठी आणि समाजासाठीदेखील!
शिक्षकांचेही या बाबतीतही दोन मतप्रवाह आढळतात. एक गट समाजमाध्यमांचे समर्थन करतो तर दुसरा गट विरोध! शेवटी आधुनिक उपकरणांचा कितपत उपयोग करावा याचे तारतम्य बाळगणे आवश्यक असते. अपरिहार्यता असते तोपर्यंत ठीक आहे परंतु ज्याची आता गरज उरलेली नाही अशावेळी त्याचा वापर टाळणे किंवा मर्यादित करणे हितावह ठरते.
कोविड काळात सर्वांचीच कुचंबणा झालेली होती. कर्मचारी घरी बसून संगणक किंवा भ्रमणध्वनीचा वापर करून आपले काम करीत होते. कुटुंबातील सर्व मंडळी एक प्रकारे घरात बंदिस्त झाली होती. अशावेळी दूरदर्शन संच, भ्रमणध्वनी आणि संगणक हीच उपकरणे माणसाच्या मदतीला आली होती.
२००२साली तत्कालीन मुख्यमंत्री कै. मनोहर पर्रीकर यांनी इंजिनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सरकारच्या वतीने अल्प किमतीत संगणक उपलब्ध करून दिले. पुढे या योजनेची व्याप्ती वाढवून उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांना संगणक देण्यात आले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात संगणक कक्ष सुरू करण्यात आले. कोविड काळात उच्च प्राथमिक आणि माध्यमिकच्या मुलांना छोटे भ्रमणध्वनी ज्यांना टॅब्लेट म्हटले जाते ते देण्यात आले. अशा प्रकारे संगणक आणि सोशल मीडियाचा शिरकाव शिक्षण व्यवस्थेत झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.