

Mohammad Rizwan vs Litton Das Viral Video: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सिल्हट येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात राडा पाहायला मिळाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान आणि बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दास यांच्यातील वादामुळे मैदानातील वातावरण चांगलेच तापले. या दोन्ही खेळाडूंमधील वाद इतका वाढला की अखेर अंपायर्सना मध्यस्थी करुन हा वाद मिटवावा लागला. या संपूर्ण वादादरम्यान बांगलादेशच्या खेळाडूंनी रिझवानची जबरदस्त खिल्ली उडवली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा सगळा प्रकार पाकिस्तानच्या (Pakistan) दुसऱ्या डावातील 72व्या षटकादरम्यान घडला. रिझवानने मैदानावर आपले अर्धशतक पूर्ण केल्यानंतर साईट स्क्रीनच्या पाठीमागे काहीतरी हालचाल होत असल्याची तक्रार अंपायर्सकडे केली. मात्र, बांगलादेशचा यष्टिरक्षक लिटन दास याला रिझवानची ही तक्रार अजिबात आवडली नाही. रिझवान हा केवळ 'ओव्हरअॅक्टिंग' करत असून बांगलादेशी गोलंदाजांची लय बिघडवण्यासाठी आणि वेळ वाया घालवण्यासाठी जाणूनबुजून असे प्रकार करत असल्याचा टोला लिटनने लगावला. यावरुन दोघांमध्ये थेट शाब्दिक बाचाबाची सुरु झाली.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये लिटन दास रिझवानला, "हे तू काय करतोयस?" असे विचारताना दिसतो. त्यावर रिझवानने साईट स्क्रीनकडे बोट दाखवत, "तिकडे बघ, तो उभा आहे," असे उत्तर दिले. लिटनने पुन्हा प्रत्युत्तर देत, "तिकडे काय बघतोयस? इकडे फलंदाजी कर," असे सुनावले. इतकेच नव्हे तर लिटन दासने पुढे मिश्किलपणे, "अर्धशतक झाले की आता याची अॅक्टिंग सुरु होणार," असा खोचक टोला लगावला. हे ऐकताच रिझवानचा पारा चढला आणि दोघांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. अखेर अंपार्यसनी मध्यस्थी करत दोघांना शांत केले, तरीही बांगलादेशी खेळाडूंनी रिझवानला सोडले नाही.
मोहम्मद रिझवान हा मैदानावर अनेकदा अशा वेगवेगळ्या आणि ड्रामा करणाऱ्या हरकतींसाठी ओळखला जातो. याच कारणामुळे षटक संपल्यानंतर बांगलादेशच्या इतर क्षेत्ररक्षकांनीही रिझवानची फिरकी घेण्यास सुरुवात केली. बांगलादेशी खेळाडू स्टॅम्प माईकमध्ये रिझवानला चिडवताना, "या ओव्हरअॅक्टिंगचे आम्ही 50 पैसे कापणार, हा खूप चांगली अॅक्टिंग करतो हे सगळ्यांना ठाऊक आहे," असे म्हणताना ऐकू आले. तसेच, "या अॅक्टिंगनंतर संघात जागा पक्की आहे, म्हणूनच हा असे प्रकार करतो," अशी टीकाही त्यांनी केली.
सामन्याचा विचार केला तर चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा पाकिस्तानने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 316 धावा केल्या होत्या. पाकिस्तानला विजयासाठी अजूनही 121 धावांची गरज आहे. मोहम्मद रिझवान 75 धावांवर नाबाद असून साजिद खान 9 धावांवर खेळत आहे. तर दुसरीकडे, बांगलादेशचा संघ कसोटी इतिहासात पहिल्यांदाच पाकिस्तानला त्यांच्याच मायभूमीत 'क्लीन स्वीप' देण्यापासून अवघे 3 बळी दूर आहे. पहिल्या कसोटीत बांगलादेशने 104 धावांनी विजय मिळवून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.