Goa Opinion| श्रमणांच्या वाटा Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

गोव्याचा इतिहास हा जागतिक वसाहतवादाचा, स्थलांतराचा आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा इतिहास बनतो; श्रमणांच्या वाटा

Goa History: प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारून आपला समाज असा का आहे (आणि असाच का आहे) हे समजण्यात, त्याचे आकलन करण्यात समाधान मिळे.

गोमन्तक डिजिटल टीम

कौस्तुभ नाईक

माझ्या जीवनात मी एक महत्त्वाचा निर्णय २०१४साली घेतला, तो म्हणजे संगणकशास्त्राचे पदव्युत्तर शिक्षण सोडून मी सामाजिक विज्ञानात संशोधन करायचे ठरवले व पुणे सोडून दिल्लीला आलो. त्याचवेळी भारतीय राजकारणात एक आमूलाग्र बदल होऊन भाजपचे सरकार देशात स्थापित झाले होते.

आधीच माझा कल नाट्यकलेत असल्याने दिल्लीतल्या आंबेडकर विद्यापीठात मी ‘परफॉर्मन्स स्टडीज’ ह्या विषयात एमएसाठी मी प्रवेश घेतला. आंबेडकर विद्यापीठ शीला दीक्षितांच्या प्रोत्साहनाने दिल्लीत सुरू झालेले सामाजिक विज्ञानाचे विद्यापीठ होते आणि उच्च शिक्षणात नवीन व अभिनव प्रयोग करण्यास उत्सुक होते.

भारतातील एक अग्रेसर शिक्षणतज्ज्ञ श्याम मेनन हे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यांच्या नेतृत्वाखाली खूप कमी वेळात आपल्या आधुनिक आणि प्रयोगशील शिक्षणप्रणालीमुळे आंबेडकर विद्यापीठाचा दबदबा निर्माण झाला होता.

एका बाजूला सरकारी पातळीवरून कायम केले जाणारे हिंसेचे राजकारण आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक विज्ञानातून उलगडत जाणारा भारताचा व एकूण जगाचा पट हा माझ्यासाठी एक विलक्षण अनुभव होता.

प्रत्येक गोष्टीत प्रश्न विचारून आपला समाज असा का आहे (आणि असाच का आहे) हे समजण्यात, त्याचे आकलन करण्यात समाधान मिळे. दुसऱ्या बाजूला सरकारविरोधात, खास करून उच्च शिक्षणाच्या खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चे उभे राहत होते त्यात भाग घ्यायची संधी दिल्लीत मिळाली.

एका वेगळ्या अर्थाने समृद्ध झालो, असे वाटले. विद्यापीठात शिकताना अनेक लेखक, राजकारणी, चळवळीतील लोक ह्यांच्याशी ओळखी झाल्या. त्यांचे साहित्य वाचले. आंबेडकर विद्यापीठातल्या दोन वर्षात कधीही परीक्षा नव्हती.

अटेन्डन्स सक्तीचा नव्हता. पण माझ्या आयुष्यातील सर्वात जास्त वाचन आणि लेखन मी ह्या दोन वर्षात केलं असेन. प्रोफेसर एवढ्या आत्मीयतेने आणि कलात्मक शिकवत की तासाला दांडी मारण्याचा प्रश्नच नव्हता.

ह्याच काळात मी एमएच्या अखेरीस गोव्यातल्या तियात्र संस्कृतीवर एक लघुप्रबंध सादर केला. तियात्रातून गोव्याच्या प्रादेशिकतेची कशी निर्मिती होते व तिचा कॅथलिक समाजाच्या सांस्कृतिक राजकारणावर कसा परिणाम होतो ह्याविषयी तो प्रबंध होता. तो लिहिता लिहिताच इतिहास संशोधनात करिअर करण्याची इच्छा मनात उत्पन्न झाली.

हा प्रवास इथेच थांबला नाही. आंबेडकर विद्यापीठातील अनुभव गाठीशी बांधून मी जेएनयूमध्ये प्रवेश घेतला. जेएनयूच्या वातावरणाने माझ्या विचारांना अजून प्रगल्भ केले. आंबेडकर विद्यापीठातील एमए संपल्यानंतर जेएनयूमधून एमफिल आणि आता २०२१सालापासून अमेरिकेतल्या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात पीएचडीपर्यंतचा हा गेल्या एका तपाचा प्रवास आहे.

माझ्या संशोधनाचा विषय हा गोव्याच्या इतिहासाशी निगडित असला तरीही ह्या सगळ्या अकादमीक भ्रमंतीमुळे गोव्याकडे बघायची एक व्यापक दृष्टी मिळाली. फिलाडेल्फियासारख्या ऐतिहासिक शहरात बसून, किंवा लिस्बनमधील अर्काइव्ह्ज धुंडाळताना गोव्याचा इतिहास हा केवळ एका राज्याचा राहत नाही, तर तो जागतिक वसाहतवादाचा, स्थलांतराचा आणि संस्कृतीच्या देवाणघेवाणीचा इतिहास बनतो.

ह्या भ्रमंतीत बरेचसे देश फिरायचीही संधी मिळाली. कुठल्याही देशात गेलो तर आवर्जून तिथली नाट्यगृहं, विद्यापीठं, पुस्तकांची दुकानं पाहिली. त्यामुळे संशोधक म्हणून घडतानाच एक माणूस म्हणूनही माझ्या संवेदना अधिक प्रगल्भ झाल्या.

ह्या भ्रमंतीला जर ‘रोमँटिसाइज’ करायचेच झाले तर ऐहिक विसरून काहीतरी मूलभूत असं शोधणाऱ्या श्रमणांकडे करता येईल. प्राचीन भारतात श्रमण हे सत्याचा शोध घेण्यासाठी प्रस्थापित चौकटीबाहेर पडत असत.

माझी ही ज्ञानसाधना आणि भौगोलिक भटकंती काहीशी तशीच आहे. म्हणून ह्या सदराला ‘श्रमणांच्या वाटा’ असे नाव देणे संयुक्तिक वाटले. या वाटेवरून चालताना मला गवसलेले इतिहासाचे तुकडे, साहित्यातील संदर्भ आणि वर्तमानाशी त्याचे असलेले नाते, हे सर्व मी या सदरातून उलगडणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tillari Dam: 'तिळारी'च्या कमांड क्षेत्रातून मोठा भूभाग वगळण्याचा प्रस्ताव गोव्यासाठी घातक, कॅसिनोसाठी धोकादायक पायंडा नको

Goa Live News: कलंगुटमध्ये निर्माणाधीन हॉटेलला भीषण आग

Carambolim Mega Project: करमळीतील ‘तो’ प्रकल्‍प थांबवणार! मुख्‍यमंत्र्यांचे आश्‍‍वासन; काम थांबवण्‍याचा आदेश होणार जारी

Bhagut Utsav Goa: घनदाट जंगल, अंधारी गुहा; गोळावलीतील सिद्धेश्वराचा ‘भगुत उत्सव’; 300 वर्षांची परंपरा उत्साहात; शेकडो भाविकांची उपस्थिती

Goa Lokayukta: गोव्यातील लोकायुक्त निवड आणखी लांबली! 16 जानेवारीनंतर बैठक होण्याची शक्यता; सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

SCROLL FOR NEXT