

एका प्रख्यात समाज कार्यकर्ता, डॉक्टरला टीव्ही डिबेटसाठी परवा फोन केला. तो म्हणाला, ‘‘नाही रे काही बदल होत नाहीत. कशाला आम्ही घसा फोडून बोंबलत राहायचे? काही निष्पन्न होत नाही.’’
त्यात सत्यही आहे. समाज कार्यकर्त्यांनी बोलत राहावे. रस्त्यावर उतरावे. प्रसारमाध्यमांनी आक्रमक असावे, परंतु आपण हवे तसे वागणार असा आविर्भाव सध्या मध्यमवर्गाने स्वीकारला आहे. तो पोटार्थी बनलाय. स्वार्थी, आपमतलबी, आत्मकेंद्रित. एकेकाळी कांद्याचे भाव वाढले तर तो सरकारे पाडीत असे.
गोवा मुक्तीपेक्षाही वसाहतवादाच्या जोखडातून बाहेर निघाल्यानंतर सहा वर्षांत जनमत कौलाची चळवळ झाली, त्यात गोमंतकीयांनी पोटतिडकीने योगदान दिले. आता या चळवळीला ६० वर्षे पूर्ण व्हायला केवळ एक वर्ष बाकी असताना काय परिस्थिती आहे?
निराशेची भावना आहे. लोकांमध्ये अस्वस्थता आहे. या परिस्थितीला असंतोष म्हणायचा काय? कारण असंतोष माणसाच्या जिवंतपणाचे लक्षण असते. या जिवंतपणापासूनच एक छोटीशी ठिणगी आगीचा भडका निर्माण करते. परंतु आज देशभर ही अशीच निराशेची परिस्थिती आहे. गोव्यात तर आपल्या राज्याच्या अस्तित्वाच्या काळजालाच कुरतडले आहे!
या कारस्थानात सगळे सारखेच सामील आहेत.
सरकारलाच का दोष द्यावा? स्वतः वेगळे असल्याचे सांगून नवे पक्ष अधिकारावर येतात, परंतु सत्तेवर येताच ते व्यवस्थेचा भाग बनतात. त्यामुळे निवडणूक, सरकारे, राजकीय पक्ष, बोलघेवडे नेते आणि बहुजन समाजातील चेतना या पलीकडे आता विचार करायची वेळ आली आहे. त्यातून स्वतःच्याच काळजाकडे बघण्याची वेळ आली आहे. म्हणजे आत्मपरीक्षण!
गोव्याच्या काळजाला जे नख लागले आहे, ते कोणी लावले?
हल्लीचेच उदाहरण ः ‘बर्च बाय रोमिओ लेन नाईट क्लब’मधील अग्नितांडव. २५ जणांचा होरपळून मृत्यू. आता सत्य बाहेर येतेय ते असे. २०० नाईट क्लब आहेत. त्यातील कित्येकांना परवाने नाहीत. त्यातून समोर आली किडलेली राजकीय व्यवस्था! कित्येक वर्षे ही अराजकता चालली होती.आपल्यासमोर खाण उद्योगाची हाराकिरी होती, परंतु त्यातून धडा न घेता आम्ही पर्यटनातील, बांधकाम उद्योगातील अंदाधुंदी खपवून घेत गेलो.
पर्यटकांची गर्दी वाढत होती. गेल्यावर्षी एक कोटी पर्यटक येऊन थडकले, परंतु यावर्षी हॉटेले रिकामी होती. रेस्टॉरंट अर्धी होती अन् शॅकचालक कपाळाला हात लावून बसले होते.
अनेक कारणे: पर्यटकांनी हॉटेलांपेक्षा एअर बीएनबी व्यवस्था पसंत केली. पर्यटक आता दक्षिण आशियाई देश पसंत करू लागलेत. मी व्हिएतनामला गेलो असता एक दिल्लीतला पर्यटक तेथे भेटला. तेथे स्वस्त आहेच, शिवाय पायाभूत सुविधा व इतर सेवा खात्रीशीर असल्याचे ते सांगत होते. येथे हॉटेलांनी, टॅक्सींनी, रेस्टॉरंट यांनी कमालीचे भाव वाढवून ठेवलेत.
त्याशिवाय इतर माफिया आहेच. भू-बळकाव, जमिनींवर कब्जा, पर्यावरणाचा र्हास, सीआरझेडमधील बांधकामे... त्यामुळे विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविली. त्यात राज्याला कसलाही फायदा नसलेल्या आंबटशौकीन पर्यटकांची टोळधाड! पणजीची जुगारी व मसाजनगरी बनली आहे! वेश्याव्यवसायच हा!
ही गोव्याची ओळख नव्हती!
हिप्पींनी गोवा शोधला म्हटले तर अनेकांना राग येईल, परंतु ते शांत, शीतल, निसर्गरम्य भूमीच्या शोधात गोव्यात आले आणि आमच्या भूमीच्या प्रेमात पडले. त्यावेळी २०-२२ वर्षे वयाची ही पिढी आज सत्तरी ओलांडलेली आहे.
मला बर्लिनच्या एक भागात ‘गोवा’ नाव दिसले म्हणून मी आत शिरलो, तर तेथे पूर्वाश्रमीच्या हिप्पींनी गोव्याच्या ‘नोस्ताल्जिक’ आठवणींचा चित्ररूपी कोलाज उभा केला होता... ते गोव्यात येत. शांतपणे राहत. त्यांनी कोणाला अडचण निर्माण केली नाही. गोव्यावर किंचितही ओरखडा उमटवला नाही.
आजचा पर्यटक व भुकेलेला, वासनेने चवताळलेला दिल्लीकर येथे गर्दी करतो. गडबड, गोंगाट हा त्याचा स्थायिभाव आहे. अतिपर्यटनाची ही कटू फळे जगभर दिसतात. स्पेन, इटली, ग्रीस, ऍम्स्टरडम येथे स्थानिक रोष व्यक्त करतात. या पर्यटकांनी संस्कृतीवर घाला घातलाच, शिवाय स्थानिकांचे दैनंदिन जीवन हराम करून टाकले.
गोवा त्यांच्याही पुढे गेला, कारण गोवा विक्रीलाच काढलाय, अशी परिस्थिती निर्माण झाली. एकेकाळी पोर्तुगीज हैदराबादच्या निजामाला गोवा विकायला निघाले होते!
दिल्लीवाल्यांनी प्रचंड पैसा घेऊन गोव्याकडे कूच चालवली आहे. हा आपल्या चिमुकल्या राज्याचा अस्तित्वाचाच प्रश्न आहे. आमच्या अधाशीपणाने, अविचारीपणाने आम्हीच हा नाश घडवून आणला आहे.
नेत्यांचे, राजकारण्यांचे सोडून द्या, आम्ही काही विचारी लोक या परिस्थितीला वेगळे वळण देऊ शकत नाही का? परवा न्यायमूर्ती फर्दिन रिबेलो बोलले. त्या वक्तव्याची अनेकांनी दखल घेतली. चर्चा झाली. काहीच फरक पडला नाही, असे आम्ही कसे म्हणू शकतो?
त्यातून महत्त्वाची गोष्ट. जनमत कौलाची चळवळ सहज घडली नाही. मुंबईत स्थायी काम करणारे कवी शंकर भांडारी यांच्यासारखे अनेकजण नोकऱ्या सोडून अनिश्चित भविष्यासाठी गोव्यात धावून आले व त्यांनी या चळवळीसाठी प्रचंड मेहनत घेतली. त्याग केला. सर्वस्व पणाला लावले...
‘केल्याने होत आहे रे...’ हाच तो संदेश!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.