Sanguem kushavati rock carvings Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

कातोर - फातोराची निर्मिती त्याकाळी 'देवमाश्या'च्या शेपटीच्या तडाख्याने झाल्याची लोकश्रद्धा आहे; सांग्यातल्या अश्मयुगीन काळातील खुणा

Sanguem kushavati rock carvings: इतिहास आणि संस्कृतीच्या अश्मयुगीन काळातल्या असंख्य खुणा आजही कुशावती नदी किनाऱ्यावरच्या फणसायमळ परिसरातल्या जांभ्या दगडावरच्या प्रस्तर चित्रांतून अनुभवायला मिळतात.

राजेंद्र केरकर

सांगे या दक्षिण गोव्यातल्या तालुक्यात एकूण गावांची संख्या आज जरी कमी असली तरी क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून गोव्यातला हा सगळ्यात मोठा तालुका आहे. या तालुक्यातील नेत्रावळी या गावाला एकेकाळी इतिहास आणि संस्कृतीचा जो समृद्ध वारसा लाभला होता, त्याच्या पाऊलखुणा आज इथे पाहायला मिळतात.

नेतुर्ली म्हणजेच नेत्रावळी नदीने समृद्ध केलेला निसर्गरम्य गाव एकेकाळी जोयडा आणि काणकोणला जाणाऱ्या घाटमार्गात वसल्याने तेथे नानाविध जातीजमातींची वस्ती पूर्वापार आहे. जुन्या काळी या गावात विविध प्रसंगी न्यायनिवाडा करणारी चावडी अस्तित्वात होती.

सिद्धेश्‍वर, बंधनपुरुष, महालक्ष्मी, दुर्गा, नायकी पुरुष, दत्तात्रय, बोबडेचा उदेंगी, पाटवडचा उदेंगी, हळदीकुणगोचा भक्तिपुरुष, नेतुर्लीचा भक्तीपुरुष, गवळावाड्यावरचा पेर्नोटी देव, बारा जल्मी, बांधवाड्यावरचा वार्गती, पाईक देव आणि बेताळ वर्गणीची दुर्गा आणि कान्नखुटी, चावडीचा दरवटो देव, बुडबुड्या तळीवरचा गोपिनाथ आदी दैवते इथल्या समृद्ध इतिहासाचे आणि संस्कृतीचे साक्षीदार आहेत.

कुर्पे गावात कुर्पेश्वराबरोबर नाथ संप्रदायाशी नाते दर्शवणारा माधवनाथ इथे आहे कुर्पेच्या वार्षिक काल्यात अंबाबाईचे स्मरण करण्याची परंपरा आहे.

विचुंद्रे गावात चंद्रनाथ, भूतनाथ, मल्लिकार्जुन, बेताळ ही दैवते असून, इथे असलेले नारायण देवाच्या मंदिराचे भग्नावशेष, महिषासुर मर्दिनीची मूर्ती त्याचप्रमाणे गावातील मुख्य रस्त्यालगतची पवित्र तळी आणि धर्माबाय यांच्याशी निगडीत पुरातत्त्वीय आणि धार्मिक संचिते गावाच्या शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष देतात.

विळियणचा सिद्धनाथ, कुंभारी येथील शेकडो वर्षांच्या परंपरेचा साक्षीदार मल्लिकार्जुन आणि तेथील जुनी श्रद्धास्थाने, तळावलीचा कलनाथ आणि तेथील जंगलात उभे असलेले महापाषाण युगाशी नाते, जांभ्या दगडातले संचित, दिघी घाट मार्गातील धारजिणीची गवळादेवी, डोंगरीचा पाईकदेव, शिगोणेचा रामनाथ, नायकिणीचा नागनाथ ही दैवते सांगे तालुक्याच्या जुन्या काळातल्या इतिहासाची स्मृती जागवतात.

सिद्दा डोंगराच्या पायथ्याशी वसलेला आणि लाखो वर्षांच्या पर्यावरणीय इतिहासाच्या खाणाखुणा मायरिस्टिका म्हणजे जंगली जायफळाच्या वनस्पती वैभवाचे संचित जपणारा भाटी गाव, मल्लिकार्जुन, कणेरसिद्ध आणि पाईक देवाच्या उपासनेसाठी ख्यात आहे .

सह्यादी पर्वताच्या माथ्यावर वसलेला वेर्ले गाव आज जरी दुर्गम मानला जात असला तरी एकेकाळी घाटमार्गात वसल्याने त्याला आर्थिक महत्त्व लाभले होते. सालजिणी, तुडव, बिलिये, कुडणे, नडके आणि बोडके या गावांशी त्याचे पूर्वापार सांस्कृतिक आणि धार्मिक अनुबंध अनुभवायला मिळतात. वेर्लेतील रामनाथ, चंद्रेश्वर- भूतनाथ कोळपुरुष या दैवत परिवारात सालजिणीची सप्तकोटीश्वर आणि कणकादेवी, तुडवातील उदेंगी आणि नडकेची खुटी महामाया यांचा समावेश होतो.

जुवारी नदी किनारी वसलेला सावर्डे हा गाव रेल्वे वाहतुकीमुळे नावारूपास आलेला असला तरी जुन्या काळी मैसाळ, कोडली, दूधगळा, पेरी उदक आणि आंबे उदक यांना जोडणारा गाव आठ बार्से म्हणून ओळखला जायचा.

नागनाथ, सातेरी, बेताळ आणि सांगेली देवी यांचा कृपाशीर्वाद लाभलेल्या या गावाला हवा, ध्वनी, जल प्रदूषण करणाऱ्या खनिज वाहतुकीच्या व्यवसायाचा विळखा पडण्यापूर्वी लोकसंस्कृतीचा श्रीमंत वारसा लाभला होता.

धारबांदोड्यातल्या शिगावाशी ज्याची सीमा भिडते त्या काले गावालाही जुन्या काळापासून प्रचलित व्यापार आणि उद्योग यामुळे भरभराट लाभली होती. त्यामुळे देवनामळ, पोकरमळ, काऱ्यामळ, बटवाडी, वाघरेगाळ, कुयणामळ, खुडवामळ, थोरले मळ, येदीमळ, दुधाळ, खुटकरवाडा आदी वाड्यांनी युक्त गावात कलनाथ, सातेरी, केळबाय पाईक या दैवतांचे पूजन केले जाते. मांडवीशी एकरूप होणाऱ्या काले नदीच्या काठावर वसलेल्या या गावात पूर्वापार नाना जातीजमातींचे वास्तव्य आहे.

काले येथील कलनाथ मंदिरापासून जवळच जंगलात जांभ्या दगडात कोरलेली पुरातन वास्तू या गावाच्या प्राचीनत्वाकडे लक्ष वेधते. डोंगर माथ्यावर असलेल्या कातोर - फातोराची निर्मिती त्याकाळी सागराच्या पाण्यात विहरणाऱ्या देवमाश्याच्या शेपटीच्या तडाख्याने झाल्याची लोकश्रद्धा प्रचलित आहे.

नेतुर्लीमार्गे वेर्ले जाताना जो रणमंडळ पर्वताचा परिसर आहे, त्याला गतकाळातल्या विस्मृतीत गेलेल्या इतिहासाची पार्श्‍वभूमी लाभलेली आहे. एकेकाळी सांगे तालुक्यात गावांचा एकत्रितरीत्या कारभार पाहण्यासाठी आठ तरफा अस्तित्वात होत्या असे गोव्याचे सांस्कृतिक इतिहासकार अनंत धुमे यांनी नमूद केलेले आहे.

रिवण तरफात रिवण आणि जांबावली, कोळंब तरफात एकमेव कोळंब गाव, कुर्डी तरफात कुर्डी - कुर्पे, पोत्रे, झामोडे, हातयाने आणि आंगड, नेत्रावळी, जाके - नुंदे, वेटले आणि विचुंद्रे तरफात त्याच नावांचे गाव होते. भाटी, तळावली, विलियणा, कुंभारी, डोंगर, शिंगोणे, पांगारे, नायकिणी(मायडा, गाळिये आणि वालशे) या गावांचा समावेश भाटी तरफात व्हायचा.

आज सांगे तालुका सह्याद्रीच्या उत्तुंग पर्वतरांगा आणि सधन हिरव्यागार जंगलाच्या वैभवाने नटलेला असल्याने दक्षिण गोव्यातल्या बहुतांश ग्रामीण आणि शहरी भागांना पेय आणि जलसिंचनाची सुविधा पुरवणारा साळावली धरणाद्वारे निर्माण झालेला जलाशय संजीवक ठरलेला आहे.

इतिहास आणि संस्कृतीच्या अश्मयुगीन काळातल्या असंख्य खुणा आजही कुशावती नदी किनाऱ्यावरच्या धांदोळे येथील फणसायमळ परिसरातल्या जांभ्या दगडावरच्या प्रस्तर चित्रांतून अनुभवायला मिळतात. या विखुरलेल्या अगणित खाणाखुणा या प्रदेशाचा गतकालीन इतिहास समूर्त करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fight Video Viral: रणवीर सिंगचा स्वॅग पडला भारी! 'धुरंधर 2' मुळे चित्रपटगृहात तुफान राडा, प्रेक्षक आपसात भिडले; व्हिडिओ व्हायरल

Socorro: सफर गोव्याची! डोंगराच्या पायथ्याला वसलेले, शेतीसंपन्न 'सुकूर'

Together For Mapusa: म्हापशाच्या विकासासाठी ‘टुगेदर फॉर म्हापसा’! विविध क्षेत्रांतील लोक एकत्र; ‘शॅडो कौन्सिल’च्या तत्त्वावर चालणार काम

'राम जन्मला गं सखे…'! राज्यभरात ‘जय श्रीराम’चा जयघोष; विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

Panaji: स्मार्ट रस्ते केले, गॅसवाहिनी नाही टाकली! पणजीतला सावळागोंधळ; हॉटेलमालकांची सिलिंडरसाठी धावपळ

SCROLL FOR NEXT