Goa University Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa University: नवे नेतृत्व, नव्या आकांक्षा अन् नव्या दिशा! गोवा विद्यापीठाला मिळणार गोमंतकीय कुलगुरु; शिक्षण क्षेत्रात परिवर्तनाची नवी संधी

Goa University: झालेल्या चुका विचारात घेऊन ठोस उपाययोजना केल्या व त्यांचा भविष्यात परिणाम दिसला तरच यशाचा किनारा लाभेल; गोंयकारांना गोवा विद्यापीठ आपले, गोव्याचे हित पाहणारे वाटेल.

गोमंतक ऑनलाईन टीम

झालेल्या चुका विचारात घेऊन ठोस उपाययोजना केल्या व त्यांचा भविष्यात परिणाम दिसला तरच यशाचा किनारा लाभेल; गोंयकारांना गोवा विद्यापीठ आपले, गोव्याचे हित पाहणारे वाटेल.

तेच ते दिवस राहात नाहीत, दिवस बदलतात, हा निसर्गनियम आहे. गट-तट, हेवेदावे अशा बजबजपुरीत सापडलेल्‍या गोवा विद्यापीठाची धुरा आता प्रा. डॉ. राजेंद्र गाड यांच्‍याकडे सोपवली जात आहे. त्‍यांच्‍या रूपात एक गोमंतकीय कुलगुरू लाभणार आहेत. माजी राज्‍यपाल श्रीधरन पिल्‍लई यांच्‍या माहेरपणाला मुकलेले वादग्रस्‍त कुलगुरू डॉ. हरिलाल मेनन यांचा कार्यकाळ संपताच येत्‍या २५ सप्‍टेंबरला डॉ. गाड हे ताबा स्‍वीकारतील. डॉ. गाड यांच्‍याकडे उच्‍च शिक्षण व संशोधनाचा प्रदीर्घ अनुभव आहे. पानगळ झालेल्‍या झाडाला नवी पालवी फुटते, त्‍याचप्रमाणे विद्यापीठात होणाऱ्या खांदेपालटामुळे नव आकाक्षांना धुमारे फुटतील. या पार्श्वभूमीवर प्रा. गाड यांचे स्‍वागत आहे; शिवाय अनेक अपेक्षाही आहेत.

विद्यापीठाचा खालावलेला दर्जा व प्रतिमा सुधारण्‍याचे प्रमुख आव्‍हान त्‍यांच्‍यासमोर असेल. डॉ. हरिलाल मेनन यांच्‍या कार्यकाळात पेपरफुटी झाली. ती ‘गोमन्‍तक’ने उजेडात आणली, पुढे सरकारला सत्‍यशोधन समिती नेमावी लागली. त्‍यांनी चौकशी करून दिलेल्‍या अहवालानुसार कारवाई करण्‍याऐवजी ती टाळण्‍याचेच काम केले गेले. विद्यापीठात कंपुशाही वाढली, संस्‍थात्‍मक पेच वाढले. काही परीक्षांचे निकाल लांबले, इतकेच नव्‍हे, कॅन्‍टीनमध्‍ये निकृष्‍ट अन्न मिळत असल्याच्या तक्रारीही येत राहिल्‍या.

बहुतांश पातळ्यांवर नकारात्‍मकता वाढली, जी शैक्षणिक प्रगतीला मारक ठरत आहे. ‘नॅक’ची अव्‍वल श्रेणी घेतल्‍याचे अलिकडे तुणतुणे अनेकदा वाजवले तरी वास्‍तव लपले नाही. ‘एनआयआरएफ’च्‍या मानांकनात पिछाडी कायम राहिली. विद्यापीठ या स्‍वायत्त संस्‍थेचे सरकारीकरण होतेय की काय, अशी बनलेली स्‍थितीही नजरेआड करता येत नाही. अशा प्रतिकूल स्‍थितीत नवे कुलगुरू ताबा स्‍वीकारतील.

डॉ. गाड हे गोमंतकीय आहेत. कामुर्ली हे त्‍यांचे गाव. त्‍यांना गोव्‍याविषयी आत्‍मियता आहे, असे त्‍यांचे निकटवर्तीय अभिमानाने सांगतात. अध्यापन कौशल्यात ते अतिशय सक्षम आहेत, विद्यापीठात नेमक्‍या समस्‍या कोठे आहेत? कोठे पाणी मुरते हे त्‍यांना पुरते ठावूक आहे. त्‍यामुळेच त्‍यांच्‍याकडून बदलाची अपेक्षा करता येते. अर्थात इथेही इच्‍छाशक्‍ती हवीच. ते गोमंतकीय आहेत, हा मुद्दा जसा सकारात्‍मक ठरतो, त्‍याचप्रमाणे ज्‍या विद्यापीठात अनेक वर्षे काम केले, तेथे उच्‍चपदावर पोहोचल्‍यानंतर ३६० अंशात बदल करताना अनेक समस्‍याही भेडसावू शकतात.

कुणाचाही मुलाहिजा न बाळगता कर्तव्‍यभान जपून पुढे पाऊल टाकण्‍याशिवाय गत्‍यंतर नाही. गोव्‍यात ‘पारुल’सारखे खासगी विद्यापीठ दाखल झाले आहे. ‘क्‍लस्‍टर’ विद्यापीठ प्रस्‍तावित आहे. त्‍याला केवळ मंजुरी मिळणे बाकी आहे. तो दिवसही फार दूर नसेल. परिणामी स्‍पर्धा वाढणार आहे. त्‍याला सामोरे जात गोवा विद्यापीठाची सर्वार्थाने प्रगती साधण्‍याचे आव्‍हान डॉ. गाड यांच्‍यासमोर असेल. कंपुशाही भेदून संशोधन वृत्ती वाढवण्‍यासोबत निकोप वातावरण निर्माण झाल्‍यास ते महत्‍वाचे ‘साध्‍य’ ठरेल. व्‍यवस्‍थापकीय प्रश्‍‍नही काही कमी नाहीत.

नौ समुद्रीं भ्रमे तैशी संसाराब्धींत मानवा|

पार नेई सुयुक्ता धी कुयुक्ता संकटांत वा॥

अर्थात समुद्रावर चालणाऱ्या नावेप्रमाणे बुद्धी ही जर नीट योजिली तर संसार सागराच्या पार नेईल; अयोग्य योजली तर संकटात (भोवऱ्यात) घेऊन जाईल! कोणत्याही क्षेत्रास लागू पडण्याजोगे हे काव्यप्रचूर प्रातिनिधिक उदाहरण गोवा विद्यापीठाच्‍या कारभारालाही लागू होते. विद्यापीठातून गोव्यात पूरक संशोधन अभावानेच होते. रोजगारनिर्मितीसाठी आवश्‍‍यक पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यापीठाचा उद्योगविश्वाशी अपेक्षित ‘कनेक्ट’ दिसत नाही. डॉ. गाड यांच्‍या कार्यकाळात परिवर्तन दिसेल, अशी आम्हास आशा आहे.

आम्‍ही या स्तंभातून विद्यापीठ कारभारावर केलेली टीका विद्यापीठावरावरील प्रेमापोटीच होती व आहे. सुधारणा व्हावी, हाच उद्देश आहे. कुलपती बदलले, कुलगुरू बदलले म्हणून समस्या सुटत नाहीत. झालेल्या चुका विचारात घेऊन ठोस उपाययोजना केल्या व त्यांचा भविष्यात परिणाम दिसला तरच यशाचा किनारा लाभेल; गोंयकारांना गोवा विद्यापीठ आपले, गोव्याचे हित पाहणारे वाटेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Coconut Price: महागाईत गणेशोत्सवाचा आनंद वाढला! म्हापशात अवघ्या 2 रुपयांत नारळ; दोन दिवसांत तब्बल 9 ते 10 हजार नारळांचे वाटप

Galjibaga Beach: गालजीबाग किनाऱ्याचे अस्तित्वच धोक्यात! अनेक वर्षांपासून सुरू असलेली धूप वाढली; वनखात्याचे अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा माजी नगरसेवकांचा आरोप

VIDEO: रोहित शर्मा वनडे वर्ल्ड कप खेळणार की नाही? 'हिटमॅन'च्या उत्तरानं चाहत्यांची धाकधूक वाढवली; पाहा व्हायरल व्हिडिओ!

Goa Agriculture: गोव्यात चारा टंचाईवर सरकारचा मोठा प्लॅन! लागवड क्षेत्राच्या 5 टक्के जमिनीवर चारा पिके; 10 हजार हेक्टरचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

गुन्ह्यातील पीडितांना मिळणार आर्थिक आधार! गोवा सरकारची नवी 'पीडित भरपाई योजना २०२६' लागू; ॲसिड हल्ल्यात 5 लाखांपर्यंत मदत

SCROLL FOR NEXT