दिलीप बोरकर, ज्येष्ठ साहित्यिक
माधव गाडगीळ गेल्याची बातमी आली. ते अपेक्षितच होते. आयुष्याची नव्वदी ओलांडलेले गाडगीळ हल्लीच्या दिवसांत आपल्या घरीच होते. बाहेर फिरण्याची, गोव्यात येण्याची इच्छा प्रबळ होती. आमचे फोनवर बोलणे व्हायचे.
पर्यावरणीय वेगवेगळ्या समस्यांवर बोलणे व्हायचेच; पण जास्त चौकशी व्हायची ती गोव्याच्या लोकांची, तीही पर्यावरण संरक्षणासाठी जागृत असलेल्या नीज गोंयकारांची. रमेश गावस कसा आहे... नंदकुमार काय करतो... राजेंद्र केरकर बरा आहे ना... गोव्याची खाण परिस्थिती नियंत्रणात आहे की नाही... सगळेच बोलणे गोव्याच्या पर्यावरण संबंधीचे.
गेल्यावर्षी दिवाळीच्या काळात पुण्याला जाणे झाले. गाडगीळांना त्यांच्या पुस्तकांच्या काही प्रती हव्या होत्या. त्यांचे आत्मचरीत्र ‘अ वॉक अप दी हील’ मी कोकणीत अनुवादित केलेले आहे. तेच देण्यासाठी गेलो होतो.
सोबत माझे मित्र ‘गोमन्तक’चे संपादक-संचालक आणि मनस्विनी नायक प्रभुणे होत्या. पाषाणला त्यांच्या घरी गेल्याबरोबर राजू नायकना बघून ते अगदी हर्षोन्मादीत झाले. मग ते मला विसरले आणि राजू नायकांशी गप्पागोष्टीत रमले. विषय काय तर गोव्याच्या खाणीची होणारी अंधाधुंद लुटमार आणि पर्यावरणाचा नाश.
राजू नायक संबंधित विषयावर सातत्याने पोटतिडकीने लिहितात, हे ते जाणून होते. गोव्यातील खाण पर्यावरणावर त्यांचा गाढा अभ्यास होता. गोव्याच्या पर्यावरणाचा हास झाला तर गोव्याला काय किंमत मोजावी लागेल हे त्यांनी पर्यावरणसंबंधित वेगवेगळ्या समित्यांवर असताना भीडमुर्वत न बाळगता खडसावून सांगितले होते.
त्यामुळे त्यांनी गोव्याच्या सरकारचा आणि खाण लॉबीचाही रोष पत्करलेला होता. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी ते विस्ताराने लिहिलेले आहे. त्यावरून त्यांचे गोव्यावर किती प्रेम आणि ऋण आहे, याची कल्पना येईल.
गडगीळांनी कित्येक वर्षे पश्चिम घाट विकास कार्यक्रमाचे नेतृत्व केलेले होते. नियोजन आणि धोरणांना सुयोग्य दिशा दिलेली होती. १९८६च्या काळात पश्चिम घाट बचाव मोहिमेतून त्यांनी यासदर्भातल्या कळीच्या मुद्याकडे स्थानिक जनतेचे आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधले होते.
त्यांच्या पर्यावरणसंबंधी कार्याची दखल घेऊन त्यांना देश-विदेशातील कितीतरी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. भारत सरकारने शांतिस्वरूप भटनागर प्रशस्ती आणि पद्मभूषणने सन्मानित केलेले आहे.
गाडगीळ ‘परिसर आणि पर्यावरण विज्ञान’ यात भारतातील अग्रगण्य वैज्ञानिक होते. या विज्ञानातून मानवाचे कल्याण व्हावे म्हणून सतत ते वावरले. त्यांची आणि माझी भेट पश्चिम घाट सवर्धन मोहिमेच्या काळातील.
नंतरच्या काळात वेगवेगळ्या चळवळी आणि परिषदांच्या निमित्ताने भेटीगाठी चालू राहिल्या. गोव्यात आल्यावर आवर्जून आमच्या घरी बस्तान ठोकायचे. त्यांना सामान्यांतल्या सामान्य कार्यकर्त्यांचा पाहुणचार जोडत समाजविज्ञानाचा मागोवा घेण्यात रस असायचा.
गोव्यात माथानी साल्ढाणा, फा. बिस्मार्क यांच्या कार्याकडे त्यांचा ओढा होता. त्यासाठी मुद्दाम ते गोव्यात येऊन त्यांना भेटायचे, तासन्तास त्यांच्याशी चर्चा करायचे. जे कोणी गोव्याच्या पर्यावरणाविषयी सातत्याने वावरायचे त्यांच्याविषयी ते प्रेमाने बोलायचे त्यांच्याविषयी आदर बाळगायचे.
आपले आत्मचरित्र मी कोकणीत करावे, असा त्यांनी आग्रह धरला. मी ते माझे भाग्य मानले. त्यांचे ते पाचशे पानाचे आत्मचरित्र प्राधान्यतत्त्वाने कोकणीत आणले. त्यांच्या देशभरातील पीएचडी विद्यार्थ्यांनी त्यांचे हे आत्मचरित्र निदान चौदा भाषांतून अनुवादीत व्हावे आणि एकाच दिवशी एकाच जागी प्रकाशित व्हावे, असे ठरवले.
त्याप्रमाणे बहुतेक भाषांतून त्यांच्या त्या आत्मचरित्राचा अनुवाद झाला. पुण्यात एका विशेष कार्यक्रमात भरगच्च भरलेल्या सभागृहात पेंग्वीनचे मूळ इंग्रजी प्रकाशन आणि सोबत मराठी, कन्नड, गुजराती, हिंदी, तमीळ, कोकणी, बंगाली अशा चौदा भाषांतून एकाचवेळी होणारा तो प्रकाशन सोहळा दैवी होता.
जगद्विख्यात पर्यावरणतज्ज्ञ म्हणण्यापेक्षा पर्यावरण रक्षकाचा हा सन्मान बहुतेक जगात पहिलाच असावा. देशातील प्रत्येक भाषेचा लेखक त्यांचे आत्मचरित्र आपल्या भाषेत अनुवादित करतो आणि प्रकाशक ते स्वखर्चाने छापून त्यांना भेट करतात, हा प्रसंगच दुर्मीळ होता.
असे हे माधव गाडगीळ आता पंचतत्त्वात विलीन झालेले आहेत. ज्या मातीशी, ज्या निसर्गाशी समरस होऊन ते जगले त्या निसर्गातच ते विलीन झाले. त्यांच्या जाण्याने एका पर्यावरणपर्वाचा अस्त झालेला आहे, असे म्हणायला हरकत नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.