Postwar Europe Women Persecution Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Postwar Europe Women Persecution: नाझींचा पराभव झाला, पण महिलांचा छळ थांबला नाही; युद्धोत्तर युरोपचा काळा इतिहास

Women Persecution in Postwar Europe: युद्धोत्तर युरोप शरमेने तसेच अपमानाने जळत होता, परंतु त्यांनी शुद्धिकरण मोहिमेचा भाग म्हणून महिलांवर सूडाचा आसूड ओढला.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजू नायक

युद्धोत्तर युरोप शरमेने तसेच अपमानाने जळत होता, परंतु त्यांनी शुद्धिकरण मोहिमेचा भाग म्हणून महिलांवर सूडाचा आसूड ओढला. नॉर्वे, नेदरलँड्स, फ्रान्समध्ये युद्धोत्तर अन्यायाची ही काळी कहाणी आहे. युद्ध संपले होते; परंतु सूडाचे राजकारण संपले नव्हते. मुक्ततेच्या नावाखाली महिलांना अपमानित करण्याची ही प्रक्रिया संपूर्ण युरोपमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात सुरू होती.

१९४५ मध्ये युरोपच्या नाझी राजवटीतून मुक्तता झाल्यानंतर जर्मन अमलाखाली राहिलेल्या देशांमध्ये सूडाचे सत्र सुरू झाले. जर्मन सैनिकांशी प्रेमसंबंध किंवा जवळीक ठेवल्याचा आरोप असलेल्या महिलांना लक्ष्य करण्यात आले. विशेष म्हणजे, जर्मन सत्तेला आर्थिक मदत करणारे उद्योगपती, व्यापारी आणि राजकीय नेते मात्र तुलनेने सुरक्षित राहिले. महिलांच्या असहाय्यतेकडे न पाहाता, त्यांच्या वैयक्तिक संबंधांना देशद्रोहाचे स्वरूप देण्यात आले; पण नाझी राजवटीशी आर्थिक हितसंबंध जपणाऱ्यांच्या प्रवृत्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

दिग्दर्शिका मे एल-तौखी यांच्या २०२६ मधील डॅनिश चित्रपट ‘वुमन अननोन’मध्ये याच दुटप्पी मानसिकतेचे तीव्रतेने चित्रण करण्यात आले आहे. अंगावर रोमांच उभे करणारा हा चित्रपट यंदाच्या इफ्फीमधला एक रोमहर्षक चित्रपट ठरला. इतकी वर्षे आम्ही महोत्सवात नाझींच्याच सूडचक्राचा रौद्रावतार पाहात आलो होतो. यंदा मात्र नाझी भस्मासुराचा अंत झाल्यानंतरच्या क्रूर कहाण्यांनी लक्ष वेधून घेतले. ‘वुमन अननोन’ मध्ये एक घरकाम करणारी तरुण महिला आपल्या जर्मन सैनिकाशी असलेल्या पूर्वीच्या संबंधांचे गुपित उघड होईल, या भीतीने जगत असते. दुसरीकडे, तिचा होणारा पती - जो श्रीमंत कारखानदार आहे, युद्धकाळात जर्मन ग्राहकांसाठी व्यवसाय करत होता, ही बाब मात्र कोणाच्याही चर्चेचा विषय नसते.

व्हेनीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा गोल्डन लायन पुरस्कार पटकावलेल्या या चित्रपटाला जगभर मोठा प्रतिसाद तर मिळालाच, शिवाय टीकाकारांनीही त्याला डोक्यावर उचलून धरले आहे. युद्धोत्तर काळातही युरोपात विलक्षण ताणतणाव व संशयाने काहूर माजविले व त्यात सामान्य व निष्पापांनाही क्रौर्याला सामोरे जावे लागले. स्वतःचा पूर्वकाळ उजेडात येऊ न देणाऱ्या घरकाम करणाऱ्या जेनीच्या भूमिकेसाठी मातीथ आर्सेल हिची तर खूपच वाखाणणी झाली. युरोपियांचा दुटप्पीपणा, राजकीय षंडत्व व महिलांवर सूड उगवणारी प्रवृत्ती पहिल्यांदा इतक्या प्रकर्षाने सामोरे आली. युद्धात वाचून राहिले त्यांचेही हाल थांबले नाहीत व विकृत कामवासनेचे बळी पडूनही अशा महिलांना पुढे उजळ माथ्याने फिरता आले नाही.

त्यातील घरकाम करणारी मध्यवर्ती व्यक्तिरेखा तर ज्या ताणतणावातून गेली, तिची भीती, चेहऱ्यावरचे, डोळ्यांतले भाव हे प्रेक्षकांच्याही काळजाचा ठोका चुकवत होते. या चित्रपटाने कधी प्रकाशात न आलेल्या युरोपचा युद्धोत्तर काळा इतिहास तेवढ्याच बेधडकपणे मांडला. युरोपमधील विविध देशांच्या ऐतिहासिक नोंदींमधूनही हेच प्रत्ययकारी भयाणगांभीर्य समोर येते. महिलांची सार्वजनिकरीत्या विटंबना करण्यात आली, त्यांना बेकायदेशीरपणे डांबण्यात आले आणि सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली. ‘वुमन अननोन’मुळे युरोपीय ढोंगी मानसिकतेचा इतिहास प्रकर्षाने सामोरे आला.

नॉर्वेमध्ये जर्मन सैनिकांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या सुमारे ३० हजार ते ५० हजार महिलांना ‘टिस्करटॉसर’ म्हणजेच ‘जर्मन सैनिकांच्या रखेल्या’ अशा अपमानास्पद नावाने संबोधले जात असे. विशेष म्हणजे, नॉर्वेतील पुरुषांनी जर्मन महिलांशी विवाह केले तरी त्यांना फारशा सामाजिक किंवा कायदेशीर परिणामांना सामोरे जावे लागत नव्हते. मात्र जर्मन सैनिकांशी संबंध असलेल्या नॉर्वेजियन महिलांना जमावाच्या हिंसक सूडाबरोबरच सरकारी दडपशाहीलाही तोंड द्यावे लागले.

देशद्रोहाचे खटले : तीन दशलक्ष लोकसंख्या असलेल्या नॉर्वेमध्ये युद्धानंतर मोठ्या प्रमाणावर शुद्धीकरण मोहीम राबवण्यात आली. सुमारे ९२ हजार लोकांची चौकशी करण्यात आली, तर ४६ हजार जणांना दोषी ठरवण्यात आले. या दोषींमध्ये जवळपास एकतृतीयांश महिला होत्या. युरोपातील इतर देशांच्या तुलनेत महिलांचे हे प्रमाण लक्षणीय होते. न्यायालयीन प्रक्रियेविना नजरकैद : जर्मन सैनिकाशी प्रेमसंबंध ठेवणे हा नॉर्वेच्या कायद्यानुसार प्रत्यक्षात गुन्हा नव्हता. त्यामुळे अशा महिलांना अटक करण्यासाठी प्रशासनाने भटक्या व्यक्ती आणि लैंगिक संसर्गजन्य रोगांशी संबंधित जुन्या कायद्यांचा आधार घेतला.

ऑक्टोबर १९४५ ते मे १९४६ या कालावधीत सुमारे १,१०० महिलांना ओस्लोजवळील होव्हेदोया येथील महिलांच्या राष्ट्रीय नजरकैद छावणीत ठेवण्यात आले. या छावणीभोवती काटेरी तारांचे कुंपण होते. महिलांकडून विनामोबदला सक्तीने काम करून घेतले जात असे. नागरिकत्व रद्द आणि देशातून हकालपट्टी : १९४६ मधील एका तात्पुरत्या सरकारी आदेशानुसार जर्मन सैनिकांशी विवाह केलेल्या नॉर्वेजियन महिलांचे नागरिकत्व काढून घेण्यात आले. अंदाजे ३,५०० महिलांना त्यांच्या मुलांसह युद्धाने उद्ध्वस्त झालेल्या जर्मनीत जबरदस्तीने पाठवण्यात आले.

निरपराध मुलांची परवड : नॉर्वेमध्ये जर्मन सैनिकांपासून जन्मलेल्या मुलांची संख्या १० हजार ते १२ हजारांच्या दरम्यान होती. या मुलांना अनाथाश्रमांमध्ये किंवा मानसिक आरोग्य संस्थांमध्ये ठेवण्यात आले. शाळांमध्ये त्यांची हेटाळणी झाली. समाजाने त्यांना जन्मभर कलंकित केले. युरोपच्या लोकजीवनाचे हे काळेकभिन्न रूप आहे. या अन्यायाची दखल घेत नॉर्वे सरकारने २००० मध्ये या मुलांची औपचारिक माफी मागितली. त्यानंतर २०१८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान एर्ना सोलबर्ग यांनी या अन्यायाला बळी पडलेल्या हयात महिलांचीही सरकारच्या वतीने माफी मागितली.

नेदरलँड्स : सार्वजनिक विटंबना आणि छळछावण्यांमधील अत्याचार

मे १९४५ मध्ये नेदरलँड्सची जर्मन राजवटीतून मुक्तता झाल्यानंतर कथित सहकाऱ्यांविरोधात सूडाची कारवाई वेगाने सुरू झाली. या कारवाईचा सर्वाधिक फटका जर्मन सैनिकांशी संबंध असल्याचा आरोप असलेल्या महिलांना बसला. त्यांना ‘मॉफेनमेडन’ म्हणजेच जर्मन सैनिकांच्या रखेल्या किंवा ‘जर्मन मुली’ अशा अपमानास्पद नावाने हिणवले जाई.

सार्वजनिकरीत्या अपमानित करण्याचे प्रकार : प्रतिकार चळवळीतील कार्यकर्ते आणि संतप्त जमावाने हजारो महिलांना रस्त्यांवरून पकडून आणले. त्यांचे सर्वांसमोर मुंडण करण्यात आले. काहींच्या अंगावर डांबर किंवा नारिंगी रंगाने नाझींचे स्वस्तिक प्रतिक चितारण्यात आले. त्यानंतर शहरांच्या चौकांमधून त्यांची धिंड काढण्यात आली. अशा प्रकारे महिलांच्या प्रतिष्ठेची जाहीरपणे पायमल्ली करण्यात आली. ही निर्भर्त्सना सहन न झालेल्या अनेक महिलांनी आत्महत्या केल्या.

मोठ्या प्रमाणावर नजरकैद : नेदरलँड्सच्या प्रशासनाने सुमारे एक लाख २० हजार संशयितांना अटक केली. त्यात पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश होता. या सर्वांना दोनशेहून अधिक तात्पुरत्या तुरुंगांमध्ये, शाळांमध्ये आणि पूर्वीच्या नाझी छळछावण्यांमध्ये ठेवण्यात आले. वेस्टरबोर्क आणि व्हॉट यांसारख्या छावण्यांचाही यासाठी वापर करण्यात आला. छावण्यांमधील महिलांवरील पाशवी अत्याचार : ऑक्टोबर २०२६ मध्ये नेदरलँड्समधील युद्ध, होलोकॉस्ट आणि नरसंहार अभ्यास संस्थेने एक महत्त्वपूर्ण अभ्यास प्रसिद्ध केला. १९५० मध्ये झालेल्या संसदीय चौकशीतील दडपून ठेवलेल्या साक्षी आणि जबाब या अभ्यासातून समोर आले.

या नोंदींनुसार युद्धानंतरच्या डझनावारी नजरकैद छावण्यांमध्ये हजारो महिलांवर पद्धतशीरपणे लैंगिक अत्याचार करण्यात आले. त्यांना जबरदस्तीने विवस्त्र करण्यात आले, बलात्कार करण्यात आले आणि अमानुष छळ करण्यात आला. छावणीतील रक्षकांकडून महिलांवर अत्यंत क्रूर वागणूक दिली जात होती. या प्रकरणांनंतर छावणीतील १६ अधिकाऱ्यांना सर्वसाधारण गैरवर्तनाबद्दल दंड किंवा अल्पकालीन शिक्षा झाली. मात्र महिलांवरील लैंगिक अत्याचारांच्या प्रकरणात कोणावरही स्वतंत्रपणे खटला चालवण्यात आला नाही. त्यामुळे पीडित महिलांना न्याय मिळण्याचा प्रश्न अनुत्तरितच राहिला.

फ्रान्स आणि बेल्जियम : संपूर्ण पश्चिम युरोपमध्ये महिलाच लक्ष्य. राष्ट्रीय अपमान आणि सामूहिक अपराधभावना पुसून टाकण्यासाठी महिलांना सोपे लक्ष्य बनवण्याची ही प्रवृत्ती केवळ नॉर्वे आणि नेदरलँड्सपुरती मर्यादित नव्हती. फ्रान्स आणि बेल्जियममध्येही अशाच प्रकारचे अत्याचार घडले.

फ्रान्स : डी-डे मोहिमेनंतर फ्रान्समध्ये जर्मन समर्थकांविरोधात ‘एप्युरेशन सॉवाज’ म्हणजेच अनियंत्रित शुद्धीकरण मोहीम सुरू झाली. या काळात इतिहासकारांच्या अंदाजानुसार सुमारे २० हजार फ्रेंच महिलांचे सार्वजनिकरीत्या मुंडण करण्यात आले. या महिलांना ‘ले फेम टोंद्यू’ ‘रखेल्या’ म्हणून ओळखले जाई. यातील अनेक महिला एकल माता होत्या किंवा त्यांचे पती युद्धकैदी म्हणून जर्मनीत बंदिवासात होते. आपल्या उपाशी मुलांना अन्नधान्य मिळावे, उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटावा म्हणून काही महिलांनी जर्मन सैनिकांशी संबंध प्रस्थापित केले होते. मात्र त्यांच्या परिस्थितीचा विचार न करता त्यांना सार्वजनिक अपमान आणि छळाला सामोरे जावे लागले.

बेल्जियम : बेल्जियममध्ये जर्मन सत्तेला सहकार्य केल्याच्या आरोपावरून सुमारे एक लाख लोकांना तुरुंगात डांबण्यात आले. फ्रान्स आणि नेदरलँड्सप्रमाणेच येथेही जर्मन सैनिकांशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप असलेल्या हजारो महिलांना लक्ष्य करण्यात आले. अधिकृत न्यायालयीन कारवाई सुरू होण्यापूर्वीच त्यांचे सार्वजनिकरीत्या मुंडण करण्यात आले, कपडे उतरवण्यात आले आणि शहरांच्या रस्त्यांवरून त्यांची धिंड काढण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stunt Viral Video: अंगावर काटा आणणारी स्टंटबाजी! धावत्या बाइकच्या सीटवर उभं राहून तरुणाचं रील शूट, मागून येत होता ट्रक; थरारक व्हिडिओ व्हायरल

Goa Politics: बहुजन मतांचे राजकीय गणित, पण सत्तेतील वाटा किती? गोव्यातील पंधरा वर्षांचा आढावा

Rey Mysterio Announced Retirement: WWE चाहत्यांसाठी मोठी बातमी! रे मिस्टेरियो घेणार निवृत्ती; कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात मुलाशी भिडणार?

POCSO Court Case: देईकरच्या जामीन अर्जावर सुनावणी; सीलबंद CCTV फुटेज पाहण्यास पॉक्सो न्यायालयाची परवानगी

Lucky Zodiac Signs: सूर्याचे नक्षत्र आणि राशी परिवर्तन ठरणार गेमचेंजर! डिसेंबरमध्ये 'या' 5 राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार मोठं यश अन् पैसा

SCROLL FOR NEXT