पूजा नाईक हिच्या आरोपासंदर्भात ज्या अनेक तज्ज्ञांशी मी बोललो, त्यांच्यात एकमत होते, गुन्हा अन्वेषण खात्याने केलेला तपास गचाळ आहे. मी अनेक कायदेतज्ज्ञांशी बोललो, त्यात काही न्यायमूर्तीही आहेत. न्यायालयासमोर हे प्रकरण गेले, तर ते पोलिसांचे कान उपटल्याशिवाय राहणार नाहीत, अशा पद्धतीने तपास होतो का? तुम्ही हा तपास नेते व अधिकारी यांना ‘श्रीमान स्वच्छ’चे प्रमाणपत्र देण्याच्या उद्देशाने हाताळलाय का?
काही सहज निदर्शनास आलेल्या बाबी अशा आहेत.
१) पूजा नाईक हिने पुन्हा पत्रकारांसमोर येऊन आरोप केल्यानंतर नव्याने तपास करण्यासाठी तिला पुन्हा पाचारण करणे किंवा ताब्यात घेणे आवश्यक होते.
२) तिने नाव घेऊन आरोप केलेल्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी का बोलवले नाही?
३) ज्यांनी नोकऱ्यांसाठी पैसे दिलेत, त्यांचा शोध घेऊन त्यांची चौकशी का झाली नाही? किंबहुना पूजा नाईक हिच्या जबाबानंतर या शोधमोहिमेची नव्या जोमाने सुरुवात होणे आवश्यक होते. हे सुमारे ८० कथित लोक आहेत. ती यादी देत नसल्याचा युक्तिवाद पोलिस करतात. परंतु त्यातील काहीजण साखळी येथे मुख्यमंत्र्यांना भेटले आहेत. त्यांची छायाचित्रेही प्रसिद्ध झालेली आहेत. परंतु पैसे देणारेही दोषी असल्याचा गाजावाजा करण्यात आला. ते पुढे येत नसतील तर त्यांना शोधून काढणे हा पोलिसांच्या जबाबदारीचा भाग होता.
४) नेत्यांच्या मते तपास अजून बंद केलेला नाही. परंतु तरीही पूजा नाईक हिच्या दाव्यात तथ्य नाही, हे पुन्हा-पुन्हा सांगण्याची घाई का?
५) नेते व गुन्हा अन्वेषण विभागाचे अधीक्षक राहुल गुप्ता यांच्या वक्तव्यात फरक आहे. नेते म्हणतात, चौकशी चालूच राहणार आहे, तर गुप्ता म्हणतात, चौकशी अधिकृतरीत्या पूर्णत्वाला गेली आहे. परंतु आवश्यकता वाटल्यास पूजाची नार्कोटेस्ट केली जाईल. तिने जाहीररीत्या पोलिसांवर अविश्वास दर्शवून नार्कोटेस्टची मागणी करूनही पोलिस का बिचकतात, हा प्रश्न आहेच.
६) पोलिसांनी यापूर्वी डिचोली, म्हार्दोळ, पर्वरी व पणजी पोलिसस्थानकात तक्रारी नोंद करून पाच फौजदारी गुन्हे नोंदविलेले आहेत. फसवणूक व आत्महत्येला प्रवृत्त केल्याच्या या तक्रारी आहेत. परंतु त्या साऱ्या पूजाच्या विरोधातच रोखलेल्या आहेत.
७) पोलिसांनी एकच गोष्ट शोधून काढली- असे ते म्हणतात- ती म्हणजे २०१२मध्ये पूजा दावा करते, त्यानुसार ती मगोपच्या कार्यालयात कामाला नव्हती. त्यासंदर्भात मगोपच्या माजी पदाधिकाऱ्यांच्याही जबान्या घेण्यात आल्या.
८) जेथे पैशांची देव-घेव झाली, त्या पर्वरीच्या कथित फ्लॅटमध्ये कोणीही अधिकारी वास्तव्य करीत नाही.
९) पोलिसांचा दावा आहे, तिचा फोन- ज्यावरून अनेकांशी संपर्क साधण्यात आला- तो तिच्या नवऱ्याने उत्तर प्रदेशच्या एका माणसाला विकला होता. परंतु २०२३-२५ या काळात तिने आरोप केलेल्या कोणाशीही तिचा संपर्क झालेला नाही. परंतु ॲड. अमित पालेकर मात्र २०१२पासूनच्या सर्व नोंदी मोबाइलवर सापडू शकतात, असा दावा करतात.
१०) पोलिसांनी आणखी एक महत्त्वाची बाब शोधून काढली, ती म्हणजे २०१९ ते २०२५ या काळात पूजाने ८.०६ कोटींचा आर्थिक व्यवहार केला आहे. तिने या पैशातून महागड्या गाड्या, दागिने, अवजड यंत्रसामग्री व जमिनी खरेदी केल्या. पूजाच्या विरोधात ज्या-ज्या गोष्टी हव्या, त्या तत्परतेने पोलिसांनी शोधून काढल्या. परंतु तिने कोणाला पैसा दिल्याचा कसलाही तपशील त्यांना सापडला नाही. गंमत म्हणजे ८.०६ कोटी रुपये तिने स्वतःच्या व मुलीच्या बँक खात्यात ठेवले होते, हेसुद्धा आश्चर्यकारक आहे.
११) एक गोष्ट पोलिसही मान्य करतात, की पूजा नाईक हिची काही नेत्यांबरोबर छायाचित्रे आहेत. परंतु ती त्यांचे या प्रकरणात नाव घेत नाही. मान्य केले जाऊ शकते की पूजा कोणाबरोबरही फोटो काढू शकते. ते सर्वजण गुंतलेले असू शकतील, असे नाही. परंतु गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती असे फोटो बाळगते, यामुळे संशय निर्माण होतो. पोलिसांनी त्या सर्वांशी चर्चा केली आहे काय?
१२) पूजा अनेक विसंगत गोष्टी सांगते, यातही तथ्य आहे. तिने नावांची यादी असलेली डायरी तिची मैत्रीण तन्वी नाईक हिच्याकडे दिली. परंतु या नावाची व्यक्ती पोलिसांना अद्याप सापडलेली नाही. पोलिसांच्या दाव्यानुसार पूजा नाईक खोटारडी आहे, ती गुन्हेगार तर आहेच. ती प्रत्येकवेळी जबानी बदलते. परंतु ती नावे घेते, त्या अधिकाऱ्यांना पोलिस चौकशीसाठी बोलवत नाहीत, हा सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनेही संशयाचा भाग आहे. पूजा नाईकच्या आरोपात प्राथमिक तथ्य नाही, तेव्हा आम्ही त्यांना चौकशीसाठी बोलवू शकलो नाही, असा दावा पोलिस करतात.
नार्कोटेस्टचा मुद्दा पोलिसांचा सतत पिच्छा पुरवणार आहे. कारण ॲड. अमित पालेकर यांच्या मते, ती नार्कोटेस्टमध्ये आणखीही काही नेत्यांची नावे घेईल, अशी भीती राज्यकर्त्यांना आहे.
अमित पालेकर तिला पत्रकारांसमोर घेऊन आले. ही चौकशी तटस्थपणे झाली नाही, अधिकारी व नेत्यांची चौकशी झाली नाही. मोबाइलवरील क्रमांक तपासले गेले नाहीत. या लोकांचे लोकेशन शोधून काढणे शक्य होते. शिवाय ज्यांना पूजा नाईक हिने नोकऱ्या दिल्या, त्यांच्यापर्यंत पोलिस गेलेच नाहीत, असा आरोप ॲड. पालेकर करतात.
हे प्रकरण संवेदनशील आहे. त्यात अनेक बडी धेंडे गुंतली आहेत. जर यात विरोधी नेते किंवा सरकारविरोधातील व्यक्ती गुंतल्या असत्या, तर पोलिसांनी असाच तपास केला असता काय? सीबीआय किंवा सक्तवसुली संचालनालय कसा तपास करते? मला गोव्यात असे अनेक लोक माहीत आहेत, ज्यांच्या घरावर या संस्थांच्या एकापाठोपाठ धाडी पडल्या.
वास्तविक हे प्रकरण संवेदनशील यासाठी कारण त्यात गुंतलेल्या काही अधिकाऱ्यांचे चारित्र्य संशयास्पद आहे. पूजा नाईक सतत म्हणते आहे, पोलिस तपास योग्य रीतीने होणार नाही. अनेक कायदातज्ज्ञ सांगत आहेत, तपास असा केला जात नाही. पूजा नाईक हिने पोलिसांनाही नोकऱ्या दिल्या आहेत.
महत्त्वाचा प्रथमर्शनी पुरावा म्हणजे सरकारी नोकऱ्या वशिल्याने दिल्या जातात. गेल्या अनेक वर्षांत नेत्यांनी नोकऱ्यांचा हा तमाशा मांडला आहे. आपल्या मतदारसंघातील लोकांना वशिल्याने नोकऱ्यांची खिरापत वाटली जाते. काहीजण नोकऱ्या विकतात.
काँग्रेस काळात अनेकांच्या प्रामाणिकपणाचा बोलबाला होता. ते नोकऱ्या देऊ शकले नाहीत तर पैसे परत करत. गेल्या १५ वर्षांत मात्र हा प्रामाणिकपणा लोप पावला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या एका तत्कालीन मंत्र्यांने पैसे घेऊन पोबारा केला. म्हणजे ‘प्रामाणिकपणा’चे दिवस आता राहिलेले नाहीत. पूजा नाईक हा त्याचाच दुसरा कित्ता.
आम्हाला अनुमान काढता येते, की पैसे देऊन नोकऱ्या देण्याचा हा धंदा एवढा फोफावला की दलालांचा सुळसुळाट झाला. एजंट नेत्यांच्या घरीदारी, पक्षांच्या कार्यालयात ये-जा करीत असल्याचे लोकांना दिसले. हे दलाल फोटो काढून घेत होते. नोकऱ्या मागणाऱ्यांना तेथपर्यंत घेऊन जात होते. लोकांनी पैसे दिले कारण ‘खात्री’ पटली. कोणाकडे पैसे जास्त झालेले नाहीत. कोणीही ऐऱ्या-गैऱ्याकडे एवढा मोठा पैसा देत नाही. अनेकांनी नोकऱ्या मिळेल, या आशेने दागदागिने तारण ठेवून पहिला हप्ता दिला. पूजा नाईकसारख्या फाटक्या व्यक्तीकडे आठ कोटी रुपये सापडतात, याचा अर्थ काय?
जे लोक पूजा नाईक हिने फसविले म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले, त्यापैकी काहींना पोलिसांनी बोलवले असते तर तिच्यासारख्या व्यक्तीवर त्यांनी विश्वास कसा ठेवला, याचा किमान उलगडा झाला असता.
एक गोष्ट खरी आहे की नोकऱ्या देणाऱ्यांवर पटकन विश्वास ठेवणारेही अनेकजण असतात. विदेशात-आखातात नोकऱ्या देतो म्हणून सांगून लुबाडणाऱ्यांच्या अनेक कथा गेली तीस-चाळीस वर्षे आम्ही ऐकतो आहोत. लोकांना सावध करणाऱ्या बातम्या वृत्तपत्रांत झळकूनही अनेक वैफल्यग्रस्त ‘हार’ मानीत नसतात. परंतु हे एजंट पूजा नाईकसारखे फाटके नसतात.
ते सुटाबुटात भपकेबाज कार्यालय थाटून बसलेले असतात. विदेशात जाण्याचे वेड एकदा बाळगले की मग कोणत्याही मार्गाने हे धाडस करण्यास लोक प्रवृत्त होतात. अनेकजण फसवले जातात. प्राणाला मुकतात. असे दलाल जगभर पसरलेले आहेत. दरवर्षी अशा विफल लोकांच्या कथा इफ्फीमध्ये मांडलेल्या आम्ही पाहतो. संपूर्ण जगाची ही वास्तवपूर्ण भीषण कहाणी आहे. दिवसेंदिवस तिचे स्वरूप रौद्र होत चालले आहे.
नोकरी हा विषयच असा आहे की लोक समोरच्यावर चटकन विश्वास ठेवतात, त्यात सरकारी नोकरी म्हटले की, कोणाच्याही तोंडाला पाणी सुटते. काही मंत्र्यांनी तर आपल्या मतदारसंघातील भली मोठी फौज राजदरबारात रुजू केली आहे. त्यांच्या नाकर्तेपणावर अधिकारीही जाब विचारू शकत नाहीत. गोव्यात दर सहा घरकुलामागे एक सरकारी नोकर आहे. नेत्यांनीच ही ‘सोय’ करून ठेवलेली आहे. गोव्याचा सर्वनाश करण्याचा हा राजकीय परवाना आहे.
प्रत्येक नेत्यांची नोकऱ्या देण्याची म्हणून पद्धत आहे. अनेक पक्ष कार्यकर्ते दलाल म्हणून काम करतात. काहींचा या कार्यकर्त्यांवर विश्वास नसतो. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र दलाल बाळगलेले आहेत.
ते राजरोस राजकीय नेत्यांची निवासस्थाने, कार्यालये, नेत्यांच्या अधिकृत मोटारी घेऊन फिरत असतात. पैसे न घेणाऱ्यांना बायांचे वेड असते, अशा कितीतरी नेत्यांची नावे सार्वजनिकरीत्या चघळली जातात. एकेकाळी दलालांचे काम पुरुष करीत, परंतु आता दिल्लीपासून गल्लीपर्यंत बायका त्यात चपळ झालेल्या दिसतील.
अनेक मंत्र्यांच्या कार्यालयात अशा बायकांचा सुळसुळाट झालेला आहे. कारण महिलांवर संशय कमी. पैशांचा व्यवहारही त्याच बघतात. एकेकाळी ‘लॉबीईस्ट’ म्हणून उच्चभ्रू बायका काम करीत. दिल्लीत हा प्रकार जोरात आहे.
मोठमोठ्या समित्यांवर नेमलेली पुरुष मंडळी दिल्लीत आली की त्यांना या ‘लॉबिस्ट’ हॉटेलमध्ये भेटतात. त्याचेच लघुरूप गोव्यात पाहता येते. नेत्यांनी बाळगलेल्या महिलांची फौज अचंबित करणारी आहे.
त्याचा अर्थ सर्वांवर सरसकट संशय घेतला जाऊ शकत नाही. कारण पुरुषांपेक्षाही महिला आपल्या कामात तरबेज, कार्यक्षम आणि प्रामाणिक असतात, हेही खरे आहे. परंतु आता काही महिला पुरुषांनाही मागे टाकून पैशांचे अनैतिक व्यवहार शिताफीने करतात, हे नाकारता येणार नाही.
मी अनेकदा मनोहर पर्रीकरांचे उदाहरण देतो. पणजीत पर्रीकरांनी आपले राजकीय कार्यालय थाटले. परंतु त्यांच्या सहायक टीममध्ये बायका फारशा नव्हत्या. तरुण मुले त्यांनी घेतली, जी पुढे नगरसेवक व आमदारही बनली. परंतु पर्रीकरांचे त्यांच्यावर बारीक लक्ष असायचे. त्यांच्याच मुशीत ही मुले तयार झाली. असे किती नेते आपले कार्यकर्ते तयार करू शकले आहेत?
पर्रीकरांच्या काळात त्यांच्या कार्यालयात एक-दोन मुली जरूर होत्या. परंतु त्या अत्यंत व्यवसायिक गणल्या गेल्या. पर्रीकरांनी आपले राजकीय चारित्र्य नितळ ठेवले व कुटुंबीयांना त्यात ढवळाढवळ करू दिली नाही. आज अनेक कुटुंबीयांच्या तक्रारी दिल्लीपर्यंत गेल्या आहेत. मंत्र्यांकडे काम केल्याने मुलींचे नाव खराब होण्याचा धोका वाढला आहे.
पर्रीकर विरोधात असते तर त्यांनी गुन्हा अन्वेषण खात्याच्या निष्कर्षावर रान उठवले असते, ते सत्तेत असते तर त्यांनी न्यायालयीन आयोग नेमून चौकशीला प्रारंभ केला असता. कारण ते स्वतः चारित्र्यवान होते, त्यांना सत्याची चाड होती. दुर्दैवाने पर्रीकर गेले. त्यानंतर आलेल्या केजरीवाल यांचीही प्रतिमा काळवंडली. आज गोव्यात विरोधी पक्षातही नोकऱ्यांच्या दलालीबाबत तीव्र चाड असलेला नेता नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.