Ramakant Payaji Death Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Ramakant Payaji Death: 'फुटला पाझर पाषाणाला' ते 'विधीचक्र'! 50 वर्षांच्या नाट्यप्रवासाचा अंत; रमाकांत पायाजींच्या स्मृतींनी गोमंतकीय कलाकारांचे पाणावले डोळे

Goa Theatre Legend: नाटककाराचे नाव रंगमंचावरच नव्हे, तर त्यांना प्रदान झालेल्या राज्य पुरस्काराच्या निमित्ताने शासकीय पातळीवरही उच्चरवाने उच्चारले गेले असेल.

दैनिक गोमन्तक डिजिटल

उमेश शिरगुप्पे

या नाटककाराचे नाव रंगमंचावरच नव्हे, तर त्यांना प्रदान झालेल्या राज्य पुरस्काराच्या निमित्ताने शासकीय पातळीवरही उच्चरवाने उच्चारले गेले असेल. पण गोव्याच्या हौशी रंगभूमीला सुबोध भाषा देणाऱ्या या लेखकाच्या मुठीला आर्थिक बळ देण्यात मात्र आम्ही गोमंतकीय अपयशी ठरलो, हे वास्तव आहे. या प्रज्ञावंत लेखकाविषयी थोडक्यात...

लेखक रमाकांत पायाजी’ हे वाक्य नाटकाच्या सादरीकरणाच्या प्रारंभी पडद्याआडून सादर होणाऱ्या नामावलीत एकेकाळी हमखास ऐकू यायचे. साधारण पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा गोव्याची हौशी रंगभूमी वयात येत होती. गोव्यातील शहर तसेच गावातील वाड्या-वाड्यांवर स्थानिक नाट्यकलाकारांच्या नाटकाची तयारी सुरू व्हायची आणि नाटक कोणते निवडायचे यावर चर्चा सुरू व्हायची. तेव्हा त्यांच्यात ‘रमाकांत पायाजी’ हे नाव एखाद्या परवलीसारखे उच्चारले जायचे.

उत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या चार नाटकांमध्ये किमान एक नाटक रमाकांत पायाजी या लेखकाचे असेल यात कोणतीही शंका नसायची. रमाकांत पायाजी आमच्यातून निघून गेले, ही बातमी काल जेव्हा समाज माध्यमावर पसरली तेव्हा ७० ते ९० च्या दशकात गोव्यात जी कलाकार मंडळी हौशी रंगभूमीवर वावरत होती, त्या साऱ्यांचा आठवणींचा एक कोपरा नक्कीच हळवा झाला असेल. ज्यांनी त्या काळात मंडपात आपल्या कुटुंबासमवेत सतरंजीवर बसून त्यांची सामाजिक नाटके पाहिली असतील, त्यांचीही मने त्यांच्या नाटकातील ‘कुटुंबवत्सलते’चा गहिवर आठवून थोडीतरी ओली नक्कीच झाली असतील.

रमाकांत शं. पायाजी यांना वयाच्या पंधराव्या वर्षापासून वाचनाचा छंद होता. कथा, कांदबऱ्या, नाटके यांचे वाचन खूप केले असून, ना.सी. फडके, वि. स. खांडेकर, बाबा कदम, नाथमाधव हे त्यांचे आवडते लेखक. ‘हौशी रंगभूमीवर आत्तापर्यंत १९६८ ते १९९६ या काळात १५०च्या वर भूमिका नाटकांत सादर केल्या. त्याच अनुभवाच्या जोरावर ते नाट्यलेखनाकडे वळले.

एक रेडिओ श्रुतिका, वर्तमानपत्रात चार लघुकथा प्रकाशित आहेत. त्यांची रंगभूमीवर ‘फुटला पाझर पाषाणाला’, ‘वाहते गंगा त्यागाची’, ‘हा पिंजरा काटेरी’, कडेलोट, जगावेगळा, अनाथ, आभास, आघात, चंबळचा डाकू, निराधार, न्यायाचा तराजू, ‘दैवखेळ हा असे वेगळा’,‘विधीचक्र’, ‘न्याय नाही या जगी’, ‘उभा आंधळा मी अंधारी’, ही त्यांची जास्त गाजलेली नाटके, काही नाटकांच्या चार-चार आवृत्त्या निघाल्या आहेत.

या गोमंतकीय नाटककाराची सुमारे ५३ सामाजिक नाटके रंगमंचावर आली. त्याच्या प्रत्येक नाटकाचे शेकडो प्रयोग हौशी रंगभूमीवर झाले असतील, या नाटककाराचे नाव रंगमंचावरच नव्हे, तर त्यांना प्रदान झालेल्या राज्य पुरस्काराच्या निमित्ताने शासकीय पातळीवरही उच्चारवाने उच्चारले गेले असेल. पण गोव्याच्या हौशी रंगभूमीला सुबोध भाषा देणाऱ्या या लेखकाच्या मुठीला आर्थिक बळ देण्यात मात्र आम्ही गोमंतकीय अपयशी ठरलो, हे वास्तव आहे.

त्याने लिहिलेल्या प्रत्येक नाटकाच्या नाट्यप्रयोगाचे अल्प मानधन जरी त्याला मिळाले असते, तरी हा लेखक लक्षाधीश बनला असता. हौशी रंगभूमीने रमाकांत पायाजींना नाव अवश्य दिले, मात्र त्यांना स्थैर्य दिले असे म्हणता येणार नाही.

पुरस्कार अन्‌ सन्मान

१९७४ साली ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’, मुंबई यांचे ‘वाहते गंगा त्यागाची’ या नाटकाला कु. उषा लोटलीकर पुरस्कृत म. आ. कामत पारितोषिक १९७६ साली नागपूर येथे कामगार कल्याण केंद्र स्पर्धेत ‘उभा आंधळा मी अंधारी’ या नाटकाला लेखनाचं दुसरं पारितोषिक, १९८० साली ‘मंजुषा नाट्य शिल्प’ नागपूर या संस्थेने पुणे येथे संगीत नाट्यमहोत्सवात सादर झालेल्या ‘हा पिंजरा काटेरी’ या नाटकाला लेखनाचं दुसरं पारितोषिक, १९८८ साली ‘जुगारी विळखा’ या नाटकाला ‘अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद’, मुंबई यांचे ‘वसुंधरा आयरे पुरस्कृत ला. कृ. आयरे’ पारितोषिक, ११ फेब्रुवारी १९९५ रोजी गोमंतक मराठी अकादमी, पणजी-गोवा यांनी ‘मानद अधिसदस्यत्व’ बहाल केले.

५ नोव्हेंबर १९९९ रोजी गोवा कला अकादमीने ‘रंग-सन्मान’ हा पुरस्कार बहाल केला. १९ एप्रिल २००१ रोजी गोव्याच्या कला आणि सांस्कृतिक खात्याने तत्कालिन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते ‘राज्यपुरस्कार’ देऊन गौरव केला. ४ ऑगस्ट २००१ रोजी ‘जैमिनी अकादमी, पानिपत यांच्याकडून‘स्व. पद्मश्री डॉ. लक्ष्मीनारायण दुबे सन्मान’ देऊन गौरव केला. १४ जानेवारी २००६ रोजी मोरजी येथे गोमंतक नाट्य साहित्यिक कलाकार संघटनेतर्फे ११ व्या नाट्यसंमेलनात सिने अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या हस्ते ‘नाट्यगौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. २००२ रोजी मोरजी येथे ग्रामीण बाल साहित्य संमेलनात सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT