Pimpal Tree History Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

Pimpal Tree History: वृक्षसंवर्धनाचा वारसा ऋषी संस्कृतीने कृषी संस्कृतीला दिला आहे. 'ग्लोबल बॉर्मिंग'च्या गप्पा हाणत कर्मकांडांना नावे ठेवणे कूल वाटू शकते.

गोमन्तक डिजिटल टीम

मधू य. ना. गावकर

हिंदू धर्मातील लोक देवालयाच्या आवारात पिंपळ दिसला, की त्याच्यासमोर हात जोडतात. याचे कारण पिंपळात दत्तात्रय त्रिमूर्ती देव सामावले आहेत, असे मानतात. शिवाय विष्णू देवाचा जन्म पिंपळवृक्षात झाला असे पुराण म्हणते. श्रीकृष्णाला मरण पिंपळवृक्षाच्या खाली आले असेही मानतात. त्या कारणाने महाकाय पिंपळाला देव मानला आहे.

पर्यावरणीय दृष्टीने त्याला प्राणवायूचे कोठार म्हणतात, पिंपळवृक्ष लावल्यास त्या माणसाला स्वर्ग प्राप्त होतो, असे म्हणतात. त्याचे कूळ आणि मूळ भारतीय आहे, हे जीवशास्त्रज्ञ मानतात. तो मोठा होणारा वृक्ष हिमालयाच्या पायथ्याकडील भागातील राज्यात पाहावयास मिळतो. शिवाय पाकिस्तान, बांग्लादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका, मलेशिया आदी देशांत त्यांची लागवड केलेली पाहावयास मिळते.

पिंपळ वृक्ष सर्वाधिक प्राचीन आहे. मोंहेजदाडो, हडप्पा, लोथल इथे सिंधू संस्कृतीचा शोध घेताना इतिहास संशोधकांना तिथल्या खननात अर्थमुद्रांवर, मोहरांवर पिंपळाचे पान कोरलेले सापडले. शिवाय काही मुद्रांवर पिंपळाच्या दोन फांद्यांमध्ये उभ्या असलेल्या देवता सापडल्या.

त्या वृक्षांचे वयोमान शतकानुशतके असल्याने, त्याला सनातन म्हणतात. पिंपळवृक्षाखाली सिंधू संस्कृती जनांची महिषमुंड देवता पिंपळाच्या सावलीत निवासी झाली असे मानतात. ऋग्वेदात पिंपळाला अश्‍वत्थ म्हटल्याचा उल्लेख सापडतो.

गौतम बुद्धांना (अश्‍वत्थ) पिंपळ वृक्षाखाली साधनेतून ज्ञानप्राप्ती म्हणजे बोध झाला. बिहार राज्यातील त्या गया शहराला बौद्ध गया नाव प्रचलित झाले. बौद्ध गयेच्या प्रवासात तिथला महाकाय पिंपळवृक्ष मी पाहिला. तो गौतम बुद्धाच्या काळातील नसावा.

आज बौद्ध गयेत जो महाकाय वृक्ष आहे, तो सम्राट अशोकांनी लावला असे इतिहास तज्ज्ञ मानून त्याला चोवीस शतके पूर्ण झाली असे सांगतात. यावरून सर्व वृक्षांत त्याला बुद्ध वृक्षाचा मान आहे, हे लक्षांत येते. पिंपळ वृक्ष हा वड, उंबर, नांद्रूक, अंजीर अशा फायकस प्रजातीमधील आहे.

त्याला धार्मिक महत्त्व असल्याने ‘फायकस रिलिजिअस’ हे नाव दिले. त्याचा द्विदल वनस्पतीत समावेश होतो. संस्कृत भाषेत त्याला अश्‍वत्थ, पिप्पल, बोधिद्रूम, चलदल, श्रीवृक्ष, क्षिरद्रुम, शुचिद्रुम, वृक्षराज, याज्ञिक अशी अनेक नावे आहेत.

हिंदीत - पीपल, पीपली, गुजराती - पीपल, जरी पिपर, बंगाली - गैअस्वत, कन्नड - अरणी, अश्‍वत्थमारा पिंपल, तामीळ- अरशमरश, तेलगू- राविचेट्ट, मल्याळम् - अरयाल, मराठी- पिंपळ अशा अनेक भाषांत, अनेक नावांनी ओळखणारा पिंपळ देवाच्या रूपात सन्मानीत होतो.

पिंपळ वृक्षाचा जन्म विशेषकरून पक्षांच्या विष्ठेतून होतो. एखाद्या झाडाच्या ढोलीत अगर खाचीत, पडक्या मारतीच्या भिंतीवर, ओहोळाचा काठ, अशा जागी त्याचा जन्म होऊन तो वाढतो आणि हळूहळू त्या जागी आपले आयुष्य घालवत दुसऱ्याला नेस्तनाबूद करून आपण यजमान बनतो.

झाडावर जन्म घेतल्यास कालांतराने मूळ झाडाला आपल्या मुळांचा फास आवळून त्या झाडाचा बळी घेतो. पिंपळवृक्ष साधारण तीस पस्तीस मीटर उंची गाठून वर्तुळाकार पसरून खाली दाट सावली देतो. त्याच्या बुंध्याचा वर्तुळाकार आकार साधारण तीन मीटरपर्यंत असतो.

साल पिवळट करड्या रंगाची असून त्याचे अंग गुळगुळीत असते. तीन, चार मीटर उंचावर खोडाला मोठ्या फांद्या फुटून त्या चारी दिशांनी पसरून पिंपळवृक्ष महाकाय होतो.

निसर्गाने कैक वृक्षांना वेगवेगळे शिक्षण, कला, संगीत बहाल केले आहे. आपण जंगल, बागेत झाडांच्या पुढ्यातून जाताना अगर फिरताना शांत चित्ताने ऐकले पाहिजे. ते ऐकण्यास आपल्या मनाची तयारी असली पाहिजे. सकाळी अगर संध्याकाळच्या मंद वाऱ्याच्या झुळकेने लेझीम खेळतात, त्याचे स्वर कानी पडताच माणसाला नैसर्गिक संगीताचा अनुभव मिळतो.

जीवन जगवणारे पाणी वेगवेगळ्या प्रकारे वाहत आपले स्वर आळवतात. पर्यावरणात निसर्गाने प्रत्येक वस्तूला संगीत गाण्याची शक्ती दिली आहे. ती समजून घेण्यास मानवाला जन्म दिला. सागराच्या किनाऱ्यावर उभे असलेले डेरेदार वृक्ष वाहणारा वारा अंगावर घेऊन सारंगीचे संगीत सूर काढतात.

माणसाचे हृदय आणि पिंपळाच्या पानाच्या आकृतीत मोठासा फरक नाही. त्याच्या पानावर हलक्या पिवळ्या शिरा असतात. पिंपळाचे पान जन्म घेताना प्रथम पोपट पक्ष्याच्या चोचीप्रमाणे दिसते. त्याची पानगळ झाल्यावर मुळात पिवळ्या पानांचा खच पडतो.

पंधरा-वीस दिवसांत नवीन पालवी पोपटी होऊन त्या वृक्षाला नव्या नवरीप्रमाणे सजवते. नंतर काही दिवसांत आपल्या अंगावर हिरवा चुडा भरून फुलांचा बहर आणण्यास पिंपळ सज्ज होतो. पिंपळाचे पान पाणी लागल्यावर लवकर कुजत नाही.

त्याच्या पानातील पातळ भाग जाऊन शिराची चाळण बनून तशीच घट्ट राहते. पिंपळवृक्षावर सकाळचे अगर संध्याकाळी सूर्याचे किरण पोपटी, हिरव्या पानावर पडताच ती कड्याप्रमाणे चकाकतात. त्याच्या पानोपान फांदीला फळे येतात.

हिरवी फळे तांबूस निळसर होताच पक्ष्यांना त्यांचा सुगावा लागतो. रात्रीची वटवाघळे त्यांच्यावर तुटून पडत आपले अन्न खाताना एकमेकात लढाई करतात. कोकीळ, पोपट, कवडा, चिमणी, कावळा, खार माकड त्याच्या फळांनी आपले पोट भरतात.

एक पिंपळ वृक्ष हजारो जिवांचा पालनकर्ता आहे. हिंदू धर्मातील सौभाग्यसुंदरी त्याच्या फिरत्या रंगाला पसंती देऊन त्याच्यातील रंगांना पसंती देऊन वस्त्र शृंगार परिधान करतात. त्याच्या बियांचा प्रसार पक्षी आणि वटवाघळे करतात. मौसमी पावसाची चाहूल बेडूक, कावळे, टिटवी, कोल्हे, चातक यांना लागते, त्यांच्या हालचालीवरून आपण पावसाच्या आगमनापूर्वी वेगवेगळी कामे पूर्ण करतो, हे जरी खरे असले तरी कीटकांनासुद्धा पावसाची चाहूल लागते.

मुंग्या पिंपळाच्या अंगावरील खाच खळग्यात आपले अन्न साठवतात. काळोख्या रात्री उजेड देणारे काजवे पिंपळाच्या झाडाभोवती आपल्या अंगातील दिवे पेटवत गोफ, तालगडी खेळत पावसाच्या आगमनाचे स्वागत करतात.

त्याचप्रकारे आफ्रिका खंडाजवळील देशांतून प्रवास करीत येणारा चटकोर कीटक भारतात येऊन भात लागवड धान्याच्या शेतात, दाटीने जमाव करून पिकलेल्या भात रोपावर गोफ विणून खेळत शेतकऱ्याला पाऊस गेल्याची माहिती देत जागृत करतो. पिंपळ वृक्षाचे लाकूड, सावर, पंगारा, सातीण, आंबाडा झाडांच्या लाकडाप्रमाणे मऊ असले तरी हिंदू धर्मातील लोक त्याचे लाकूड घरकामास, लाकडी वस्तूसाठी वापरत नाहीत. कारण त्या वृक्षात दत्तात्रय, भगवान विष्णू देवांचा वावर असल्याचे मानतात.

मी भारतातील पिठापूर, कुरवपूर, श्रीशैल्य, गिरनार, कारंज, औदुंबर, अक्कलकोट, गाणगापूर गरुडेश्‍वर, नरसोबावाडी, माणगाव, पावस, शेगाव, माहूर अशा दत्तदेवस्थानांना भेट दिली आहे. विशेष करून त्या तीर्थक्षेत्राकडे पिंपळ पाहावयास मिळतात. पिंपळ वृक्षाची साल, पाने, फळे माणसाला औषध देण्यासाठी वापरतात. त्याच्या हिरवा पाला गुरे आवडीने खातात. सालीवर कीटक लाख तयार करतात.

ती लाख माणसाच्या शरीरात रक्त तयार होण्यास वापरतात. मधुमेह झालेल्या रुग्णास त्याच्या सालीचा अगर पानाचा चहा करून पिण्यास देतात. किडलेल्या दातांना त्याचा डिंक औषध म्हणून वापरतात. त्याच्या हिरव्या पानांची पत्रावळ करून मंद बुद्धीच्या मुलांना गरम भात वाढून भरवतात. असा हा महागुणी, त्रिगुणी, त्रैलोक्यनाथ पिंपळ आपल्या गोमंतकात देवस्वरूप असल्याचे पाहावयास मिळते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Video: 'शिकण्याची जिद्द' याला म्हणतात! शाळेत जाणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "एक नंबर..."

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

Horoscope: तुमचे नशीब उजळणार! व्यवसायात भरभराट! 'या' 4 राशींसाठी 17 नोव्हेंबरपासून चांगले दिवस

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Goa Made Liquor Seized: सावंतवाडीत गोवा बनावटीच्या दारूची विक्री; 90 दारूच्या बाटल्या जप्त, दोघे ताब्यात

SCROLL FOR NEXT