Omkar Elephant Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Omkar Elephant: ओंकारचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी वनखात्याची

Omkar Elephant Update:ओंकार या हत्तीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही वन खात्याची आहे. ती त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना टाळता येणार नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजा जनमेजयाच्या सर्पसत्रात नागाधिपती तक्षक याची आहुती देण्याचा प्रसंग आला असता, तक्षक इंद्राच्या पाठीमागे लपला. तेव्हा ‘इंद्राय स्वाहा, तक्षकाय स्वाहा’ असा ब्राह्मणांनी मंत्र म्हणून तक्षक आणि त्याची पाठराखण करणारा इंद्र या दोघांनाही स्वर्गातून खाली आणले अशी पुराणकथा आहे. आज या मंत्राची आठवण झाली याचे कारण पेडणे तालुक्यातील उत्तर सीमेवर सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असणाऱ्या कडशी मोप, ताम्बोसे, उगवे या गावात तिसऱ्यांदा ओंकार या हत्तीचे झालेले आगमन होय!

तीन वर्षापूर्वी गणेश चतुर्थीच्या दरम्यान हे हत्तीचे पिल्लू आपल्या कळपातून वाट चुकून दोडामार्ग येथून मोप, ताम्बोसे येथे आले तेव्हा त्याचे कोण कौतुक झाले. गणेश चतुर्थीच्या काळात या पिल्लाचे आगमन झाले म्हणून गावच्या श्रद्धाळू लोकांनी याचे नामकरण ’ओंकार’ असे केले. त्याला नारळ, फणस, केळी, भाज्या खाऊ घालणे यात आनंद मानणारे लोक होते. त्याचे फोटो, व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात गावातील उत्साही तरुण मंडळी दंग होती.

परंतु कालांतराने या छोट्या हत्तीचे प्रताप पाहून लोक कंटाळले आणि त्याला माघारी त्याच्या कळपात परत पाठविण्यासाठी प्रयत्न करू लागले आणि खरेच एक दिवस हे पिल्लू आपल्या कळपात परत गेलेदेखील. गावातील लहान मुलांना या हत्तीच्या पिल्लाचा लळा लागला होता ती छोटी मंडळी आपला ओंकार निघून गेला यामुळे हिरमुसली झाली. परंतु शेती बागायतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

पुढच्या वर्षी हाच हत्ती पुन्हा कडशी मोप, ताम्बोसे, उगवे या गावांत आला. लोकांची चिंता वाढली. त्यांनी स्थानिक सरपंचांमार्फत वन खात्याला या हत्तीचा बंदोबस्त करायची विनंती केली. परंतु वन खात्याने ही बाब गंभीरतेने बहुधा घेतली नसावी. ओंकार हत्ती शेतकऱ्यांचे बरेचसे नुकसान करून पुन्हा आपल्या कळपात निघून गेला आणि गावकऱ्यांनी पुन्हा एकदा सुटकेचा नि:श्वास सोडला. आता पुन्हा तिसऱ्यांदा हा हत्ती याच पंचक्रोशीत येऊन धुडगूस घालतो आहे.

आता तो अंगापिंडाने थोराड झाला आहे. शेती, बागायतीचे नुकसान तो करतोच आहे परंतु त्याचबरोबर लोकांनी आपल्या दारात उभ्या करून ठेवलेल्या चारचाकी आणि दुचाकी वाहने उलथवून त्यांची मोडतोड करतो आहे. शेतीबागायतीचे नुकसान, वाहनांची मोडतोड याने लोक धास्तावले आहेत. लोकांनी पुन्हा एकदा वन खात्याकडे धाव घेतली आहे. परंतु वन खाते ढिम्म आहे असे कळते. वास्तविक सापळा रचून या हत्तीला पकडून त्याला बोंडला अभयारण्यात सोडणे सहज शक्य आहे. अभयारण्यासाठी फुकटात हा हत्ती मिळणार आहे. मग वन खाते का प्रयत्न करीत नाही असा प्रश्न पडतो.

हा हत्ती वारंवार कसा काय या क्षेत्रात येतो, असा प्रश्न सामान्य लोकांना पडणे शक्य आहे. याचे कारण म्हणजे प्रत्येक प्राण्याला निसर्गाने एक शक्ती दिलेली असते. उदरभरणासाठीची आणि स्व-संरक्षणाची! तशीच शक्ती हत्ती या प्राण्यासाठी मिळालेली आहे. त्याची सोंड हे त्याचे नाक. या लांब असल्यामुळे त्याची गंध ओळखण्याची क्षमता इतर प्राण्यापेक्षा अनेक पटीने अधिक असते. अगदी दुरूनही हा पाना-फुलांचा, झाडांचा गंध ओळखतो आणि तो वासावरून पुन्हा पुन्हा त्या भागात येतो. त्याचा दुसरा शक्तिशाली अवयव म्हणजे त्याचे कान! या प्राण्याचे कान कोणत्याही सजीवापेक्षा मोठे आणि रुंद असतात.

यामुळे कित्येक मैलावरचा आवाज त्याला ऐकू येतो. तिसरी त्याची शक्ती म्हणजे त्याचे शारीरिक वजन! गवा आणि गेंडा या प्राण्यापेक्षाही काकणभर जास्त शक्ती मदमस्त हत्तीची असते. हा प्राणी वजनदार असला तरी तो पळण्यात आणि चढाई करण्यात चपळ असतो. यामुळेच पूर्वीच्या काळात याचा उपयोग युद्धात केला जात असे. चौथे त्याचे स्व-संरक्षणांचे अस्त्र म्हणजे त्याचे लांब सुळे.! हे त्याचे दाखवायचे दात असतात.( हे सुळे म्हणजे हस्तिदंत अतिशय मौल्यवान मानले जातात म्हणूनच यांची शिकार केली जाते.) या प्राण्याचे वैगुण्य म्हणजे त्याचे डोळे हे होय. त्याचे डोळे देहाच्या मानाने खूपच बारीक असतात. म्हणजेच याची दृष्टी तेवढीशी चांगली नसते. ती अधू असते.

हत्ती हा प्राणी शेतकऱ्याच्या पिकाचा विध्वंस करणारा असला तरी त्याचे असणे सौभाग्याचे मानले जाते. ज्याच्या दारात हत्ती झुलतो तिथे लक्ष्मीचा वास असतो अशी धारणा आहे. हत्ती हा समृद्धीचे लक्षण मानले जाते. श्रीमंतासाठी ते एक प्रतिष्ठेचे द्योतक मानले जायचे. म्हणूनच पूर्वी राजे रजवाडे आपल्या दारी हत्ती झुलवत ठेवीत असत. त्यांच्या सैन्यात हत्ती दल असायचे.

साठ सत्तरच्या दशकात मनोरंजनाचा एक प्रकार म्हणजे सर्कस असे. यातही हत्ती असत. आबालवृद्ध या सर्कशीचा आनंद लुटत असत. आता मनोरंजनाची आधुनिक साधने वाढल्याने सर्कस हा प्रकार जगातून जवळ जवळ अस्तंगत पावला आहे. सर्कसमालकांना ही जंगली जनावरे मिळणे आणि त्यांची देखभाल करणे खूपच मुश्कील झाले आहे.

या अशा कारणाने सर्कस या मनोरंजनाच्या प्रकाराला आजची पिढी आणि विशेषतः छोटी मुले मुकली आहेत. तर मूळ मुद्दा असा, की ओंकार या हत्तीचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी ही वन खात्याची आहे. ती त्या खात्याच्या अधिकाऱ्यांना टाळता येणार नाही आणि टाळली तर जनतेला ‘ ओंकाराय स्वाहा, वन खातेय स्वाहा’ असा मंत्र म्हणावा लागेल.

जयराम रेडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lairai Jatra: 'लईराई' जत्रेची जोरदार तयारी, 21 रोजी जत्रा; होमकुंडासाठी लाकडांची जमवाजमव

Shukraditya Yog 2026: अफाट संपत्ती, मान-सन्मान आणि सुखाचे दिवस! 'शुक्रादित्य योग' पालटणार 'या' 4 राशींचं नशीब; आयुष्यात येणार मोठा टर्निंग पॉईंट

Ponda bye election: विधानसभेत फोंड्याचे प्रतिनिधित्व नसणे अयोग्य

फोंडा 'निर्नायकी' करण्याचा निर्णय - संपादकीय

Israel Air Strike: शस्त्रसंधीचा फज्जा! इस्रायलनं लेबनॉनवर डागली 100 हून अधिक क्षेपणास्त्रे, 250 जणांचा मृत्यू; इराणकडून 'होर्मुझ सामुद्रधुनी' पुन्हा बंद

SCROLL FOR NEXT