Narve Masandevi Jatra Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Narve Masandevi Jatra: मृण्मयी वारुळातील नार्वेची मसणदेवी; लोकश्रद्धा, मृतात्मे अन्‌ भुतांच्या जत्रेची अनोखी परंपरा

Narve Masandevi History: मांडवी नदीच्या उजव्या काठावर वसलेल्या डिचोली तालुक्यातल्या नार्वे गावात मसणदेवीचे छोटेखानी मंदिर, दरवर्षी श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी वार्षिक जत्रेनं गजबजते.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजेंद्र पां. केरकर

भारतभर या दिवशी गोकुळाष्टमीनिमित्त श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो, परंतु गोव्यात मसणदेवीच्या परिसरातल्या मांडवी नदीकिनारी जी अष्टमीची जत्रा साजरी होते, तेथे मृतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधी करण्याच्या हेतूने भाविक येतात व ब्राह्मण पुजाऱ्यांच्या मदतीने विधी करतात.

मांडवी नदीच्या उजव्या काठावर वसलेल्या डिचोली तालुक्यातल्या नार्वे गावात मसणदेवीचे छोटेखानी मंदिर, दरवर्षी श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी वार्षिक जत्रेनं गजबजते. राज्यभरातीलच नव्हे तर कोकणातील भाविक मसणदेवीच्या वार्षिक जत्रेसाठी येतात आणि मृण्मयी वारुळाच्या रुपातील मसणदेवी आणि तिच्यासमोर आसनस्थ असलेल्या वाघ्रोदेवाचे पूजन करून, त्यांच्याविषयाचा भक्ती आणि आदरभाव व्यक्त करतात. गोव्यातील मसणदेवीचे पूर्वापार हे एकमेव मंदिर असल्याने, तिच्या दर्शनासाठी भाविक इथल्या मंदिराला जरी भेट देत असले तरी तिच्या श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी होणाऱ्या जत्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या संख्येनं सूर्यास्तापूर्वी येतात.

भारतात स्मशानदेवी पूजनाची परंपरा असून, मसानी मेलडी माता म्हणून शाक्त संप्रदायात तिचे पूजन केले जाते. मसानी मेलडी, हे दुर्गा देवीचे उग्र आणि रक्षणकर्ती स्वरूप मानले जाते. पृथ्वीवर आपल्या आतंकाने दहशत निर्माण अम्रुवा या दैत्याचा अंत करण्यासाठी ही देवता निर्माण झाली. अम्रुवा राक्षसाला ठार केल्यानंतर, मसानी देवीने कामद्रुप कामाख्या नगरीत प्रवेश करून, तेथील दुष्ट मांत्रिकाचे रुपांतर काळ्या बकऱ्यात झाल्यावर, मसानी देवी बकऱ्यावर आरुढ झाली. आपल्या चारही हाती त्रिशूळ, तलवार, खंजीर आणि रिकामी बाटली धारण केलेल्या स्वरुपात या देवीचे पूजन गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या मंदिरांत केले जाते.

उत्तराखंडातल्या काही भागात स्मशानाची देवता मानण्याची परंपरा पहायला मिळते. त्यापैकी मसाणी मेलडी ही जरी भारताच्या विविध भागात स्मशानाची अधिष्ठात्री देवता म्हणून पूजली जात असली तरी गोव्यातील मसणदेवीचा संबंध मात्र मसाणी मेलडीशी अजिबात नाही. गोव्यातील मसणदेवी ही एक स्थानिक परिस्थितीनुसार उद्गम पावलेली लोकदेवता असून, तिच्या पूजनाची परंपरा पिढ्यानपिढ्यापासून प्रचलित असलेल्या लोककथेत आढळते. कधीकाळी पूर्वाश्रमीच्या हिंदोळे गावात आदिवासी गावडा जमातीतील एक वयोवृद्ध स्त्री राहत होती . एकमेव दुभती गाय , तिच्या जगण्याचा आधार होता. एक दिवस ही गाय कुरणात चरताना, पट्टेरी वाघाने तिची शिकार केली. आपल्या जगण्याचा आधारच, गाईच्या मृत्युमुळे नाहीसा झाल्याचे पाहिल्यावर शोकाकुल अवस्थेत त्या स्त्रीने प्राण त्याग केला.

आपल्या कृत्याने एका निष्पाप स्त्रीचा जीव गेल्याने, वाघाने म्हणे त्याच जागी येऊन प्रायश्चित म्हणून प्राण त्याग केला. कालांतराने, ज्या जागी आदिवासी स्त्रीचा मृत्यू झाला होता, तेथे वारुळ निर्माण झाले. ही घटना तेथील लोकमानसासाठी अचंबित करणारी होती आणि त्यामुळे त्यांनी ती जागा एका जुन्या स्मशानभूमीच्या परिसरात असल्याने आणि त्यांना तेथे निर्माण झालेल्या वारुळात दिव्यत्वाची प्रचिती लाभल्याने, त्यांनी तिचे मसणदेवी तर वाघाच्या स्मृतिप्रित्यर्थ तेथे व्याघ्र मूर्तीची स्थापना करून वाघ्रोदेव म्हणून पूजन करण्यास प्रारंभ केला.

मंदिराच्या समोर जे काजऱ्याचे झाड उभे आहे, तेथे मसणदेवीचा आज्ञाधारक सेवक असणाऱ्या देवचाराचे वास्तव्य असून, मसणदेवीच्या सान्निध्यात कालांतराने अपत्याच्या जन्मावेळी अथवा रज:स्वला अवस्थेतल्या विवाहित स्त्रियांचा जेव्हा मृत्यू व्हायचा तेव्हा, त्यांना गावातील स्मशानभूमीत दहन करण्याऐवजी त्यांचा मृतदेह इथे दफन केला जातो आणि त्यामुळे त्यांचा अतृप्त आत्मा भुताखेताचे रूप घेऊन आपल्या कुटूंबाला त्रास करणार नाही, अशी धारणा इथल्या लोकमानसात रूढ झालेली आहे.

दरवर्षी श्रावण महिन्यातील तिसऱ्या मंगळवारी जेव्हा मसणदेवीची जत्रा साजरी होते, तेव्हा गोवाभरातील भाविक नार्वे गावाच्या एका टोकाला वसलेल्या मसणदेवीच्या मंदिराला सूर्यास्तापूर्वी भेट देतात आणि देवीसमोर आपल्या कुटूंबासाठी आशिर्वाद मागतात. अवघत आणि आळवंत स्त्रियांच्या अतृप्त आत्म्यांवरती ही देवी जसे नियंत्रण प्रस्थापित करते, त्याचप्रमाणे भाविकांसाठी संतानदेवी म्हणूनही आशीर्वाद देत असल्याची लोकश्रद्धा रूढ आहे आणि त्यामुळे जेव्हा आपल्या कुटूंबात अपत्याचा जन्म होतो, तेव्हा नवसफेड करण्यास भाविक देवीला छोटेखानी पाळणी अर्पण करण्यासाठी इथे येतात.

दिवसा मसणदेवीच्या मंदिरात तिच्याप्रित्यर्थ जत्रा साजरी केल्यानंतर सूर्यास्तापूर्वी तेथे आलेले भाविक आणि दुकानदार तेथून घाईघाईत निघून जातात. सूर्यास्तानंतर मसणदेवी म्हणे आपल्या ताब्यात असलेल्या मृत व्यक्तींच्या आत्म्यांना मुक्त करते आणि त्यामुळे त्यांच्यासाठी भूतांची जत्रा तिच्या नेतृत्वाखाली साजरी केली जाते, अशी लोकमानसाची धारणा आहे. संध्याकाळी घरी जाताना लोक जत्रेला येणाऱ्या भुताखेतांना चणे फुटाणे अर्पण करतात. रात्रभर तेथे अशा भुताखेतांची वर्दळ असल्याने, मसणदेवीच्या मंदिर आणि परिसरातून नाहीसे होण्याचा प्रयत्न करतात.

मसणदेवीच्या जत्रेनंतर नार्वे येथील म्हादई, दूधसागर, वाळवंटी, डिचोली आणि कुंभारजुवे कालव्यातून इथे येणाऱ्या जुवारी अशा पाच नद्यांच्या संगमाद्वारे नावारूपास आलेल्या पंचगंगा तीर्थस्थळी अष्टमीची जत्रा साजरी होते. भारतभर या दिवशी गोकुळाष्टमीनिमित्त श्री कृष्ण जन्मोत्सव साजरा केला जातो, परंतु गोव्यात मसणदेवीच्या परिसरातल्या मांडवी नदीच्या किनारी जी अष्टमीची जत्रा साजरी होते, तेथे मृतात्म्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विधी करण्याच्या हेतूने भाविक येतात आणि आज ब्राह्मण पुजाऱ्यांच्या मदतीने विधी करतात.

यावेळी परिसरातल्या बऱ्याच देवतांच्या उत्सव मूर्तींना पालखीत बसवून आणतात आणि टेकडीवरच्या पवित्र जागी या पालख्या भाविकांना दर्शन देण्यासाठी उपलब्ध असतात. मसणदेवी आणि त्यानंतर येणाऱ्या अष्टमीच्या जत्रेत पूर्वापार अनुबंध असल्याने, त्यांचे नाते मृतात्म्याशी जोडलेले आहे. गोव्यातील नार्वेची मसणदेवी आणि मांडवीच्या पंचगंगा तीर्थक्षेत्री असलेला काळोबा देव यांच्यातल्या सांस्कृतिक आणि धार्मिक अनुबंधांना उजाळा देण्याचा प्रयत्न भाविक या दोन्ही जत्रांच्या माध्यमातून बहुधा करतात. नार्वेची ही मसणदेवी तिच्या ताब्यातल्या भुताखेतांना आपली दिवसाची जत्रा झाल्यानंतर रात्री त्यांच्या प्रित्यर्थ होणाऱ्या जत्रेनिमित्त मुक्त करतात आणि त्यामुळे रात्री भुताखेतांची जत्रा होते, असा लोकसमज रूढ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

महिंद्राची नवी CNG SUV बाजारात; 9.99 लाखांपासून किंमत, दमदार लूकसह टाटा नेक्सॉन आणि ब्रेझाला देणार टक्कर

Ranji Trophy 2026: पिठिया-भार्गवच्या फिरकीपुढे गोव्याची शरणागती! बडोद्याचा डाव व 135 धावांनी दणदणीत विजय

Dharashiv Child Welfare Committee: बालकांच्या कल्याणासाठी उचललेल्या पावलांचे प्रतिज्ञापत्र द्या; गोवा खंडपीठाचे धाराशिव समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT