Morpirla Paika Spring  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Morpirla Paika Spring: मोरपिर्लाचा 'पायका झरा'; श्रद्धा, संस्कृती अन् जलसंवर्धनाची शेकडो वर्षांची परंपरा

Morpirla Paika Spring History: झरा जेव्हा डोंगर उतार पार करून गावात येतो तेव्हा त्याचे पावित्र्य अबाधित रहावे म्हणून लोकमानसाने त्याच्याशी दिव्यत्वाची सांगड घातली.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजेंद्र पां. केरकर

झरा जेव्हा डोंगर उतार पार करून गावात येतो तेव्हा त्याचे पावित्र्य अबाधित रहावे म्हणून लोकमानसाने त्याच्याशी दिव्यत्वाची सांगड घातली. पायका देवाच्या सान्निध्यातून प्रवाहित होणारा हा झरा पेयजलाचा गावासाठी मुख्य स्रोत ठरला होता आणि त्यासाठी त्याचे पावित्र्य राखले जावे, घाण,केरकचरा टाकू नये म्हणून लोकमानस सतत दक्ष असायचे.

दक्षिण गोव्यातील केपे तालुक्यातील मोरपिर्ला शेतीप्रधान असल्याकारणाने शेकडो वर्षांपासून हा गाव कष्टकरी नाना जातीजमातींना आकर्षित करत आहे आणि त्यामुळे इथे त्यांचे वास्तव्य आहे. अन्न, पाणी या मानवी समाजाच्या मुलभूत गरजा असून, आदिम काळापासून दऱ्याखोऱ्यात भटकंती करणाऱ्या लोकमानसाने जेथे या गोष्टी उपलब्ध होतात, तेथे वास्तव्य करण्यासाठी आवश्यक प्राधान्य दिले. आज सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी पुरवठा विभागाद्वारे पिण्याचे पाणी नळाद्वारे उपलब्ध करून दिले जात आहे आणि त्यामुळे पूर्वापार जे जलस्रोत त्यांच्या पेयजलाची गरज पूर्ण करायचे त्यांचे विस्मरण झालेले आहे.

एकेकाळी आपली तहान ज्या जलस्त्रोतांनी भागवली होती, ज्या पाण्याद्वारे आपण जगलो, त्यांचे विस्मरण समाजाला होत असते आणि त्यामुळे त्यांच्या सद्यस्थितीबाबत मोठ्या प्रमाणात अनास्था पाहायला मिळते. गोवाभर पूर्वीच्या काळी झरे, तळ्या, विहिरी आदी जलस्रोत टिकावेत, त्यांची निगा राखली जावी यासाठी लोक दक्ष होते. परंतु आज जल निरक्षरता वाढत चालली असून, त्यामुळे झरे, तळे यांचे महत्त्व कमी होत आहे.

मोरपिर्ला हे ग्रामनाम इथे मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या मोरांमुळे नावारूपास आले असावे. आजही इथे मोरांचे थवे पाहायला मिळतात. इथल्या आदिवासी जमातीच्या पारंपरिक लोकधर्मात मोरपिसांना महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यामुळे निसर्ग आणि पर्यावरणाच्या तत्त्वांना जीवनाचा कसा भाग बनवला त्याची प्रचिती येते. सह्याद्री पर्वतशिखरांच्या प्रदेशांशी संलग्न असलेल्या या गावातल्या लोकमानसाने इथे हमखास बारामाही उपलब्ध पाणी पुरवठ्याला महत्त्व दिले होते.

मान्सूनच्या पावसामुळे भातशेती पिकवण्याला जसे प्राधान्य दिले होते, तसेच हिवाळ्यातही झऱ्याच्या पाण्याच्या आधारे केल्या जाणाऱ्या वायंगणी शेतीची परंपरा जपली होती. मानवी जीवनात पेयजल महत्त्वाचे असून,त्याचा पुरवठा करणाऱ्या झऱ्यांना निरंतर वाहते ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले होते. खरेतर जेथे वाहते पाणी तेथेच मानवी संस्कृती आणि जीवन बहरते, हे अनुभवलेले असल्याने जुन्याकाळी झरे, तळ्या सुरक्षित ठेवण्यात समाज हातभार लावत असे.

सोळाव्या शतकात गोव्यातल्या जुन्या काबिजादीतील जेव्हा पोर्तुगीजांनी विद्ध्वंस आरंभला तेव्हा इथल्या लोकांनी आपल्या सांस्कृतिक आणि सामाजिक संचितांचे रक्षण करण्यासाठी प्राणपणाने लढा दिला होता. आज इथे असलेली देवदैवते पूर्वाश्रमीच्या दीपवती बेटावरच्या नार्वे गावातली, तेथून ते या निसर्गसंपन्न गावी आले आणि श्री सप्तकोटीश्वर देवाची स्थापना केली. या गावाची भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध जैविक संपदेचे घटक यामुळे पूर्वापार नाना जातीजमाती आल्या होत्या. कष्टकरी समाजाने चवदार आणि कायम स्वरूपी पेयजलाचा मोठ्या प्रमाणात पुरवठा करणाऱ्या झऱ्यांना आदराचे स्थान बहाल केले.

आज या गावात मोठ्या प्रमाणात स्थानिक वृक्षवल्लीची कत्तल करून काजूची लागवड केलेली आहे. एकेकाळी डोंगर उतरावरती कुमेरी शेतीची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा जतन करण्यात धन्यता मानणाऱ्या कष्टकऱ्यांनी काजू या बागायती पिकांची लागवड मोठ्या प्रमाण केली आणि त्यामुळे या कृतीचे दुष्परिणाम इथे पहायला मिळतात.गोव्यातील आदिवासी जमातीतील कष्टकरी लोकसमूहाने पायक देवतत्वाची स्थापना करताना, प्रामुख्याने वृक्ष, वेलींनी युक्त देवराई महत्त्वाची मानली होती. इथे वास्तव्यास असणाऱ्या लोकसमूहाने देवराईचे अस्तित्व महत्त्वाचे मानले होते.

पायका देवाच्या नावाने इथे पूर्वापार देवराई डोंगर उतारावर असून, तिचे अस्तित्व आणि पावित्र्य गावकऱ्यांनी श्रध्दा आणि परंपरा यांच्या पालनाने जपले होते. मान्सूनच्या पावसाचे पाणी जेव्हा देवराईत आणि परिसरात कोसळतो तेव्हा इथल्या महाकाय वृक्षांची मुळे ते भूगर्भात साठवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे योगदान करतात आणि त्यामुळे पावसाळा संपल्यावर हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही निरंतर झरा प्रवाहित राहून मानवासह समस्त प्राणिमात्रांच्या जगण्याला समृद्ध करत असतो. झऱ्याला पवित्र मानण्याची परंपरा केवळ भारतीय संस्कृतीत नसून रोमन आणि ग्रीक संस्कृतीतही असे पवित्र झरे असून, त्यांचे पावित्र्य तिथल्या समाजाने जपलेले होते. अशा झऱ्यांशी निगडीत समाजाचे संकेत असून त्यांचे एकेकाळी त्यांनी पालन करण्यात धन्यता मानली होती. अशा झऱ्यांच्या पाण्यात केवळ औषधी गुणधर्मच नव्हे तर दैवी शक्तीचे अस्तित्व असल्याची लोकश्रद्धा रूढ होती.

आजही अशा झऱ्यांच्या ठिकाणी या संबंधीचे पुरावे आढळतात. हा झरा जेव्हा डोंगर उतार पार करून गावात येतो तेव्हा त्याचे पावित्र्य अबाधित रहावे म्हणून लोकमानसाने त्याच्याशी दिव्यत्वाची सांगड घातली. पायका देवाच्या सान्निध्यातून प्रवाहित होणारा हा झरा पेयजलाचा गावासाठी मुख्य स्रोत ठरला होता आणि त्यासाठी त्याचे पावित्र्य राखले जावे, घाण,केरकचरा टाकू नये म्हणून लोकमानस सतत दक्ष असायचे. दगडधोंड्यातून वाहत खाली येणारा हा झरा तिथल्या पशुपक्षी यांची तहान भागवत असे. देवाधर्माच्या कार्यासाठी त्याचेच पाणी वापरण्याचा पूर्वापार लोकसंकेत होता आणि त्यासाठी मान्सूनच्या पावसाचे आगमन होण्यापूर्वी सामुहिकरीत्या झऱ्याची साफसफाई करण्यात यायची.

अख्खा गाव,ती आपली जबाबदारी मानून त्यात उत्स्फूर्तरित्या सहभागी व्हायचा. गोव्यात गावोगावी असे जलस्रोत सुरक्षित ठेवण्यात तेथील समाज सतत दक्ष असायचा. प्रत्येक झऱ्यात कोणत्या व्याधी दूर करण्याची क्षमता आहे याची लोकमानसाला जाणीव होती. अश्वारुढ पायका देव आणि त्याच्या भोवताली त्यांनी गुंतलेल्या कथा, श्रद्धा, संकेत यांनी असे झरे जपले होते. केवळ तहान भागवणे नव्हे तर त्यात औषधी गुणधर्म तसेच दैवी अधिष्ठान त्यांनी मानले होते. बारामाही, सकाळ, संध्याकाळ निरंतर वाहणारे हे झरे त्यांच्या जगण्याचा भाग बनले होते आणि त्यामुळे त्यांचे अस्तित्व समाजाने जपले होते.

सांडपाणी, केरकचरा झऱ्याच्या परिसरात टाकू नये आणि त्यांनी झऱ्याचे अस्तित्व संकटग्रस्त करू नये म्हणून लोक दक्ष असायचे. आज गावोगावी नळ पाणी पुरवठा योजना सुरू झाल्यावर कित्येक पिढ्यांची तहान भागवणारे हे झरे आणि त्यांचे अस्तित्व समाजाने विसरले. त्यामुळे तेथील झरे बऱ्याच ठिकाणी इतिहासजमा झालेले पाहायला मिळतात तर कुठे ते रस्ते आणि तत्सम विकासाचे नाव धारण करून येणाऱ्या प्रकल्पात अस्तित्वासाठी संघर्ष करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळच्या विनाशकारी महापुराचं संकट अचानक नव्हतं; 5 महिन्यांपूर्वीच संशोधनातून मिळाला होता इशारा, प्रशासन गाफील का राहिलं?

India Under 19: गोव्याचा व्यंकट भारताच्या संघात कायम; ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 वर्षांखालील एकदिवसीय मालिकेसाठी निवड

Virat Khdapkar World Record: जिद्द, धैर्य आणि चिकाटी... गोव्याच्या 6 वर्षांच्या मुलाचा 'विराट' विक्रम, पायी गाठले केदारनाथ; 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद

NHM Jobs Goa: आरोग्य खात्‍यात 127 कंत्राटी पदे भरणार; 18 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्‍याचे आवाहन

Goa Politics: "यापुढे पक्षांतर होणार नाही, याची हमी कोण देणार?" विजय सरदेसाईंचा काँग्रेसला अप्रत्यक्ष टोला

SCROLL FOR NEXT