Datta Naik Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Goa Opinion: पैसे मागणाऱ्यांवर बोलले तर धार्मिक भावना का दुखाव्यात? मोहनदास लोलयेकर

Datta Naik: देवळे म्हणजे देवाच्या नावाखाली कारभार चालवणारी समिती. या समितीत भ्रष्टाचार किंवा लुटारूपणाची वृत्ती असणे व त्यावर काहीच न बोलणे हा खरा देवाचा अपमान.

Sameer Panditrao

मोहनदास लोलयेकर

‘मठ आणि देवळांनी मला लुटले असते’ या दत्ता नायकांच्या विधानावर समाजमाध्यमांवर काही घटकांकडून टीका व्हायला सुरुवात झाली व पोलिसांत तक्रारीही देण्यात आल्या. नरेंद्र सावईकरांनी वरील विधानावर प्रतिक्रिया दिल्यावर सावईकरांचा मुद्दा उचलून धरीत काही मोजक्या मंडळींच्या- त्यात बहुतांश एका राजकीय पक्षाच्या निकट असणाऱ्यांनी व त्याची त्याच कामासाठी नियुक्ती केली आहे- अशांच्या नसलेल्या धार्मिक भावना उफाळून आल्या.

राजकीय पक्षांत व खासकरून सरकारदरबारी खास सेवा देऊन भ्रष्टाचाराच्या मार्गाने बक्कळ वरकमाई केलेल्यांचा तर पोटशूळ उठला! एकाही महाभागाला नरेंद्र सावईकरांना चर्चेसाठी तयार व्हा, असा सल्ला देण्याचे धाडस झाले नाही.

दत्ता यांच्या विधानाला बगल देऊन ‘पर्तगाळ मठ’ या शब्दावर जास्त भर देऊन सारस्वत समाजात वातावरण जास्त तापवण्याचा प्रयत्न झाला. दत्ता यांनी अनवधानाने केलेल्या ‘पर्तगाळ मठा’चा उल्लेख त्यांना टाळता आला असता व तो टाळून परोक्ष पद्धतीनेही जनमानसात मठाबद्दल लिहिता-बोलता आले असते. परंतु पिंडावर नजर ठेवून असणाऱ्या कावळ्यांसारखे त्यांच्या योग्य मुद्याचा परामर्श न घेता सोयीस्कर असा शब्द उचलण्यात आला व इतर मुद्याकडे सहेतुक दुर्लक्ष करण्यात आले.

आता मठ व देवळे लुटतात, असा आरोप केल्यास यांचा पोटशूळ का उठावा? पर्तगाळ मठावर आस्था असणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. काणकोणातील सारस्वत समाज हा पर्तगाळ मठाचा अनुयायी आहे. मी मागे पर्तगाळ मठाच्या भोवतालच्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम करताना दिवंगत स्वामींनी मला बोलावून घेतले व रस्ता कशाप्रकारे करावा व कुठपर्यंत डांबराचा थर घालताना कुठे कुठे दुरुस्ती करावी याबद्दल मला सूचना केल्या व त्यानुसार मी कामही करून दिले. मी मठानुयायी नाही.

बोलता बोलता स्वामीजींनी काही मुद्यांवर खंत व्यक्त केली व त्यात काही महाभागांची नावे घेतली- मी नावे सांगत नाही; कारण स्वामी हयात नाहीत- त्यातील एक खंत म्हणजे मठाचा विस्तार करण्यासाठी आखलेल्या काही जमिनीवर पूर्वापार जे मठाचे अनुयायी व ज्याच्या आता धार्मिक भावना उफाळलेल्या आहेत अशा ‘सद्गृहस्थांनी’ कसे आक्षेप घेतले ते सविस्तरपणे ते बोलले व मठाच्या सुशोभीकरणास कसा खोडा घातला त्याची त्यांनी माहिती दिली.

आता दत्ता यांच्याविरुद्ध तक्रार करणारे ‘सतीश भट’ यांनी हे महाभाग कोण याचा जर खुलासा केला असता तर गोव्यातील धार्मिक भावना उचंबळून आलेल्यांच्या ज्ञानात भर पडली असती. सतीश भट हे मठ परिसरात राहणारे, पर्तगाळ मठावर अतिशय श्रद्धा असणारे, मग जमिनीच्या य:कश्चित क्षुद्र तुकड्यापायी धर्माशी, पर्यायाने मठाच्या कामात खोडा घालतात कोण? त्याकाळी कधीच सतीश भटांच्या भावना दुखावल्याचे ऐकले नाही. निदान आतातरी सतीश भटांनी त्यावर उजेड पाडावा. म्हणजे निदान येईल की धार्मिक भावनांना खरेच ठेच लागली की ते कांगावा करीत आहेत?

मठ आणि देवळे लुटतात का? या प्रश्नाला सोईस्कररीत्या बगल देण्यात आली. जर देवळात भ्रष्टाचार होत नाही तर हल्लीच दक्षिण गोव्यातील एका देवळात सोन्याची पालखी करताना गैरव्यवहार झाला, असा आरोप झाला व तक्रारीही दाखल झाल्या याला काय म्हणावे? लुटमार की देवाची सेवा? काही देवळांनी आपल्या जमिनी सर्व सरकारी नियम धाब्यावर बसवून विकल्या व अज्ञानी लोकांना फसवत नोटरीकडे जाऊन सेलडीड केल्याचा देखावा केला. अशा भ्रष्टाचारी मार्गाचा अवलंब केलेल्यांस काय म्हणतात? याचा खुलासा करावा; याला लुटमार म्हणतात की देवाची सेवा?

आपल्या घामाचा पैसा देवस्थानात जमा करून खोट्या सेलडीड करून ज्याच्या नावावर प्रत्यक्ष जमिनी कधीच नाही होणार, याची जाणीव असतानाही त्यांना फसवणे याला कोणता शब्द वापरणार? देवळांनी आम्हांला फसवले, लुटले, अज्ञानाचा फायदा घेतला, असा आरोप झाल्यास तुमच्या भावना दुखावणार? की बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई करण्यास समोर येणार? यासंबंधी सतीशरावांसारख्या धार्मिक भावना दुखावणाऱ्यांनी एकदा स्पष्ट भूमिका घ्यावी म्हणजे जनतेलाही तुमच्या भावना समजतील.

देवस्थान मठ व इतर धार्मिक संस्थांनी आपल्या अनुयायांच्या संस्थांना शैक्षणिक संस्था काढण्यास किंवा इतर कामासाठी काही मदत केली, याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु दान केले आहे, या एकाच मुद्यावर इतर अनेक वाईट प्रथांवर बोट न ठेवणे म्हणजे उद्या एखाद्या अतिरेकी, स्मगलर किंवा काळाबाजार करणाऱ्यांनी दान दिले म्हणून त्याच्या इतर कृत्यावर बोलणे करू नये असे सांगणे! म्हणजे त्याच्या गैरव्यवहारात आपण सामील आहे किंवा सहमती आहे असे मानण्यासारखे होणार नाही काय?

एका अदितीने लेख लिहिला आहे- ती एक तरुण कोकणी कार्यकर्ती! कोकणी चळवळ ही पुरोगामी चळवळ असे मानणारी व लोकोत्सव, चित्रंगी वगैरे व्यासपीठावरून पुरोगामी समतेचा संदेश देणाऱ्या कोकणी भाषा मंडळाची सदस्य! त्यांच्या कार्यक्रमांमध्ये एकेकाळी हिरिरीने भाग घेणारी लोकविश्वास संस्था चालवत असलेल्या शाळेची प्रमुख. तिने या वादात उडी घेताना मठाने लोकविश्वास प्रतिष्ठानाला कशी मदत केली असल्याचे विवेचन केले.

अभिनंदनीय उपक्रम. परंतु ज्या मठाला परंपरा आहे, त्या मठात आजही जातिभेद चालतो का? याचे उत्तर अदितीने द्यावे. मठात कोणाला शिक्षण द्यावे, मुद्रा कोणाला द्याव्यात हा मठाचा विशेषाधिकार. त्याला मी आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही किंवा मला त्याचा अधिकार नाही. परंतु सामाजिक चळवळीत विशेष करून ‘चित्रंगी’सारख्या व्यासपीठाचा उपयोग करून सामाजिक समता, जातिभेद निर्मूलन, अंधश्रद्धा, महिलांची मासिक पाळी याच्यावर चर्चा करणारी ती एक कार्यकर्ती. तिला मठातील व्यवहार मान्य

आहे का? याचे उत्तर तिने आधी द्यावे. मान्य असल्यास ठीक. मान्य नसल्यास त्यावर आपण चित्रंगी किंवा इतर कार्यक्रमात झालेल्या प्रबोधनपर चर्चेची फलश्रुती म्हणून काय प्रयत्न केले याचीही माहिती द्यावी. म्हणजे आपले विचार समजण्यास सोपे जाईल.

देवळावर कोणतेही आरोप करणे किंवा मठावर आरोप करणे यात धर्माचा दुरान्वये संबंध नाही. कारण देव आणि देवळे व मठ यात मूलभूत फरक आहे. देवावर बोलल्यास भावना एखादेवेळी दुखू शकतात; परंतु देवळे म्हणजे देव नव्हेत. देवळातील देवता म्हणजे मूर्ती किंवा एखादी देवाची तसबीर. याला देवत्व मानणारे लोक आहेत व त्यावर काही अनिष्ट बोलल्यास त्यांच्या भावना दुखावल्या हे एकवेळ समजू शकते.

परंतु देवळे म्हणजे देवाच्या नावाखाली कारभार चालवणारी समिती. या समितीत भ्रष्टाचार किंवा लुटारूपणाची वृत्ती असणे व त्यावर काहीच न बोलणे हा खरा देवाचा अपमान. कारण तो देवाच्या नावे गैरव्यवहार केलेला असतो. दुर्दैवाने तथाकथित धर्मश्रद्धावाल्यांना त्याबद्दल काहीच वाटत नाही. निवडून आलेल्या कमिट्या पूर्वीच्या कमिट्यांवर किंवा सभासदांवर गंभीर आरोप करीत असतात, तेव्हा त्यांच्या धार्मिक भावना निद्रावस्थेत असतात काय?

कोणत्याही कामासाठी कोणताही देव पैसे मागत नसतो. मागणारे लोक समित्यांवर निवडून आलेले असतात व गैरव्यवहार करणारेही तेच असतात. अशा लोकांवर जर कोणी काही बोलल्यास धार्मिक भावना दुखावत असल्यास हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु देवाची ढाल पुढे करून जर देवळे व मठ लुटत असतील तर त्यावर बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. कारण देणगी मागताना सर्व ज्ञाती समूहाकडे जाऊन त्या मागितल्या जातात. याला काही अपवाद असू शकेल. तूर्तास इतकेच.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

WTC Final Host Nation: भारताला पुन्हा डावललं, पुढील 3 'WTC Final'चं यजमानपद 'या' देशाकडे; ICC ची मोठी घोषणा

India Justice Report: देशात न्याय वितरणात गोव्याची स्थिती बिकट, CM सावंत यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह; इंडिया जस्टिस रिपोर्टमधून खुलासा

Indonesia Ship Fire: इंडोनेशियात जहाजाला भीषण आग, प्रवाशांनी समुद्रात घेतल्या उड्या; थरारक VIDEO व्हायरल!

Virat Kohli 5 Morning Habits: तुम्हीही व्हा विराटसारखे 'सुपरफिट'! कोहलीच्या फिटनेसचे रहस्य उघड, त्याची सकाळची 'ही' खास सवय माहितीय का?

Health Tips: वारंवार जुलाब लागणं असू शकतं 'या' गंभीर आजाराचं लक्षण! इन्फेक्शन समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात

SCROLL FOR NEXT