अश्मयुगात वावरणाऱ्या आदिमानवाचे जग त्याच्याभोवती असणाऱ्या निसर्ग आणि पर्यावरणाच्या नानाविध घटकांनी प्रभावित झाले होते. वृक्षवेलींची उपलब्ध मौसमी फळे, फुले, कंदमुळे आणि त्याचबरोबर जंगली श्वापदांची दगडी हत्यारांनी शिकार करून त्यांचे मांस आदी भक्षण करणाऱ्या इथल्या आदिमानवाचे जगणे नैसर्गिक साधनसंपत्तीवर अवलंबून होते.
आदिमानवातर्फे प्रामुख्याने दगडाचाच वापर हत्यारांसाठी केला जात होता. त्यांच्या भोवताली असणाऱ्या लाकडे, हाडे, दगड आदी घटकांचा वापर आदिमानवाने हत्यारे बनवण्यासाठी केला होता. अन्न आणि पाणी या दोन प्रमुख गरजांभोवती आदिमानवाचे जगणे केंद्रित झाले होते. आपल्याभोवती वावरणारे प्राणी थोड्याफार प्रमाणात फळेमुळे आदी अन्न मळवण्यासाठी आदिमानवाला आपल्या बुद्धीचाच बऱ्याचदा वापर करावा लागे.
टोळ्या करून राहणाऱ्या आदिमानवाने प्राण्यांची शिकार करून, त्यांचे मांस भक्षण करण्याला प्राधान्य दिले होते. दगडाचा हत्यार म्हणून वापर करण्यासाठी आवश्यक दगडांचा शोध घेणे आणि त्यांचा शिकारीस उपयोग करण्याची कला त्याला अवगत करणे गरजेचे ठरले होते.
अश्मयुगीन कालखंडात आदिमानवाचे जीवन निसर्गातल्या विविध घटकांवरती अवलंबून होते. त्यामुळे जेथे वाहते नदीनाले होते, शिकार करण्यासाठी जंगली श्वापदे उपलब्ध होती. त्याच परिसरात वास्तव्य करण्याच्या दृष्टीने आदिमानव आग्रही होता.
गोव्यात आदिमानवाच्या वास्तव्याच्या पाऊलखुणा मोठ्या प्रमाणात आहे. बारमाही पाण्याची आणि मौसमी रानटी फळे, फुले, कंदमुळे यांची उपलब्धता असणाऱ्या दुधसागर खोऱ्यात पुरातत्त्व अभ्यासकांना यापूर्वी आढळल्या होत्या. जुवारी नदीखोऱ्यात येणाऱ्या कुशावती नदीकिनारी तीन ठिकाणी जी प्रस्तर चित्रे आढळलेली आहेत, त्यावरून इतिहासपूर्व काळातील मानवाचा वावर इथे असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
म्हादईशी एकरूप होणारी आणि वाघेरी पर्वताच्या पायथ्याशी उगम पावणाऱ्या झरमे नदीतल्या शिलाखंडावर जी प्रस्तर चित्रे आढळलेली आहेत, त्यावरून इथल्या शेकडो वर्षांच्या संस्कृतीची आपणाला प्रचिती येते. गोव्यात सत्तरी, धारबांदोडा, सांगे आणि काणकोण या चार तालुक्यांत सह्याद्रीच्या पर्वतरांगा पसरलेल्या आहेत. इथे आदिमानवाचा वावर असल्याचे पुरावे संशोधकांना वेळोवेळी आढळलेले आहेत.
आदिवासीबहुल भाग असलेल्या काणकोणात तळपण, गालजीबाग, साळेरी या नद्या येथील सह्याद्रीच्या पर्वतरांगांत उगम पावून अरबी सागराशी शेवटी एकरूप होतात. या तिन्ही नद्यांच्या खोऱ्यात आदिमानवाचे वास्तव्य होते, अशी शक्यता इथल्या पोषक परिस्थितीमुळे वाटते. तरीही इथे पुरातत्त्वीय दृष्टिकोनातून उत्खनन आणि शास्त्रीय संशोधन करण्याची नितांत गरज आहे.
कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड म्हणजे कारवार जिल्ह्यातील मैंगिणी आणि गोव्यातील काणकोणातील पैंगिणी या दोन गावांची सीमा जेथे एकमेकांना भिडते तेथील समृद्ध घनदाट जंगलात समुद्र सपाटीपासून ३९५ मीटर उंचीवर बोम्मा गुड्डा पर्वत शिखर आहे. मान्सूनच्या पावसाळ्यात कोसळणारे पाणी असंख्य झऱ्यांद्वारे प्रवाहित होऊन नदीचे रूप धारण करते.
पावसाळा संपून हिवाळ्यापर्यंत गालजीबाग नदीशी एकरूप होणाऱ्या ओहोळांपैकी बोम्मा गुड्डावरून वाहणारे छोटेमोठे जलस्रोत महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यामुळे जेथे वाहते पाणी उपलब्ध व्हायचे तेथे लोकवस्ती बहरलेली पाहायला मिळते. पैंगिणी गावातील मार्ली ही आदिवासी वस्तीसुद्धा पेयजल, कुमेरी शेतीसाठी उपलब्ध जमीन असणाऱ्या भूभागात वसलेली आहे.
या मार्लीपासून जंगलवाटा धुंडाळत जाणाऱ्या कष्टकरी आदिवासी लोकसमूहाला इथल्या वृक्षवेली, पशुपक्षी आणि एकंदर परिसरच आकर्षणबिंदू ठरलेला असल्याकारणाने त्यांनी इथे वास्तव्य केलेले आहे. याच जंगलात मौसमी ओहोळाच्या दोन्ही बाजूंनी जंगलांनी व्यापलेल्या पात्रात जे महाकाय शिलाखंड आहेत तेथेच आदिम काळाशी नाते सांगणाऱ्या असंख्य कपसदृश खुणा आढळलेल्या आहेत.
गोव्यात यापूर्वी अशा कपसदृश खुणा जांभ्या दगडावरती रिवण(सांगे)जवळील फणसायमळ, पिर्ला(केपे) येथील बावलेमळच्या जांभ्या दगडावरती आणि ग्रॅनाईट दगडावर काजूर(केपे) येथे आढळलेल्या आहेत. बार्देशातील सुकूरचे पठार आणि डिचोलीतल्या सुर्लच्या खोडगिणीच्या पठारावरच्या जांभ्या दगडात अशाच कपसदृश खुणा खोदलेल्या आहेत.
सत्तरीत म्हाऊस गावातल्या झर्मे नदीपात्रात बेसॉल्ट दगडावर कपसदृश खुणा आढळलेल्या आहेत. परंतु मार्ली येथील कपसदृश खुणांचे स्वरूप भिन्न आणि लक्षवेधक असेच आहे. या नदीपात्रातल्या पहिल्या दगडावरती २१ आणि दुसऱ्या दगडावरती ४५ कपसदृश खुणा पाहायला मिळतात. खरे तर नदी आपल्या प्रवाहाद्वारे दगडावर कपसदृश खुणांची निर्मिती करत असते.
परंतु नदीपात्रात दोन दगडांवरती कपाच्या आकाराच्या ज्या कलाकृती आहेत त्या मानवनिर्मित असून त्याची प्रचिती त्यांच्या एकंदर स्वरूपावरून येते. कपाच्या आकाराच्या या कलाकृतींचा आकार, त्यांचा परिघ, खोलगटपणा, भौमितिक रचना याद्वारे कल्पना येते.
पहिल्या शिलाखंडावर कपाच्या आकाराच्या ज्या २१ कलाकृती आणि दुसऱ्या शिलाखंडावरच्या ४५ कलाकृतीद्वारे चित्रकाराला काय अभिप्रेत होते याबाबत शास्त्रज्ञांनी सखोल संशोधन करण्याची गरज आहे. रानावनात अन्नपाण्यासाठी भटकंती करणाऱ्या आदिमानवासमोर खुले, निळेशार, चंद्र, सूर्य आणि तारकामंडळाने युक्त जे आकाश आणि आकाशगंगा होती, त्याचे चित्रण या प्रस्तर चित्रांतून केलेले आहे का, हे नक्की सांगणे कठीण आहे.
आदिमानवाच्या जीवनात देवाधर्माचे आगमन होण्यापूर्वी यातुविद्येचे प्रस्थ निर्माण जाले होते. आदिम अवस्थेत असणाऱ्या मानवासमोर, ढग का गडगडतात? मुसळधार पाऊस का कोसळतो? वीज कशी चमकते? आदी सर्व प्रश्नांची उत्तरे आकलनापल्याड होती.
स्वाभाविकच त्याला असे वाटत होते की हे सगळे घडवून आणणारी एखादी अदृश्य शक्ती असली पाहिजे. तशी धारणा निर्माण झाली आणि यातून यातुविद्या जन्माला आली. कपाच्या आकाराची ही चित्रे कोरलेली आहे ती निर्माण करण्यामागे त्या शक्तीसमोर मानवी रक्त किंवा वीर्य अर्पण करण्याचे प्रयोजन होते का? की अन्य कोणत्या कार्यासाठी त्यांची निर्मिती केली याचा जेव्हा अर्थबोध पुरातत्त्व संशोधकांना होईल तेव्हाच या प्रस्तर चित्रांमागच्या रहस्याची उकल होईल.
जंगली जनावरांची शिकार नदीनाल्यातील मासेमारी करणाऱ्या आदिमानवाचे जीवन पूर्णपणे नैसर्गिक शक्तीवर अवलंबून होते आणि त्यातून जी यातुविद्या जन्माला आली, त्याच्याशी या चित्राचा संबंध होता का? असे समोर आलेले असंख्य प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यांची जेव्हा शास्त्रीय उकल करण्यात पुरातत्त्व संशोधक आणि शास्त्रज्ञांना यश लाभेल तेव्हाच या प्रस्तर चित्रांचे प्रयोजन समजेल. या साऱ्याचे संशोधन करण्याची नितांत गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.