
पणजी: शिगाव हे ग्रामनाम श्रीगावाशी संबंधित असले पाहिजे. श्री म्हणजे लक्ष्मी. कधी काळी खनिज संपत्तीबरोबर शेती आणि बागायतीची गर्भश्रीमंती मिरवणाऱ्या या गावांना नैसर्गिक सौंदर्य लाभले होते. त्यामुळे इतिहास पूर्वकाळापासून शिगावात आदिमानवाचे वास्तव्य होते.
दूधसागर धबधब्याच्या माध्यमातून काटला आणि पाळणा हे कर्नाटकच्या काळी व्याघ्र प्रकल्पाच्या सधन जंगलात उगम पावणारे दोन नाले एकत्र येतात आणि सोनावल गावातले हे पाणी कुळे गावातून शिगावात प्रवेश करते. तेच पुढे खांडेपार नदीच्या विलोभनीय रूपाने काठावर वसलेल्या या गावाला बारमाही पेयजल देत असे.
केवळ पिण्यासाठीच नव्हे तर फळे, फुले, कंदमुळे यांची मुबलक प्रमाणात प्राप्ती या पाण्यावरच व्हायची. त्यामुळे दूधसागराच्या खोऱ्यातून भटकंती करत आलेल्या आदिमानव समूहाची पावले शिगावात काही काळ स्थिरावली होती. भाषा, धर्म, संस्कृतीचा उद्गम होण्यापूर्वी निसर्ग आणि पर्यावरणाशी अनुबंध राखत जीवन जगणाऱ्या आदिमानवाला इथल्या नैसर्गिक गुंफांनी ऊन, पाऊस, वादळ, वारा यासारख्या नैसर्गिक प्रकोपांपासून आश्रय दिला.
त्यामुळे अश्मयुगीन काळातल्या आदिमानवापासून महापाषाण युगातल्या माणसांच्या असंख्य नाममुद्रा शिगावात ठिकठिकाणी पाहायला मिळायच्या. कालांतराने जेव्हा शिगावात आधुनिक माणूस राहू लागला तेव्हा इथल्या ‘सुजलाम्, सुफलाम्’तेने त्याच्या जगण्याला अर्थ प्राप्त करून दिला. त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनातल्या विविध पैलूंचे इथे दर्शन पुरातत्त्व आणि इतिहास संशोधकांना वेळोवेळी झालेले आहे.
दक्षिण गोव्यातल्या धारबांदोडा तालुक्यात येणाऱ्या कुळे ग्रामपंचायतीच्या कक्षेत येणारा हा २,२५९-३४ हेक्टर क्षेत्रफळात विसावलेला शिगाव, लोहखनिजाचे उत्खनन वारेमाप होण्यापूर्वी हिरव्यागार वृक्षवेलींनी नटला होता. त्यामुळे पाव शतकापूर्वी १,५८८ हेक्टर जंगलक्षेत्राची नोंद जनगणनेत पाहायला मिळत होती.
पिण्यासाठी चवदार पाणी आणि भातशेती, कुळागरे यांच्यासाठी पोषक अशी सुपीक जमीन शिगावात असल्याकारणाने गोव्याच्या विविध भागांतून लोकसमूह इथे स्थिरावले. गावाच्या उन्नतीत योगदान करण्यात सफल ठरले. जंगलनिवासी, आदिवासी जमातीबरोबर विविध जातींनी उदरर्निवाहाचे सशक्त स्रोत असल्याने इथे मुक्काम करण्यात धन्यता मानली. त्यामुळे माटोजे, बिंबल, वनसाय, तुरीमरड, टाकवाडा, वासीमरड, वेळीपवाडा आणि खापरनाकामळी असे वाडे विकसित झाले.
पोर्तुगीज अमदानीत शिगावात लोहखनिजाच्या उत्खननास प्रारंभ झाला. परंतु गोवामुक्तीनंतर या व्यवसायाने गती घेतली आणि त्यामुळे शेती, बागायतीवर त्याचे गंभीर दुष्परिणाम प्रकर्षाने जाणवू लागल्याने शिगावातील लोकांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले. प्राचीन काळी कर्नाटकाला जोडणाऱ्या दिघी घाटात शिगावातून लोक ये-जा करत होते. त्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर माथ्यावरच्या मायरे गावातल्या कष्टकऱ्यांप्रमाणे अंत्रूज महालातल्या खांडेपार गावातल्या लोकांनी शिगावात वस्ती केली होती.
बारमाही वाहणारी मांडवी नदीची उपनदी खांडेपार शिगावामार्गे पुढे जात असल्याने तिच्या पाण्याच्या सिंचनावरती कष्टकऱ्यांची शेती, बागायती फुलत होती. त्यामुळे तिला जीवनदायिनीच्या स्वरूपात पाहताना कातळातून प्रवेश केल्यावर तिचे पावित्र्य ‘तीर्थ पाटो’ इथे मोठ्या श्रद्धेने जपले जायचे. महिषासुरमर्दिनीच्या रिपुसंहारक रूपाला शिगाववासीयांनी सातेरी म्हणून पुजले तर गजलक्ष्मीला केळबाय म्हणून नतमस्तक होण्यात धन्यता मानली.
पुरुषतत्त्वाला महादेवाचे स्थान देण्यात आलेले आहे. रंगाईदेवी म्हणजे गजलक्ष्मीची सुबक पाषाणी मूर्ती नदी किनारी वसलेल्या देवराईची अधिष्ठात्री देवता आहे. एकेकाळी वृक्षवेलींनी ही जागा समृद्ध होती. आज कुमयो, काजरो, सावर, भेरली, माडासह काही मोजकीच झाडे देवराईत शिल्लक राहिलेली आहेत. रंगाईदेवीच्या देवराईच्या शेजारी केवळ सात जांभ्या दगडांची रचना असली तरी गोवा सरकारच्या पुरातत्त्व खात्याच्या नोंदीनुसार पाच फूट उंची आणि दीड फूट रुंदी असलेले अकरा दगड उभ्या स्थितीत होते. आज हे दगड विकल स्थितीत असले तरी कधीकाळी बाराजणांच्या रूपात पुजल्या जाणाऱ्या आणि गोवा- कोकणातल्या महापाषाण युगाशी नाते सांगणाऱ्या या ऐतिहासिक संचितांचे महत्त्व विस्मृतीत जाण्याच्या मार्गावर आहे.
शिगावात ज्याप्रमाणे नैसर्गिक गुंफा आहे, त्याचप्रमाणे जांभ्या दगडात कोरलेली गुंफाही पाहायला मिळते. या गुंभेत वाघ्रोदेवाची मूर्ती आहे. घनदाट जंगलात पूर्वी पट्टेरी वाघांचा अधिवास होता. वाघाचा हल्ला होऊन आपणास व गुराढोरांस इजा पोहोचू नये म्हणून इथल्या कष्टकऱ्यांनी वाघाची ‘वाघ्रोदेव’ म्हणून पूजा केली होती. गोवा मुक्तीनंतर पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. शंकर साळी यांनी जेव्हा शिगावला भेट दिली होती तेव्हाच इथे आदिमानवाच्या अस्तित्वाचे पुरावे सापडण्याची शक्यता व्यक्त केली होती. कालांतराने पुरातत्त्व संशोधकांना खांडेपार नदीच्या पात्रात आदिमानवाच्या अस्तित्वाची प्रचिती देणारी पुराश्मयुगातली दगडी आयुधे सापडली होती. मध्य आणि उत्तर पुराश्मयुगात वावरणाऱ्या आदिमानव समूहाचे वास्तव्य शिगावात होते दूधसागर धबधब्याच्या माध्यमातून जन्माला येणारी खांडेपार नदी इतिहासपूर्व कालखंडापासून मध्ययुगीन इतिहासापर्यंत वावरणाऱ्या मानवी समूहाचे अन्न, पाण्याने भरणपोषण करायची आणि त्यामुळे शिगावातल्या विभिन्न भागांत आज गतवैभवाच्या असंख्य खाणाखुणा पाहायला मिळतात.
गोव्यात शेकडो वर्षांचा समृद्ध इतिहास आणि हजारो वर्षांचा अश्मयुगीन वारसा काही मोजक्याच गावांना लाभला आहे. अशा नामावलीत शिगावाचा प्रामुख्याने समावेश होतो. आज या गावातल्या वाड्यांची जी स्थळनावे आहेत ती जुन्या संचितांची प्रचिती आणून देतात. लोकसंस्कृती आणि इतिहासाचा सधन वारसा लाभलेल्या शिगावात खनिज उत्खननाच्या व्यवसायाची जेव्हा अराजकता सुरू झाली तेव्हा हां हां म्हणता इथल्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक सौंदर्याची धुळधाण झाली. त्यामुळे आधुनिक काळात शिगावाच्या वैभावाची जाणीव खूप कमीजणांना आहे.
शिगम्यात त्याचप्रमाणे इथल्या लोकजीवनात ज्या प्रथा, परंपरा प्रचलित आहेत, त्यातून शिगावातल्या जुन्या इतिहासाची कल्पना येते. शिगम्यात रात्रीच्या चांदण्यात मंदिरासमोर उभ्या केल्या जाणाऱ्या सावरीच्या वृक्षावरती चढण्यासाठी कौशल्य असणारा भूमिपुत्र ‘दुरीग उत्सवा’च्या प्रसंगी भाविकांच्या कौतुकास पात्र ठरतो. सरळसोट आणि सातत्याने वरून पाणी ओतले जात असल्याने, सावरीच्या होळीवरचे श्रीफळ मिळवण्यासाठी चढणाऱ्या गड्याला आपले कौशल्य पणास लावावे लागते. शिगावातला शिगम्यात होणारा हा ‘दुरीगोत्सव’ पाहण्यासाठी संस्कृतीप्रेमी इथे हमखास उपस्थिती लावतात आणि लोकसंस्कृतीच्या वैविध्यपूर्ण पैलूंचा आविष्कार अनुभवतात.
शिगावातल्या पुराश्म युगापासून ते आधुनिक काळातल्या इतिहासाची संचिते संशोधकांना अचंबित करून टाकणारी अशीच आहेत. एखाद्या गावाच्या विस्मृतीत जाण्याच्या मार्गावरती असणाऱ्या नैसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक पैलूंचा समग्र अभ्यास केला तरच त्याच्या गतवैभवाची जाणीव होऊ शकते. शिगावाच्या एकंदर अस्तित्वालाच सुरुंग लावण्यास सिद्ध झालेल्या लोहखनिज उत्खननाच्या खाणी सध्या बंद पडल्याने आज हा गाव वाचलेला आहे. त्यामुळे इथे विखुरलेल्या संचितांचा शोध घेऊन शिगावाला नवी दिशा देण्याची नितांत गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.