Journey of human life and aging Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

पिढ्यांमधील अंतर आणि मनाचा समतोल: सुखी म्हातारपणाची गुरुकिल्ली

Lifestyle: काळाच्या ओघात काही गोष्टी हातातून निसटून जातात, त्या आपल्या नव्हत्याच असं मानायला शिकले पाहिजे म्हणजे खूपशी दुःखे मनाला खुपणार नाहीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

कोणताही सजीव जन्माला येतानाच मरणाची निश्चिती करून येत असतो. मनुष्यप्राणी हादेखील याला अपवाद नाही. जीवन आणि मरण यांच्या मधला काळ म्हणजे आयुष्य! हे आयुष्य आपण कसे जगलो यावर त्याची सफलता आणि विफलता अवलंबून असते. सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या मुलांचे जगणे आणि गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलांचे जगणे हे वेगळे असते.

जन्मापासून मरणापर्यंत ज्यांचे आयुष्य सुखात गेलेले असते त्यांना दुःख म्हणजे काय हे माहीत नसेल कदाचित परंतु हाल अपेष्टा काढून जे आपले व्यक्तिमत्त्व घडवतात त्यांनाच जीवन म्हणजे काय हे उमगत असते. बालपण, तारुण्य आणि वृद्धत्व हे मानवी आयुष्यातील तीन टप्पे आहेत. बालपणी आपणाला कशाची चिंता करावी लागत नाही कारण आपल्या बालपणाची जबाबदारी आपले पालक घेत असतात. तारुण्यात आपण आपले करिअर घडवतो. याच काळात बिनधास्त जीवन जगतो. वृद्धत्व येते तेव्हा मात्र आपले डोळे उघडतात.

आपण काय कमावले आणि काय गमावले याचा हिशेब आपण मांडत बसतो. परंतु तोपर्यंत काळ आपल्या हातातून निसटून गेलेला असतो. जुन्या आठवणीत रमणे एवढेच आपल्या हाती उरते. ज्यांना आपण जन्म दिला, ज्यांना आपण लहानाचे मोठे केले, ज्यांचे सगळे हट्ट पुरवले, उत्तम शिक्षण देऊन ज्यांचे करिअर घडवले, ज्यांचे विवाह करून दिले, तीच मुले आपल्याकडे आता दुर्लक्ष करतात, आपण सांगितलेले ऐकत नाहीत, आपल्या साध्यासुध्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत, आपल्याला एखाद्या आश्रितासारखे घराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात पडून राहावे लागते. हे दुःख फार जिव्हारी लागणारे असते.

आपल्या उमेदीच्या काळात आपण पैसे कमावतो, घर सांभाळतो, घरात आणि घराबाहेर आपल्या शब्दाला किंमत असते, परंतु आपण वृद्धत्वामुळे सर्व व्यापातून निवृत्त होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी इतिहासजमा होतात. आपण मात्र पूर्वीच्याच तोऱ्यात वावरण्याचा प्रयत्न करीत असतो. घरातील तरुण पिढीला हे मानवणारे नसते. यातूनच मग खटके उडू लागतात. वृद्ध आपल्या उमेदीच्या काळातील आठवणी काढून कुढत बसतात.

नवीन पिढीचे वर्तन त्यांना खटकते. आपले तेच खरे करण्याची वृत्ती याच काळात बळावते. यातून कौटुंबिक कलह, वादविवाद, रुसवे-फुगवे यांचा जन्म होतो. असे वारंवार घडू लागले की वृद्ध व्यक्ती कुटुंबाला नकोशी वाटू लागते आणि तिची रवानगी वृद्धाश्रमात केली जाते. नवीन गोष्टींचा स्वीकार केला, सर्वांशी मिळून मिसळून वागले तर वृद्धांचे उरलेले आयुष्य कठीण जाणार नाही. मग ते स्वतःचे घर असो अथवा वृद्धाश्रम!

वृद्धावस्थेत लळा लागतो तो नातवंडांचा! नातवंडांना अंगाखांद्यावर खेळवताना, त्यांना छान छान गोष्टी सांगताना, आपल्या बालपणीच्या गोष्टी सांगताना आजोबा आजीला खूप आनंद वाटत असतो. नातवंडांनादेखील आजोबा आजी हवे हवेसे वाटत असतात. पण घरातील सुनबाईला हे आवडत नसते. आपली मुले आजोबा आजीशी जास्त जवळ गेली तर ती बिघडतील किंवा त्यांच्या आजाराचा संसर्ग आपल्या मुलांना होईल अशी अकारण धास्ती त्यांना वाटत असते आणि म्हणूनच आपली मुले आजोबा आजीपासून शक्यतो दूर राहावीत असे त्या मुलांच्या आई-बापांना वाटत राहते.

सगळीच वृद्ध मंडळी हेकेखोर,चिडचिडी असतात असे नाही. बरीच वृद्ध माणसे समंजस, नव्या गोष्टी स्वीकारून कुटुंबातील आणि कुटुंबाबाहेरील माणसाशी आणि परिस्थितीशी जुळवून घेणारी असतात.

आपली सद्दी संपली आहे, तरुण पिढीला आपल्या सल्ल्याची, मदतीची गरज उरलेली नाही तेव्हा त्यांच्या आयुष्यात आपण ढवळाढवळ न केलेलीच बरी असं मानून देवपूजेत मन रमवणे, आपले आवडीचे छंद जोपासणे, समवयस्क मित्रामध्ये गप्पागोष्टी करणे, (या गप्पांत आपल्या कुटुंबातील कुरबुरी न येऊ देणे) सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद लुटणे, वेळच्यावेळी पचेल आणि आरोग्याला पोषक होईल असे आणि तेवढेच खाणे, वेळच्यावेळी औषधे, गोळ्या घेणे, टीव्हीवरील कार्यक्रम पाहून आपले मन रिझवणे आणि आजचा दिवस छान गेला असे म्हणून ईश्वराचे आभार मानून झोपी जाणे असा आपला दिनक्रम ठेवला की म्हातारपण सुखान्त होऊ शकेल. उद्याची सकाळ पाहायला मिळेल न मिळेल तेव्हा उगाच चिंता करीत का बसावे?

वृद्धत्व आले की माणसाला सगळ्यात जास्त भय वाटते ते मृत्यूचे. आपण आजारी पडू, आपण परावलंबी होऊ, जडलेल्या दुर्धर रोगाच्या वेदना सहन कराव्या लागतील याची चिंता सतावते. आपल्याला अगदी शांतपणे मृत्यू यावा अशी प्रार्थना केली जाते. आयुष्याच्या संध्याछाया हृदयाला भिववू लागतात. अशावेळी वृद्धांनी असा विचार करावा की, आपण जे जगलो, ते खूप छान जगलो. मृत्यू ही अटळ गोष्ट आहे तेव्हा त्याचा अधिक विचार करीत बसण्यापेक्षा आयुष्यात जे चांगले घडले त्याचाच विचार करावा आणि आयुष्यातील आनंदाचे क्षण पुन्हा पुन्हा अनुभवावेत.

काळाच्या ओघात काही गोष्टी हातातून निसटून जातात, त्या आपल्या नव्हत्याच असं मानायला शिकले पाहिजे म्हणजे खूपशी दुःखे मनाला खुपणार नाहीत. जे जीवन मिळाले, जे सुख वाट्याला होते ते मिळाले. आता निरोपाची वेळ आली आहे असे मानले तर मरणाची भीती वाटणार नाही आणि आयुष्याची संध्याकाळ आनंदयात्रा ठरू शकेल!

- जयराम रेडकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनि आणि गुरुची चाल करणार मालामाल! नव्या वर्षात खुले होणार उत्पन्नाचे नवे मार्ग, 2026 मध्ये 'या' राशींना मिळणार धनकमाईच्या सुवर्णसंधी

Bodgeshwar Jatra: म्हापशात प्रशासनाचा बडगा! श्री बोडगेश्वर जत्रोत्सवातील जायंट व्हील्ससह 20 राईड्स सील; सुरक्षेच्या कारणास्तव मोठी कारवाई

लग्नाच्या मांडवात राडा! नवऱ्या मुलाला किस करणाऱ्या 'एक्स'ला नवरीनं भर मंडपात धोपटलं; सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल

India Pakistan Nuclear List: तणावाच्या वातावरणातही भारत-पाकिस्तानने जपली 35 वर्षांची परंपरा; अणुयादीच्या देवाणघेवाणीने जगाचे वेधले लक्ष

बांगलादेशात क्रूरतेचा कळस! 50 वर्षीय हिंदू व्यक्तीवर धारदार शस्त्रांनी हल्ला करुन दिलं पेटवून; 31 डिसेंबरची रात्र ठरली 'काळरात्र'

SCROLL FOR NEXT